esakal | कोरोनाने बाबांच्या निधनानंतर भाग्यश्री लिमयेची मनाला चटका लावून जाणारी पोस्ट

बोलून बातमी शोधा

bhagyashree limaye

कोरोनाने बाबांच्या निधनानंतर भाग्यश्री लिमयेची मनाला चटका लावून जाणारी पोस्ट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मराठी अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या बाबांचं कोरोनामुळे निधन झालं. बाबांच्या निधनानंतर भाग्यश्रीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सर्वांत जवळच्या व्यक्तीला गमावण्याचं दु:ख, आपण काहीच करू शकत नाही याची हतबलता तिने या पोस्टमध्ये मांडली.

भाग्यश्रीची पोस्ट

'हा काळ कठीण आहे. आपल्या सगळ्यांसाठीच. मी यात एकटी नाही. माझे बाबा कोरोनाने गेले. इतक्या झटक्यात ही घटना घडली की आपल्या हातात खरंच काही नाही, या सत्याची अनुभूती पुन्हा एकदा झटका देऊन गेली. माझ्या कोणत्याही विश्वासावरचा माझाच विश्वास उडाला. कोणत्याच गोष्टीत तथ्य नाही हे उमजलं. काहीच आपल्या हातात नाही तर मग जगण्यात काय अर्थ असा विचार डोक्यात येणं स्वाभाविकच.'

'इथे बाबा आयसीयूमध्ये असताना, त्यांचं जाणं निश्चित आहे हे माहित असताना, आपण केलेले कोणतेही प्लॅन्स किती एकतर्फी असतात हे दिसताना, पलिकडच्या वॉर्डमध्ये नवीन जन्म होत असताना मी पाहायचे. वाटायचं, काय उपयोग या जगात येऊन. उद्या तुम्हालाही 'आयुष्य' या नावाच्या मायाजालातून जावं लागणार आहे. स्वतःची प्रिय व्यक्ती गमवावी लागणार आहे. आयुष्य या कॉन्सेप्टचा राग आला होता मला. आपल्या या अख्ख्या प्रवासात आपला स्वतःचा साधा खारीचा ही वाटा नाही, हे असलं आयुष्य का कुरवाळत बसायचं? सगळ्या आशा अपेक्षा नाहीशा होणं म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने कळलं.'

हेही वाचा : 'बंदिश बँडिट्स'मधील अभिनेता अमित मिस्त्री यांचं निधन; सिनेसृष्टीला मोठा धक्का

'शेवटच्या दोन दिवसांत बाबांची टेस्ट निगेटिव्ह आली आणि त्यांना कोव्हिड आयसीयूमधून मेडिकल आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यांनी ही लढाई जिंकली असा समज माझ्या घरच्यांचा झाला. पण पोस्ट कोव्हिड इफेक्ट्सने बाबांची तब्येत सुधारणार नाही आणि काहीच क्षण बाबा माझ्याबरोबर असणार आहेत याची कल्पना फक्त मलाच होती.'

'२० दिवसांनी मी पहिल्यांदा बाबांना इतक्या जवळून पाहिलं. रोखलेले अश्रू खुपत होते. त्यांनाही आणि मलाही. आम्ही एकमेकांचे हात हातात घेऊन फक्त एकमेकांकडे बघत राहिलो. कदाचित काय घडणार आहे हे पहिल्यांदाच निश्चित माहित असणारे आम्ही दोघे ही एकमेकांसमोर आलो होतो. दोघांनाही एकमेकांना सत्याची जाणीव नव्हती करून द्यायची. आयुष्याचं रहस्य, त्यातलं सत्य हे कळणं अशक्य आहे पण तो स्पर्श, या जगात माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या बाबांचा स्पर्श मात्र खरा जाणवला. या खोट्या जगात, फक्त भावना याच खऱ्या. या भावना मनात घर करतात हेच खरं. जगायचंय, फक्त या भावना अनुभवण्यासाठी. हेच सत्य आहे. बाकी काही नाही.'

भाग्यश्रीच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.