
State Drama Competition : पती-पत्नीचे नाते उलगडणारे ‘खुराडं’
रत्नागिरी : नवविवाहितामध्ये नव्याची नवलाई असते. काही वर्षे चांगली जातात. मात्र, दोघांमध्ये संसाराचा गाढा ओढताना दोघेही नोकरी करणारी असली तर ओढाताण होते. एकमेकांना वेळ देणे शक्य होत नाही आणि संसारात खटके पडण्यास सुरुवात होते. अशी कौटुंबिक कथा लेखक ज्ञानेश्वर पाटील यांनी ‘खुराडं’ या नाटकातून मांडली. राज्य नाट्य स्पर्धेत येथील संकल्प कलामंच या संस्थेने सादर केलेल्या प्रयोगात पती-पत्नीच्या नात्याची गुंफण यशस्वी झाली. रसिकांनी टाळ्याच्या गजरात दाद दिली.
काय आहे नाटक ?
दीड वर्षापूर्वी लग्न झालेले विनित आणि अरुंधती या जोडप्याभोवती हे कथानक फिरते. कामाच्या व्यापात या दोघांनाही एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. दिवस गोड झाला तरी रात्र मात्र दोघांच्या चिडचिड करण्यात जाते. एकमेकांना आनंदाचे क्षण साधता येत नाहीत. पूर्वीसारखे प्रेम राहिले नसल्याची भावना दोघांमध्ये निर्माण होते. यावर तोडगा म्हणून ते दोघेही चार दिवस सुट्टी काढून हिल स्टेशनला जातात. तेथे हॉटेलमधील कामगार महिला वत्सला आणि तिचा नवरा आण्णा यांच्यातही त्या रात्री वाद होतात. मद्यप्राशन करून आलेला आण्णा वत्सलाला बेदम मारहाण करतो. अरुंधती ते भांडण सोडवते. पण या भांडणात उगाच मध्ये पडल्याने विनित तिच्यावर रागावते. याच दरम्यान अरुंधतीला अडचण येते.
त्यामुळे विनितचा रोमंटिक मूड फिस्कटतो. त्याची चिडचीड होते. तो तिला मनाला येईल, तसे बोलतो. दोघांनाही राग अनावर झाल्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतात. दुसऱ्या दिवशी आण्णा वत्सलाची माफी मागायला हॉटेलवर येतो. मोठ्या मनाची वत्सला त्याला माफही करते. अण्णा अरुंधती आणि विनीतचीही माफी मागतो. त्यांच्यातील समेट बघून या दोघांना नवल वाटते. यावेळी आण्णा आणि वत्सला या दोघांची समजूत घालतात. ‘माफी मागणे आणि माफ करणे’ हाच खरा संसार असतो, हे उमगल्याने हे दोघेही राग विसरून पुन्हा एकत्र येतात. अत्यंत कुशलतेने दिग्दर्शक गणेश गुळवणी यांनी खुराडं या नाटकातून मांडली आणि कलाकारांनी अभिनयातून चांगली साथ दिली. विनीत, वत्सला, अण्णा, अरुंधतीचा, बकुळा यांचा अभिनय रसिकांना भावला.
सूत्रधार आणि साहाय
पार्श्वसंगीत ः साईल शिवगण, निर्मिती प्रमुख ः विनोद वायंगणकर, गजानन गुरव, डॉ. दिलीप पाखरे, नेपथ्य ः नंदकुमार भारती, गोविंद ठिक, प्रकाश योजना ः विनयराज उपरकर, रंगभूषा ः प्रकाश ठिक, वेशभूषा ः गौरव कीर.
पात्र परिचय
विनित ः धनंजय कासेकर, वत्सला ः शलाका सावंत, अरुंधती ः आर्या शेट्ये, आण्णा ः कृष्णकांत साळवी, समिर ः सागर वायंगणकर, बबन-बकुळा ः सोनम साळुंखे, पक्या ः प्रकाश ठिक
Web Title: State Drama Competition Rajya Natya Spardha 2022 Husband Wife Relationship Khurad Drama
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..