बुद्धाच्या वाटेवरचं ‘मडवॉक’

संभाजी गंडमाळे
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

गौतम बुद्धांचे विचार आणि तत्त्वज्ञान अभ्यासणं आणि अंगीकारणं, या दोन्ही वेगळ्या गोष्टी. पण, याच विषयावर ‘पीएच.डी.’ करण्यासाठी तीन मित्र पुढे सरसावतात आणि मग सुरू होतो त्यांचा बुद्धांच्या वाटेवरचा ‘मडवॉक’. दैनंदिन घटना-घडामोंडीशी बुद्ध विचारांशी तुलना करता-करता ते बौद्धकालीन गुहांपर्यंत पोचतात आणि मग सुरू होते खऱ्या अर्थाने बुद्ध विचारांवरचे मंथन

वर्तमानाचा विचार करता समस्त मानवजातीला अहिंसा आणि शांततेचा मंत्र देणाऱ्या गौतम बुद्धांची विचारधारा आजही नव्याने अभ्यासण्याची गरज आता निर्माण झाली आहे. अडीच हजारांहून अधिक वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी मांडलेले विचार आजही तर्कसंगत ठरणारे आहेत आणि म्हणूनच या साऱ्या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजीच्या रंगयात्रा नाट्यसंस्थेने ‘मडवॉक’ या नाटकाच्या माध्यमातून बुद्धांच्या वाटेवरच्या एका नेटक्‍या प्रयोगाची बुधवारी अनुभूती दिली.

खरं तर, ‘मडवॉक’ ही एकांकिका यापूर्वी अनेक स्पर्धांत गाजली. या एकांकिकेने अनेक बक्षिसांची लयलूट केली. पण, दोन अंकी नाटकातून स्पर्धेच्या निमित्तानं बुद्धांच्या विचारांचा पुन्हा नव्याने जागर मांडला गेला. श्रीपाद देशपांडे यांचे लेखन, अनिरुद्ध दांडेकर यांचे दिग्दर्शन आणि तितक्‍याच भक्कम तांत्रिक बाजूंमुळे हा प्रयोग रसिकांना नक्कीच भावला.  

गौतम बुद्धांचे विचार आणि तत्त्वज्ञान अभ्यासणं आणि अंगीकारणं, या दोन्ही वेगळ्या गोष्टी. पण, याच विषयावर ‘पीएच.डी.’ करण्यासाठी तीन मित्र पुढे सरसावतात आणि मग सुरू होतो त्यांचा बुद्धांच्या वाटेवरचा ‘मडवॉक’. दैनंदिन घटना-घडामोंडीशी बुद्ध विचारांशी तुलना करता-करता ते बौद्धकालीन गुहांपर्यंत पोचतात आणि मग सुरू होते खऱ्या अर्थाने बुद्ध विचारांवरचे मंथन. मार्गदर्शक बेंजामिन एकेक गोष्ट सांगत असतो आणि त्यातून बुद्ध विचारांतील विविध प्रवाह समजून घेतले जाऊ लागतात. या तिन्ही विद्यार्थी मित्रांचा हा चिखलातून, दगड-गोट्यांतून सुरू असलेला प्रवास पुढे संपतो आणि बुद्धविचार हे केवळ ‘पीएच.डी.’पुरते नव्हे, तर ते कालातीत असल्याची जाणीव साऱ्यांनाच होते.   

पात्र परिचय...
 प्रसन्न माणगावकर (रघु), कादंबरी माळी (दुर्गा), पराग फडके (बब्बू), अनिरुद्ध दांडेकर (बेंजामीन), मयूर कुलकर्णी (कीर्तनकार), तुषार कुडाळकर (डॉ. तपस्वी), सुजाता गोडसे (रघुची आई), मंजुनाथ कोरवी (नावाडी),
 इतर ः प्रदीप माने, भावेश पाटील, विजय लंबे, सोहेल इनामदार, सचिन गारवे, अमित कांबळे, व्यंकटेश शिंदे, अमोल नलवडे, ज्योतिकिरण माने, स्मिता गुडसे, अनुजा कुलकर्णी, धनश्री शिरगुप्पी, आर्या रानडे, अरुणा माने, वृषाली कुरडे, विजया यादव, सूरज आसंगी. 
 नेपथ्य ः मंजुनाथ कोरवी, तुषार कुडाळकर
 पार्श्‍वसंगीत ः प्रवीण लायकर
 प्रकाश योजना ः आशिष भागवत
 रंगभूषा ः सुनीता वर्मा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Drama competition