नाती जपायला आवडतं... 

चिन्मयी खरे
बुधवार, 28 जून 2017

"कंडिशन्स अप्लाय' या आजच्या काळातल्या चित्रपटातून प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्याबरोबर रंगलेल्या या गप्पा- 

"कंडिशन्स अप्लाय' या आजच्या काळातल्या चित्रपटातून प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्याबरोबर रंगलेल्या या गप्पा- 

"कंडिशन अप्लाय' चित्रपटाबद्दल काय सांगशील? 
- हा चित्रपट आजच्या काळातला आहे. तरुणाईचा आहे, प्रेमाचा आहे, दोन अशा व्यक्तींचा आहे ज्यांना एकमेकांवर प्रेम तर करायचं आहे; पण लग्न करायचं नाहीय. त्याच्यासाठी त्यांनी घेतलेला शोध म्हणजे "कंडिशन्स अप्लाय' हा चित्रपट आहे. अभय नावाची भूमिका या चित्रपटात मी करत आहे. तर स्वराची भूमिका दिप्ती देवी करत आहे. या दोन भिन्न स्वभावांच्या व्यक्तींमध्ये प्रेम फुलतं. अभय त्याच्या आयुष्यात रमणारा, एकलकोंडा, वैतागलेला, नात्यांपासून दुरावलेला, तर स्वरा याच्या एकदम विरूद्ध आहे. ही दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटतात. पहिल्यांदा एकमेकांचा दुस्वास करतात. त्यानंतर त्यांच्यात मैत्री होते आणि प्रेम फुलतं. त्यांना एकत्र तर रहायचयं; पण लग्न करायचं नाहीय. या चित्रपटात ते त्यांचं नातं शोधतानाच त्यांना स्वत:ला काय हवंय याचा शोधही सुरू असतो. तरुणाईच्या विचारांच्या जवळ जाणारा किंवा आत्ताच्या परिस्थितीच्या जवळ जाणारा असा हा चित्रपट आहे. ही खूप ताजी, तसंच माणसाला अंतर्मुख करायला लावणारी कथा आहे. 

"लिव्ह इन'ला आपल्या देशात अजूनही फारशी मान्यता नाही. त्यामुळे समाजाचं ओझं "लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या जोडप्याला पेलावं लागतं, त्याबद्दल तुला काय वाटतं? 
- अजूनही आपला देश एवढा प्रगत झालेला नाही. लग्न हे घरच्यांच्या मान्यतेने, साक्षीने होतं. त्याचा कायदेशीर पुरावा आपल्याकडे असतो; पण तसं अजून लिव्ह इनचं नाही. पण हळूहळू आपला समाज त्याला रूळतो आहे. पूर्वी कदाचित जेवढा धक्का बसला, तेवढा आता बसणार नाही. कारण हळूहळू आपण त्याला सरावू होऊ लागलो आहोत. लिव्ह इन पूर्णत: स्विकारलं जाण्यासाठी आणखी खूप काळ जाईल, असं मला वाटतं. लग्नासाठी पर्याय म्हणून लोकांनी लिव्ह इनचा पर्याय शोधला; पण तो किती यशस्वी आहे, ते ती गोष्ट अनुभवल्याशिवाय किंवा त्या गोष्टीची जबाबदारी आल्याशिवाय कळणार नाही. कारण लोक लग्नातल्या जबाबदाऱ्या किंवा बंधनं टाळण्यासाठी लिव्ह इनचा पर्याय निवडतात. लिव्ह इनमध्येही त्याच जबाबदाऱ्या किंवा बंधनं आली, तर लग्न बरं का लिव्ह इन हा प्रश्‍न उरतोच. त्यामुळे हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. 

दिप्ती देवीबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? 
- दिप्ती माझी खूप जुनी मैत्रीण आहे. आम्हा दोघांना खूप वर्षांपासून एकत्र काम करायचं होतं; पण योग जुळून येत नव्हता. आता कंडिशन अप्लायच्या निमित्ताने तो जुळून आला. स्वत:ला कायम अपडेट करणारी आणि चांगल्या चांगल्या भूमिकांमधून स्वत:ला घडवणारी अशी ती अभिनेत्री आहे. कारण मी तिची सगळी कामं बघत आलो आहे. ज्या पद्धतीने तिने स्वत:ला अभिनेत्री म्हणून घडवलं आहे ते खूपच उल्लेखनीय आहे. या चित्रपटातही तिने स्वराची भूमिका उत्तम केली आहे. 

"करार', "फुगे', "हृदयांतर', "कंडिशन्स अप्लाय' या तुझ्या चित्रपटांतून नात्यांचे विविध पैलू उलगडले गेले आहेत. नात्यांविषयी तुझं काय मत आहे? 
- मला नाती जपायला खूप आवडतं. माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर हेच संस्कार केले आहेत की, नेहमी माणसांना धरून ठेवलं पाहिजे. 

हे चित्रपट तर माझे एक अभिनेता म्हणून आहेत. पण वैयक्तिक आयुष्यात माझा "कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन वर्ष आता होतील. 

तरीही आमच्या सगळ्यांचा व्हॉट्‌सऍप ग्रुप अजूनही तेवढाच ऍक्‍टिव आहे, जेवढा प्रदर्शनाच्या वेळी होता. 

सगळ्यांना धरून ठेवणं आणि सगळ्यांना स्वत:बरोबर घेऊन पुढे जाणं, यात मला खूप आनंद मिळतो. मी कलाकार आहे, का दिग्दर्शक, का निर्माता या सगळ्यांपेक्षा माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींमुळे माझ्या आयुष्यात एक चांगली गोष्ट घडतेय. ती चांगली गोष्ट शेअर करण्याचा प्रत्येकाला तेवढाच अधिकार आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझ्या माणसांचा खूप मोठा वाटा आहे. 

Web Title: subodh bhave interview