गतीचं गीत गाणारं ‘क्रॉस कनेक्‍शन’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

आयुष्यात अनेक अडचणी, संकटे येणारच. पण, त्यावर मात करून किंबहुना कितीही अडचणींची शृंखला असली तरी गतीचे गीत गात आयुष्य आनंदानं जगण्याचा संदेश शनिवारी ‘क्रॉस कनेक्‍शन’ या नाटकानं दिला. श्री जयोस्तुते युवक मित्रमंडळ प्रणित सार्थक क्रिएशन्सने या नाटकाचा प्रयोग सादर केला. 

आयुष्यात अनेक अडचणी, संकटे येणारच. पण, त्यावर मात करून किंबहुना कितीही अडचणींची शृंखला असली तरी गतीचे गीत गात आयुष्य आनंदानं जगण्याचा संदेश शनिवारी ‘क्रॉस कनेक्‍शन’ या नाटकानं दिला. श्री जयोस्तुते युवक मित्रमंडळ प्रणित सार्थक क्रिएशन्सने या नाटकाचा प्रयोग सादर केला. 

मुळात यंदाच्या स्पर्धेसाठी पहिल्यांदाच कलाशिक्षक असणाऱ्या सागर बगाडे यांनी हे नाटक लिहिलं आणि ते स्वतः दिग्दर्शित करून रंगमंचावर साकारलं. स्थानिक रंगभूमीवर सातत्यपूर्ण लिखाण करणारी मंडळी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच असताना आता नव्याने काही मंडळी लिहू लागली आहेत आणि केवळ लिहून न थांबता त्यांना जे सांगायचं आहे, ते रंगमंचावर प्रत्यक्षात कलाकृतीतून रसिकांसमोर मांडत असल्याचे सकारात्मक चित्र यंदाच्या स्पर्धेच्या निमित्तानं आणखी ठळक झाले. 

काका आणि काकूंचा एक बंगला. त्यांची मुलं परदेशात स्थायिक झाली आहेत आणि म्हणून त्यांनी त्यांच्या आउट हाउसमधील दोन ब्लॉक भाड्याने दिले आहेत. त्यातील एकात तीन तरुण, तर दुसऱ्यात तीन तरुणी राहत आहेत. 

प्रत्येकाचे जगणे वेगळे; पण एकत्र आल्यानंतर त्यांच्यात निर्माण झालेली आपुलकी, स्वभाव वेगवेगळे असले तरी त्यातून एकमेकांना प्रेम, आनंद वाटण्याचा प्रयत्न अशा मध्यवर्ती विषयावर हे नाटक बेतलं आहे. 

लिखाणातला पहिला प्रयत्न करताना सागर बगाडे यांनी हलकं-फुलकं कथानक निवडलं. ते अधिक रंजक करण्यासाठी प्रत्येक कलाकाराने तितकाच प्रामाणिक प्रयत्न केला. नेपथ्यासह संगीत, ध्वनी-प्रकाश योजना आदी तांत्रिक बाजूही चांगल्या जमून आल्या.

पात्र परिचय 
 अमित कांबळे (काका), मनीषा झेले (काकू), मंजित माने (दिग्या), निशांत कावणेकर (निखिल), पृथ्वीराज घोरपडे (चिन्मय), राधिका खराडे (मिनी), साक्षी पाटील (चैताली), श्‍वेता सुतार (प्राजक्ता).

 लेखक, दिग्दर्शक : सागर बगाडे
 नेपथ्य : रोहित कांबळे
 पार्श्‍वसंगीत : निशांत गोंधळी
 रंगभूषा : शशिकांत यादव
 वेशभूषा : सरिता बगाडे
 प्रकाश व्यवस्था : आशिष हेरवाडकर
 रंगमंच व्यवस्था : सार्थक बगाडे, प्रतीक कांबळे, सार्थक भिलारी, यश पागडे, समीर पंडितराव.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Drama competition