
Sonali Phogat : सोनाली फोगटच्या कुटुंबीयांना आली सुशांतची आठवण; म्हणाले...
Sonali Phogat Latest News सोनाली फोगाटच्या मृत्यूचे गूढ अजूनच गडद होत चालले आहे. फोगाट मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी क्लबच्या मालकाला अटक केली आहे. तसेच बाथरूममधून ड्रग्ज जप्त केले आहे. दुसरीकडे फोगाटचे (Sonali Phogat) पीएम सुधीर सांगवान आणि सहकारी सुखजिंदर सिंग यांना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ‘हे प्रकरण सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूसारखे पुढे जावे आणि गूढ राहावे असे आम्हाला वाटत नाही’ असे वक्तव्य सोनालीच्या कुटुंबीयांनी केले आहे. त्यांनी या प्रकरणाची तुलना सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी केली आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रमाणे हे प्रकरण पुढे जावे असे आम्हाला वाटत नाही. कुटुंबाचा असा विश्वास आहे की सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली होती. रिया चक्रवर्तीने त्याला ड्रग्स दिले होते. हे प्रकरण अजून संपलेले नाही. हे प्रकरण अंमली पदार्थ बाळगणे किंवा अमली पदार्थांच्या सेवनाचे नाही. तर ते खुनाचे आहे, असे शनिवारी सोनाली फोगाटच्या कुटुंबीयांनी सांगितले.
सोनालीच्या (Sonali Phogat) मारेकऱ्यांना फाशी द्यावी, अशी आमची मागणी आहे. तिची हत्या झाल्याचे सिद्ध झाले नाही तर आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करू आणि नार्को टेस्टचीही मागणी करू, असे कुलदीप म्हणाला.
विशेष म्हणजे, एका पार्टीदरम्यान सोनाली फोगाटचे दोन सहकारी सुधीर सांगवान आणि सुखजिंदर सिंग यांनी तिच्या पेयात मादक पदार्थ मिसळल्याचे गोवा पोलिसांनी सांगितले होते. यामुळे सोनाली फोगाटचा मृत्यू झाला असावा. हे दोघेही फोगाट खून प्रकरणातील आरोपी आहेत. शनिवारी पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.