esakal | नवा चित्रपट : सिंबा : मसाला मनोरंजनाचा कडक डोस!
sakal

बोलून बातमी शोधा

Simmba movie review by Mahesh Bardapurkar

नवा चित्रपट : सिंबा : मसाला मनोरंजनाचा कडक डोस!

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

रोहित शेट्टीसारखा मसालापट बनवणारा दिग्दर्शक आणि रणवीर सिंगसारखा एन्टर्टेनर असल्यावर कसा चित्रपट समोर येऊ शकतो, याचा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आहे. या जोडीचा 'सिंबा' हा चित्रपट तद्दन मसालापटाकडून असलेल्या सर्वच्या सर्व अपेक्षा पुरेपूर पूर्ण करतो.

जोरदार हाणामाऱ्या, हवेत उडणाऱ्या गाड्या आणि हिरोच्या एका फाइटमध्ये उंच उडणारे गुंड, चटपटीत संवादांच्या जोडीला भव्य सेटवरील उडत्या चालीची गाणी अशी भरगच्च थाळी चित्रपट पेश करतो. कथा आणि पटकथेच्या बाबतीत मात्र न विचारलेलंच बरं किंबहुना शेट्टींच्या चित्रपटांकडून अशी कोणाचीच अपेक्षाच नसल्यानं त्यावर बोलणंही चुकीचंच.

रणवीरची कॉमेडी, अनेक मराठी कलाकारांची सुखद उपस्थिती, ऍक्‍शन व भरपूर मसाला असल्यानं हा चित्रपट थोडीही निराशा करीत नाही, हेही तितकंच खरं. 

'सिंबा' हा चित्रपट 'सिंघम'या मालिकेचा पुढचा भाग असल्यानं कथा पुन्हा एकदा शिवगडमध्ये सुरू होते. पोलिस अधिकारी बनल्यास काहीही करण्याची मुभा मिळते, हा गैरसमज झालेला सम्राट भालेराव ऊर्फ सिंबा (रणवीर सिंग) मोठं होऊन पोलिस बनण्याचं स्वप्न पाहतो आणि कष्टानं अधिकारी बनतो. मात्र, त्याचा उद्देश येनकेन प्रकारे भरपूर पैसा व सत्ता कमावणं असल्यानं तो अनेक गैरव्यवहारांत आकंठ बुडालेला असतो. ओघानंच त्याची बदली गोव्यामध्ये मिरामार पोलिस स्टेशनला होते.

सिंबा पोलिस स्टेशनसमोरच हॉटेल चालविणाऱ्या शगुन साठे (सारा अली खान) या तरुणीच्या प्रेमात पडतो. आकृती (वैदेही परशुरामी) ही तरुणी रस्त्यावरील मुलांना शिकवण्याचं काम करीत असते, सिंबा तिला बहीण मानतो. (नायकाला कोणतंही घरदार नसल्यानं तो दिसलं त्याला आपल्या संसारात सहभागी करून घेत असतो, चांगलंय...) परिसरातील गुंड दूर्वा रानडे (सोनू सूद) (चित्रपटातील सर्व आडनावं साठे, रानडे, जोशी आणि देशपांडेच आहेत...त्यात नायक वा खलनायक असा फरक नाही, याची नोंद घ्यावी.)

आपल्या भावांच्या मदतीनं अनेक गैरव्यवहार करीत असतो आणि सिंबा अर्थातच त्याच्याकडून हप्ता वसुली सुरू करतो. मात्र, एका प्रसंगात त्याची मानलेली बहीण आकृती दूर्वा आणि त्याच्या भावांच्या धंद्यात हस्तक्षेप करते. त्यातून सिंबा आणि दुर्वामध्ये संघर्ष पेटतो... 

चित्रपटाच्या कथेत तसं कोणतंही नावीन्य नाही. जागा बळकावणं, अमली पदार्थांची विक्री, बलात्कार असे गंभीर आरोप करणारे गुन्हेगार व पोलिसांतील सनातन (चित्रपट दिसणारा) संघर्ष इथंही आहे.

पहिल्या भागात सिंबाचं पात्र नर्मविनोदी आहे आणि खुसखुशीत संवाद आणि गाण्यांमुळं हा भाग मनोरंजक झाला आहे. सिंबा आणि दूर्वामध्ये संघर्षाची ठिणगी पडल्यावर चित्रपट वेग पकडतो, तुफान हाणामाऱ्या आणि जोरदार ऍक्‍शन सुरू होते. कथेचा शेवटही अपेक्षितच आहे आणि त्यात बाजीराव सिंघमची (अजय देवगण) छोटी भूमिका पेरून दिग्दर्शकानं मजा आणली आहे. (या कथेचा पुढचा भाग 'सूर्यवंशी'ची घोषणाही दिग्दर्शकानं करून टाकली आहे.) 

रणवीर सिंगचा अभिनय चित्रपटाचं खास आकर्षण ठरावं. भाषेचा सतत बदलणारा लहेजा, विनोदी प्रसंगांतील टायमिंग, डान्स स्टेप्स याच्या जोरावर तो मध्यंतरापर्यंत छान मनोरंजन करतो. त्यानंतरच्या हाणामारीच्या प्रसंगांमध्ये तो छान शोभून दिसतो.

काही भावुक प्रसंगांतील त्याचा अभिनयही दाद देण्याजोगा. अभिनयातील वैविध्य आणि अंगातील एनर्जीच्या जोरावर त्यानं सिंबाच्या भूमिकेत कमाल केली आहे. गुंड दूर्वा रानडेच्या भूमिकेला सोनू सूदनं योग्य न्याय दिला आहे. वैदेही परशुरामीनं साकारलेली छोटी भूमिका लक्षात राहते. सारा अली खानला फारशी संधी नाही.

आशुतोष राणानं पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत छाप पाडली आहे. सिद्धार्थ जाधव, अरुण नलावडे, नंदू माधव, अशोक समर्थ, सुचित्रा बांदेकर, नेहा महाजन, सौरभ गोखले आदी मराठी कलाकारांच्या फौजेनं अभिनयात जान ओतली आहे. 'आँख मारे' आणि 'तेरे बिन' ही गाणीही (पुन्हा) जमून आली आहेत. 

एकंदरीतच, नायकाला लार्जर दॅन लाइफ दाखवत पडद्यावर साकारलेला कारनामे प्रेक्षकांचे छान मनोरंजन करतात. (नायकाला 'स्मॉलर' दाखवल्यास काय होतं, हेही आपण पाहिलंच.) मसाला मनोरंजनाचा हा डोस एकदा घ्यावा असाच...

loading image