शाहिदच्या 'कबीर सिंग'मुळे सोना मोहापात्राला मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जून 2019

'कबीर सिंग' चित्रपटाचे कौतूक केल्याने गायिका सोना मोहापात्राने अभिनेता शाहिद कपूर सोबतच नकुल मेहताला आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टिका केली आहे.

बॉलिवूडची गायिका सोना मोहापात्रा नेहमीच तिच्या कमेंन्टमुळे चर्चेत असते. आता ती चर्चेत आहे ते म्हणजे शाहिद कपूरचा चित्रपट 'कबीर सिंग'मुळे. या चित्रपटाबद्दल आणि विशेषतः चित्रपटातील शाहिदच्या भूमिकेबद्दल सोनाने ट्विट केले आहे. टिव्ही अभिनेता नकुल मेहताने 'कबीर सिंग'चे कौतूक करणारे ट्विट केले आहे. तेही सोनाला रुचले नाही. नकुलच्या ट्विटला टॅग करतही सोनाने हा चित्रपट त्रासदायक आणि दुःखी करणारा असल्याचे म्हटले आहे. 

कलाविश्वात घडणारी कोणतीही गोष्ट सोनाला पटली नाही तर ती लगेच सोशल मिडियाद्वारे ती थेट व्यक्त होते. ज्यामुळे अनेकवेळा तिला ट्रोलही करण्यात आले आहे तर काही वेळा तिच्या कमेंट्समुळे इतर सेलिब्रिटींसोबत सोशल मिडिया वॉरही छेडले गेले आहे. शाहिद कपूरचा 'कबीर सिंग' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील काही न पटणाऱ्या गोष्टींवर तिने मत नोंदविले आहे.

'या चित्रपटात महिलांवरील जाच आणि पितृसत्ताक या गोष्टीदेखील दाखवण्यात आल्या आहेत. त्या तुम्हाला दिसल्या नाहीत का? यात तुम्ही केवळ शाहिदची गंभीर भूमिकाच बघितली का? हे खरंच फार मनस्ताप देणारं आहे. तुम्ही तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आहात. मी खरंच अचंबित आहे, की जेव्हा भारतात महिलांविषयीचे मुद्दे उपस्थित होतात, तेव्हा आपण कोणती आशा करायला हवी', असे ट्विट करत सोनाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ते ट्विट डिलिट केल्याचे दिसत आहे. 
 

 

दरम्यान, शाहिद कपूर आणि कियारा आडवाणीची मुख्य भूमिका असलेल्या कबीर सिंह या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 20.21 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे ओपनिंग डे च्या दिवशीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाने स्थान पटकावले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sona Mohapatra slams Shahid Kapoor for playing Kabir Singh