
सोशल मीडियावर मेसेज व्हायरल
लॉकडाउनदरम्यान अडकलेल्या मजुरांना व स्थलांतरितांना त्यांच्या गावी सुखरुप पोहोचवण्याची मोहीम अभिनेता सोनू सूदने राबवली. या अभिनेत्याने नि:स्वार्थ भावाने हे मदतकार्य सुरू केलं आणि ते अजूनही तो गरजूंच्या मदतीसाठी तत्पर आहे. सोशल मीडियाद्वारे तो चाहत्यांशी संवादही साधतो आणि त्यांची मदतसुद्धा करतो. मात्र त्याच्या नावाचा गैरफायदा काही लोकांकडून घेतला जात आहे. सोशल मीडियावर सोनू सूदच्या नावाने एक खोटा मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये पाच लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार असल्याची ऑफर आहे. 'सोनू सूद फाऊंडेशन' या नावाने हा मेसेज व्हायरल होत आहे. याविषयी आता खुद्द सोनू सूदनेच ट्विट केलं आहे. अशा भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन त्याने चाहत्यांना केलं आहे.
'सूद चॅरिटी फाऊंडेशन'कडून अशा कोणत्याही प्रकारचा कर्ज दिला जात नाही. अशा घोटाळ्यांपासून आणि फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा, असं त्याने ट्विटमध्ये लिहिलंय. सोनू सूद फाऊंडेशनकडून प्रत्येकाला पाच लाख रुपयांचं कर्ज दिलं जात असल्याचा खोटा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचसोबत हे कर्ज देण्यासाठी ३५०० रुपये शुल्क म्हणून मागितले जात आहेत.
लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदने इतरांची अनेकप्रकारे मदत करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक परप्रांतीयांना, गरीब मजुरांना, स्थलांतरितांना त्याने सुखरुप त्यांच्या गावी पोहोचवण्याचं काम केलं. इतकंच नव्हे तर त्याने अनेकांच्या उपचाराचा, शिक्षणाचा खर्चही उचलला. मात्र त्याच्या मदतीचा व नावाचा अशा प्रकारे गैरफायदा सोशल मीडियावर घेतला जात असल्याने त्याने ट्विट करत चाहत्यांना सावध केलं आहे.