esakal | श्रवण राठोड यांना कुंभमेळ्यातून परतल्यानंतर कोरोनाची लागण

बोलून बातमी शोधा

popular music director shravan rathod

श्रवण राठोड यांना कुंभमेळ्यातून परतल्यानंतर कोरोनाची लागण

sakal_logo
By
स्वाती वेमूल

हिंदी चित्रपटांना एकापेक्षा एक सुमधूर संगीत देणाऱ्या संगीतकार नदीम-श्रवण या जोडीपैकी श्रवणकुमार राठोड यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. श्रवण यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगी संजीवने धक्कादायक माहिती सांगितली आहे. श्रवण हे पत्नीसोबत कुंभमेळ्याला गेले होते आणि तिथून परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती, अशी माहिती त्याने दिली. "कुंभमेळ्यातून परतल्यानंतर त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. आमच्या कुटुंबाला इतक्या कठीण काळातून जावं लागेल याची कल्पनासुद्धा आम्हाला नव्हती. माझ्या बाबांचं निधन झालं, मी आणि माझी आई कोविड पॉझिटिव्ह आहे. माझ्या भावालाही कोरोनाची लागण झाली असून तो घरी क्वारंटाइनमध्ये आहे. पण वडिलांच्या निधनामुळे त्याला अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी मिळाली आहे", असं संजीव राठोड म्हणाले.

६६ वर्षीय श्रवणकुमार राठोड यांना माहिम इथल्या रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शेवटच्या दिवसांत ते व्हेंटिलेटरवर होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा : कोरोनाने बाबांच्या निधनानंतर भाग्यश्री लिमयेची मनाला चटका लावून जाणारी पोस्ट

नव्वदच्या दशकात नदीम-श्रवण ही जोडी कमालीची लोकप्रिय होती. त्यांनी कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल, अभिजीत, एस. पी. बालसुब्रमण्यम, सोनू निगम, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम यांसारख्या जवळजवळ सर्व आघाडीच्या गायकांना आपल्या चित्रपटांमध्ये संधी दिली.

'दंगल' या भोजपुरी चित्रपटापासून त्यांनी संगीतकार म्हणून सुरुवात केली. त्यानंतर हिंदीतील काही छोट्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. मात्र महेश भट्ट यांच्या 'आशिकी' या चित्रपटानंतर त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील रोमँटिक गाणी चांगलीच गाजली. या संगीतकार जोडीने 'साजन', 'सडक', 'दिल है की मानता नही', 'साथी', 'दिवाना', 'फूल और काँटे', 'राजा हिंदुस्थानी', 'जान तेरे नाम', 'रंग', 'राजा', 'धडकन', 'परदेस', 'दिलवाले', 'राज' अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते.