esakal | गायक सुधीर फडके यांची गाणी गुजराती आणि हिंदीमध्ये त्यांना वाहिली आगळीवेगळी आदरांजली
sakal

बोलून बातमी शोधा

गायक सुधीर फडके यांची गाणी गुजराती आणि हिंदीमध्ये त्यांना वाहिली आगळीवेगळी आदरांजली

आज सुधिर फडके यांची त्यांची १२ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त गायक आणि कवी हिमांशुराय रावल यांनी त्यांच्या तीन भावगीतांचा हिंदी आणि गुजरातीमध्ये भावानुवाद करून त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.

गायक सुधीर फडके यांची गाणी गुजराती आणि हिंदीमध्ये त्यांना वाहिली आगळीवेगळी आदरांजली

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे - सकाळ न्युज नेटवर्क


मुंबई ः असंख्य जनांच्या मनामनात तसेच घराघरात पोहोचलेले नाव म्हणजे सुधीर फडके. अगदी गीतरामायणापासून ते भावविभोर करून सोडणाऱ्या विविध गीतांतून रसिक मनावर बाबूजींनी राज्य केले. केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर जगातील असंख्य रसिकांना त्यांच्या गाण्यांनी मोहिनी घातली. त्यांची १०१ वी जयंती नुकतीच पार पडली आणि आज त्यांची १२ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त गायक आणि कवी हिमांशुराय रावल यांनी त्यांच्या तीन भावगीतांचा हिंदी आणि गुजरातीमध्ये भावानुवाद करून त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.

लाॅकडाऊनमध्ये ठरलं लिटल चॅम्पस कार्तिकी गायकवाडचं लग्न; वाचा सविस्तर...

गीतकार आणि कवी हिमांशुराय रावल यांना गुजराती, बंगाली, उर्दू, हिंदी आदी भाषांचे ज्ञान चांगले अवगत आहे. बाबूजींची सगळी गाणी त्यांना आवडतात आणि ते त्यांचे कमालीचे फॅन आहेत. १९९८ मध्ये अशी पाखरे येती... या गीताचा गुजराती अनुवाद करून त्यांनी फोनवर बाबूजींना ते गीत ऐकविले होते. तेव्हा बाबूजींनी त्यांचे कौतुक केले शिवाय असे प्रयत्न व्हायला हवेत असेही सांगितले. शिवाय आकाशवाणीवरअसताना दिवंगत संगीतकार यशवंत देव यांनीही हिमांशुराय यांना आशीर्वाद दिला आणि असे प्रयोग करण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे आता हिमांशुराय यांनी अशी पाखरे येती (गुजराती : उडी गया क्यां पंखी मूकी खाली खाली माळा ...) ,  डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरे गाणे (गुजराती : ओठो परना गीतो लूछे लोचन केरा पाणी) ही दोन गाणी गुजरातीमध्ये तर धुंद येथ मी (हिंदी : पथ भूला मैं, यहां बरसते मदिरा के धारे...) हे गाणे हिंदीमध्ये बनविले आहे आणि ते यू ट्यूबवर टाकलेले आहे.

'अतरंगी रे' चित्रपटाच्या शुटींगसाठी 'ही' तीन शहरं झाली निश्चित, वाचा बातमी सविस्तर

या तिन्ही गाण्यांचा अनुवाद हिमांशुराय यांनी केला आहे आणि ही गाणी अनुक्रमे जागेश जीकार, उदयकुमार उपाध्ये आणि पारूल रावल यांनी गायली आहेत. याबाबत हिमांशुराय रावल म्हणाले, की बाबूजींबद्दल माझ्या मनात कमालीचा आदर आहे. मी त्यांना तसेच त्यांचे पुत्र श्रीधर फडके यांना भेटलो आहे. एका मालिकेचे गीत मी लिहिले होते तेव्हा श्रीधर फडके यांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो. त्यावेळी बाबूजींची भेट झाली आणि मी त्यांचे आशीर्वाद घेतले. शिवाय गुजरातीमध्ये अशा प्रकारची सुमधुर गाणी खूप कमी आहेत. मला बाबूजींच्या गाण्यांनी खूप भुरळ घातली. त्यामुळे त्यांना आगळीवेगळी आदरांजली म्हणून मी त्यांच्या तीन गीतांपैकी दोन गीते गुजरातीमध्ये तर एक गीत हिंदीमध्ये अनुवाद केले.    

------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane

loading image