Subhash Ghai : आता मल्टीस्टारर चित्रपट बनवणे झाले कठीण - सुभाष घई

चित्रपटांमध्ये वेगवेगळे विषय हाताळले गेले. त्यातच आता ओटीटीचे प्रस्थ अधिक वाढत चाललेले आहे.
subhash ghai
subhash ghai sakal

Subhash Ghai Interview : हिंदी चित्रपटसृष्टीतील शो मॅन सुभाष घई यांनी आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम आणि यशस्वी चित्रपट दिलेले आहेत. दिलीप कुमार, राज कुमार, अनिल कपूर, जॅकी श्राॅफ, संजय दत्त, माधुरी दीक्षित, मनीषा कोईराला, अनुपम खेर अशा अनेक कलाकारांबरोबर त्यांनी काम केले आहे.

मल्टिस्टारर चित्रपट, वेगवेगळ्या कथा कल्पना आणि सुमधुर संगीत असे त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. चित्रपटांबरोबरच ओटीटीसारख्या नव्या प्लॅटफाॅर्मवरही त्यांनी आपले कौशल्य दाखविले आहे.

त्यांची मुक्ता आर्टस ही कंपनी आता छोट्या पडद्यासाठी जानकी ही मालिका घेऊन येत आहे. त्यांच्या कर्मा चित्रपटातील "दिल दिया है जान भी देंगे..." हे आयकाॅनिक गाणे आता संस्कृतमध्ये आलेले आहे. एकूणच त्यांच्या वाटचालीबद्दल त्यांच्याशी केलेली बातचीत..

कोरोनानंतर मनोरंजन क्षेत्रामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. काही चित्रपटांचे प्रीमियर ओटीटीवर किंवा टीव्हीवर होत आहेत. ओटीटी माध्यम दिवसेंदिवस आपकी पकड घट्ट रोवत आहे. तुम्ही या क्षेत्रात गेली पाच दशके काम करीत आहात. या एकूणच बदललेल्या परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहता?

- कोरोनानंतर सगळ्याच क्षेत्रात खूप मोठा बदल झाला आहे. आपल्या देशातील चित्रही बदलले आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्र याला काही अपवाद नाही. या क्षेत्रात खूप मोठा बदल झाला आहे आणि भविष्यात तो आणखी होईल हे निश्चित.

शेवटी परिवर्तन हा जीवनाचा एक नियम आहे. त्यामुळे परिवर्तन तर होणारच आहे आणि आपल्याला ते स्वीकारावे लागणार आहे. पहिल्यांदा रेडिओ होता. त्यानंतर टीव्ही आला. टीव्हीबरोबरच नवनवीन तंत्रज्ञान आले. चित्रपटातील तंत्रज्ञान दिवसेंदिवस बदलत गेले. ब्लॅक ॲण्ड व्हाईट चित्रपट कलर झाला.

चित्रपटांमध्ये वेगवेगळे विषय हाताळले गेले. त्यातच आता ओटीटीचे प्रस्थ अधिक वाढत चाललेले आहे. एकीकडे हा सगळा बदल होत असताना आपली लोकसंख्यादेखील दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. पहिल्यांदा पन्नास कोटी लोकसंख्या होती. त्यानंतर ती नव्वद कोटी झाली आणि आता तर तिने शंभर कोटींचाही आकडा पार केला आहे.

त्यामुळे एकूणच वाढत्या लोकसंख्येचा विचार करता टीव्ही, चित्रपट आणि ओटीटी पाहणाऱ्यांची संख्यादेखील वाढलेली आहे. नवनवीन टॅलंट येथे आलेले आहे. त्यांच्या नवनवीन कथा-कल्पना येत आहेत. त्यांना ही विविध माध्यमे उपलब्ध आहेत आणि सगळ्यांना काम मिळत आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रस्थ वाढल्यामुळे त्याचा फटका हिंदी चित्रपटांना बसत आहे. पठाण आणि रॉकी और रानी की प्रेमकहानी असे काही चित्रपट वगळता अन्य चित्रपटांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये...

- १९८०-९० मधील काळ पाहिला तर त्यावेळी पाच ते दहा टक्के चित्रपट चालत नव्हते. आजही तशीच परस्थिती आहे. वर्षाला जितके चित्रपट येतील त्यातील सगळेच चालतील असे काही नाही. आज प्रेक्षकांना काही तरी नावीन्यपूर्ण हवे आहे.

