esakal | सेलिब्रिटींच्या 'मालदिव व्हेकेशन'वर शोभा डे संतापल्या

बोलून बातमी शोधा

Bollywood celebs

सेलिब्रिटींच्या 'मालदिव व्हेकेशन'वर शोभा डे संतापल्या

sakal_logo
By
स्वाती वेमूल

एकीकडे संपूर्ण देश कोरोना महामारी आणि त्याच्यामुळे निर्माण झालेल्या इतर आर्थिक संकटांना सामोरं जात असताना दुसरीकडे बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीमध्ये मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. जरी सेलिब्रिटींना अशा काळात सुट्ट्यांचा आनंद घेण्याची संधी मिळाली असली तरी त्यांनी इतरांच्या परिस्थितीचा विचार करून सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिखावा करू नये, अशा शब्दांत लेखिका शोभा डे यांनी सुनावलं आहे. शोभा डे यांनी एका नेटकऱ्याची पोस्ट शेअर करत त्यांचं मत मांडलंय. रणबीर कपूर, आलिया भट्ट, दिशा पटानी, टायगर श्रॉफ, जान्हवी कपूर, सारा अली खान हे सेलिब्रिटी मालदिवला फिरायला गेले आहेत.

'मालदिव, गोवा आणि इतर ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की तुमच्यासाठी हे व्हेकेशन असेल, पण संपूर्ण जगात कोरोना महामारी पसरली आहे. त्यामुळे असंवेदनशील मूर्ख बनून सोशल मीडियावर तुमच्या सुखी आयुष्याचे फोटो पोस्ट करू नका. हे फोटो टाकून तुम्ही फक्त मूर्ख असल्याचं नाही तर आंधळे आणि बहिरे असल्याचं सिद्ध करत आहात. तुमच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या वाढवण्याची ही काही वेळ नाही. इतरांना मदत करण्याची ही वेळ आहे आणि जर तेसुद्धा जमत नसेल तर घरी शांत बसा. हा काही फॅशन वीक नाही किंवा किंगफिशर कॅलेंडर टाइम नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत बसू नका', अशी पोस्ट एका नेटकऱ्याने लिहिली. हीच पोस्ट शेअर करत शोभा डे यांनी सेलिब्रिटींना सुनावलं.

हेही वाचा : 'खरंच सुन्न व्हायला झालंय'; हेमांगी कवी परिस्थितीसमोर हतबल

काय म्हणाल्या शोभा डे?

'रोहिणी अय्यर यांनी लिहिलेली ही पोस्ट मला फारच आवडली. त्यामुळे मी ती इथे पोस्ट करत आहे. तिचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा हाच माझा उद्देश आहे. मालदिवमधले फोटो पोस्ट करणं म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. तुम्ही सुट्ट्यांचा आनंद अवश्य घ्या. सध्याच्या कठीण परिस्थितीतही तुम्हाला तसं करण्याची संधी मिळत आहे, म्हणजे तुम्ही खरंच खूप नशिबवान आहात. पण कृपया इतरांवर उपकार करा आणि ते फोटो पोस्ट करत बसू नका,' अशा शब्दांत शोभा डे यांनी टीका केली.

सेलिब्रिटींचा 'व्हेकेशन मोड ऑन'

सध्या बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, आई अमृता सिंहसोबत सारा अली खान, मित्रमैत्रिणींसोबत जान्हवी कपूर आणि टायगर श्रॉफसोबत दिशा पटानी मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याआधी अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, बिपाश बासू, दिया मिर्झा, हिना खान हे मालदिवला फिरायला गेले होते. २०२० या वर्षाच्या अखेरीस आणि नवीन वर्षाच्या सुरुवातील अनेक सेलिब्रिटी मालदिवला गेले होते. यामध्ये समंथा अक्किनेनी, सोनाक्षी सिन्हा, रकुल प्रीत सिंह यांचा समावेश होता.