"काहीही बरळण्याआधी एकदा विचार करा"; 'सायना'च्या पोस्टरवर दिग्दर्शक अमोल गुप्तेंचं स्पष्टीकरण

स्वाती वेमूल
Friday, 5 March 2021

पहिल्याच पोस्टरवरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवायला सुरुवात केली.

भारताची आघाडाची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर आधारित 'सायना' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या चित्रपटाचा पहिला पोस्टर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. मात्र पहिल्याच पोस्टरवरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवायला सुरुवात केली. या पोस्टरमधील शटल सर्व्हिसिंगची चूक लक्षात आणून देत नेटकऱ्यांनी निर्माते-दिग्दर्शकांना प्रचंड ट्रोल केलं. त्यानंतर आता दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी पोस्टरबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्याचप्रमाणे काहीच विचार न करता ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. 

अमोल गुप्ते यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली असून त्यात त्यांनी म्हटलं, 'पोस्टरबाबत डिजिटल मीडियामध्ये खूपच तर्कवितर्क लावले जात आहेत. टेनिस सर्व्हिससारखं दिसतंय, सायनाचा बायोपिक आहे की सानियाचा.. असं बरंच काही म्हटलं जातंय. जर सायना शटल वर हवेत उडवत असेल तर ती एक भारतीय मुलगी आहे जिच्या मनगटावर तिरंगा असून ती सायनाची उंची गाठण्याची महत्त्वाकांक्षा ठेवतेय. राहुल नंदा यांची ही कल्पना असून दुर्दैवाने असंयमी जगाला आणि पटकन मत मांडणाऱ्या लोकांना ती अशी समजावून सांगावी लागतेय. काहीही बरळण्याआधीही एकदा विचार तरी करा.'

हेही वाचा : अनुराग, तापसीकडून तब्बल ६५० कोटींची हेराफेरी; आयकर विभागाला सापडले महत्त्वाचे पुरावे

या बायोपिकमध्ये अभिनेत्री परिणिती चोप्रा ही सायनाची भूमिका साकारतेय. सुरुवातीला अभिनेत्री श्रद्धा कपूर ही मुख्य भूमिका साकारणार होती. तिने चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली होती. मात्र नंतर काही अडचणींमुळे तिने चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यानंतर यामध्ये परिणितीची एंट्री झाली. गुरुवारी परिणितीने या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला. या टीझरमध्ये देशात मुलामुलींमध्ये केला जाणारा भेदभाव अधोरेखित केला आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saina director Amol Gupte defends poster against backlash