आज मनोरंजनाची साधने वाढलेली आहेत. आजचा प्रेक्षक वर्ग हुशार झाला आहे. तो टीव्हीबरोबरच चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सीरीज पाहतो आहे. त्यामुळे त्याला सातत्याने काही तरी नवीन मनोरंजन हवे आहे. चांगले विषय त्याला हवे आहेत. मग तो चित्रपट असो की टीव्ही मालिका वा वेबसीरीज. आम्ही आमच्या मुक्ता आर्टसतर्फे चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेबसीरीज बनवीत आहोतच.

आताच तुम्ही ८०-९० च्या काळाबद्दल बोललात. तर एक काळ असा होता की समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट वेगवेगळे बनत होते. त्यांचा प्रेक्षक वर्ग निराळा होता. परंतु आता समांतर आणि व्यावसायिक चित्रपट एकत्रित वाटचाल करीत आहेत. आता समांतर चित्रपट दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत असे तुम्हाला वाटते का...?

- असे काही नाही. आजही विविध चित्रपट महोत्सवांमध्ये समांतर चित्रपट अधिक संख्येने दिसत आहेत. आजही समांतर चित्रपट जिवंत आहे. परंतु त्याचे स्वरूप बदलले आहे.

तुमच्या मुक्ता आर्टसतर्फे जानकी ही मेगामालिका येत आहे..काय सांगाल त्याबद्दल...?

- जानकी ही महिलाप्रधान मालिका आहे. एका मुलीची गोष्ट या मालिकेत मांडण्यात आली आहे. आजही आपल्याकडे मुलगी जन्माला आली की काही मंडळी नाक मुरडतात. मुलगी म्हणजे पराया धन समजतात. परंतु तसे काहीही नाही.

एक मुलगी आपले कुटुंब कशा प्रकारे सांभाळते आणि समाजात ती बदल कशी घडविते याची कहाणी या मालिकेत पाहायला मिळेल. महिला सक्षमीकरणावर भाष्य करणारी ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित होणार आहे.

आम्ही या मालिकेचे २०८ भाग बनविले आहेत. या मालिकेत चार ते पाच गाणी मी लिहिली आहेत. मी माझ्या काही चित्रपटांतही महिला सक्षमीकरणावर भाष्य केले आहे. मी महिलांचा खूप आदर व सन्मान करतो आणि मला ही प्रेरणा माझ्याआईकडून मिळाली. तिने माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत.

जानकीची कथा-कल्पना तुम्हाला कशी काय सापडली...

- ही कथा माझ्याकडे बरेच वर्ष होती. जेव्हा दूरदर्शनने मला सांगितले तेव्हा मी त्यांना माझी ही कथा ऐकविली. त्यांना ही कथा खूप आवडली आणि आम्ही चित्रीकरणाला सुरुवात केली.

या कथेवर तुम्ही चित्रपट बनविला असता तर जानकीच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीला घेतले असते..?

- रेखाला घेऊन या कथेवर चित्रपट काढला असता. तिचेच नाव माझ्या डोक्यात होते. परंतु प्रत्येक कथेची मागणी वेगळी असते. ही कथा छोट्या पडद्यासाठीच होती आणि आम्ही ही मालिका तयार केली.

तुमच्या खलनायक चित्रपटाला आता तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. मी असे ऐकले की जेव्हा या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा आमीर खान, अनिल कपूर असे काही कलाकार यातील मुख्य भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक होते. त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला होता असे समजते आहे. कितपत तथ्य आहे याबाबतीत..

- प्रत्येक दिग्दर्शकाला चांगल्या कलाकारांबरोबर काम करावे असे वाटत असते तसेच प्रत्येक कलाकाराला चांगल्या दिग्दर्शकाबरोबर काम करावे असे वाटते. जेव्हा मी खलनायक चित्रपट बनवीत आहेत अशी चर्चा सुरू झाली तेव्हा सगळेच एक्साईट झाले.

कित्येक जणांनी माझ्याशी संपर्कदेखील साधला आणि आपण काम करू इच्छितो असे मला सांगितले. परंतु या सगळ्या मंडळींनी नायकाची अर्थात हिरोची भूमिका साकारलेली होती. खलनायकाची भूमिका त्यांच्यासाठी वेगळी वाट होती.

त्यामुळे मी त्या सर्वांना सांगितले की खलनायकमधील बल्लूच्या भूमिकेची इमेज वेगळी आहे आणि त्या इमेजमध्ये जो परफेक्ट बसेल अशा कलाकाराला मी घेईन. मग त्या भूमिकेकरिता मला संजय दत्त योग्य वाटला आणि त्याला मी बल्लूच्या भूमिकेला निवडले.

१९९३ साली खलनायक चित्रपटाच्या वेळी तुम्हाला खूप मनस्ताप सहन करावा लागला. चोली के पीछे क्या है..या गाण्यावरून झालेला वाद आणि त्यातच संजय दत्तला झालेली अटक त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन काही दिवसांनी पुढे ढकलावे लागले का?

- खलनायक या चित्रपटाला घवघवीत यश मिळाले खरे. परंतु मला खूप त्रास सहन करावा लागला. संजय दत्तच्या अटकेमुळे खूप वादंग निर्माण झाला. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये चित्रपट प्रदर्शित करणे आम्हाला योग्य वाटले नाही.

त्यामुळे थोडे दिवस आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला आणि आमचा तो निर्णय किती योग्य होता हे चित्रपटाच्या यशावरून सगळ्यांच्या लक्षात आला. तसेच चोली के पीछे क्या है...हे गाणे अश्लील आहे असे सगळीकडे बोलले गेले.

त्याचाही आम्हाला त्रास झाला. खरं तर हे गाणे सेन्साॅरने संमत केलेले होते. त्यामुळे त्यावरून वाद निर्माण व्हायला नको होता. तरीही काही मंडळींनी गाणे न पाहता गोंधळ घातला होता. मला असे वाटते की एखादी गोष्ट चुकीची असेल तर सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु पहिल्यांदा ती गोष्ट आपण पाहावी आणि नंतरच त्यावर आपली प्रतिक्रिया द्यावी असे मला वाटते.

तुम्ही दिलीप कुमार, राज कुमार आदी अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. परंतु अमिताभ बच्चनबरोबर काम करण्याचा योग तुमचा हुकला आहे. काय सांगाल?

- देवा चित्रपट अमिताभला घेऊन करणार होतो. त्या चित्रपटाचा मुहूर्त झाला होता. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे ते प्रोजेक्ट पुढे गेले नाही आणि अमिताभबरोबर काम करण्याची माझी संधी हुकली, परंतु भविष्यात त्यांच्याबरोबर काम करण्याची प्रबळ इच्छा आहे.

तुमच्या कर्मा चित्रपटातील दिल दिया है जान भी देंगे ए वतन....हे गाणे आता संस्कृतमध्ये आले आहे. त्याबाबतीत काय सांगाल?

- कर्मा हा माझा एक आयकाॅनिक चित्रपट आहे आणि त्यातील दिल दिया है जान भी देंगे...हे गाणे आनंद बक्षी यांनी लिहिले आणि संगीत दिले आहे लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी. डॉ. रजनी जयराम यांनी या गाण्याचे संस्कृत शब्द लिहिले आहेत.

हे गाणे अजूनही कमालीचे लोकप्रिय आहे. सगळ्यांच्या मनात देशभक्ती जागविणारे आहे. आजही १५ आॅगस्ट रोजी हे गाणे सगळीकडे ऐकविले जाते. कविता कृष्णमूर्तीच्या आवाजातील हे गाणे आता आम्ही संस्कृतमध्ये आणलेले आहे.

तुम्ही मल्टिस्टारर चित्रपट अधिक केले आहेत. त्यामुळे एखाद्या कलाकाराची भूमिका अधिक आणि एखाद्याची कमी असे कधी झाले का?

- त्यावेळी प्रत्येक कलाकार एकमेकांचा आदर करायचा. त्यावेळी कलाकाराला स्वतःला असुरक्षित फारसे वाटत नव्हते. परंतु आताचे चित्र काहीसे निराळे आहे. सध्या मल्टिस्टारर चित्रपट बनवणे कठीण झाले आहे कारण सध्याच्या कलाकारांना भेटणे मुश्कील झाले आहे. त्यांना भेटण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे.

त्यांच्या सचिवापसून ते काॅश्च्युम डिरेक्टरपर्यंत सगळ्यांना भेटावे लागते आणि मग त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागते. मग अशा पद्धतीने एखाद्या कलाकाराला भेटावे लागत असेल तर मल्टिस्टारर चित्रपट कसे निघणार...

तुम्ही सनईचौघडे आणि विजेता या दोन मराठी चित्रपटाची निर्मिती केली. आता मराठी चित्रपट बनविणार आहात का?

- नक्कीच. आमचा एक चित्रपट लवकरच येणार आहे. ही एका मुलीची कहाणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com