esakal | Subodh Bhave : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन सुबोध भावेचा चिमटा, पाहा काय म्हणाला...
sakal

बोलून बातमी शोधा

Subodh Bhave_Petro-deisel

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन सुबोध भावेचा चिमटा, म्हणाला...

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : पेट्रोल-डिझेलचे दर दिवसागणिक वाढतचं आहेत. याचा सर्वच स्तरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. सोशल मीडियातून सामान्य नागरिक यावर अधुमधून भाष्य करताना दिसतात. पण सेलिब्रेटी यावर बोलताना क्वचितच दिसतात. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीवर अभिनेता सुबोध भावे याने मार्मिक भाष्य केलं आहे. फेसबुक पोस्ट लिहून त्यानं यावरुन फटकारे ओढलेत.

सुबोधनं आपल्या पोस्टमधून सोनं-चांदी आणि पेट्रोल-डिझेलची तुलना केली आहे. पेट्रोल-डिझेलने सोन्या-चांदीचा माज उतरवला आहे. स्वतःबरोबर अख्खा बाजारभाव वाढवण्याच यांचं कर्तृत्व अफाट आहे. हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. अशा शब्दांत सुबोध भावेनं राजकीय कोरडे ओढले आहेत. पण सुबोधच्या लिखाणावरुन त्याला सोशल मीडियातून टार्गेट करण्यात आलं असून ही सामान्य पोस्ट नव्हे तर राजकीय पोस्ट असल्याचं म्हणतं काहींनी त्याच्यावर टीका केली आहे. तर काहींनी सुबोधनं पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केल्याबद्दल त्याचं कौतुक केलं आहे.

काय म्हणाला सुबोध भावे?

सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदीचा माज कोणीतरी उतरवला पाहिजे. आपल्या किंमतीमुळे आपण लैच भारी आहोत असं सोन्या-चांदीला वाटायला लागलं होतं. दरवर्षी सण आला की त्यांचा रुबाब वाढायचा. पण आता नाही.....कारण आता पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या, चांदीची मस्ती उतरवली आहे. आता दागिने पण यांचेच करणार, बँकेत ठेव म्हणून पण हेच ठेवणार. स्वतःबरोबर अख्खा बाजारभाव वाढवण्याच यांचं कर्तृत्व अफाट आहे. हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

Subodh Bhave

Subodh Bhave

काय आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव?

पेट्रोल-डिझेलच्या दरात आजसुद्धा वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल ३० पैशांनी तर डिझेल ३५ पैशांनी महागलं आहे. त्यामुळे दिल्लीत या दोन्ही इंधनांचा दर अनुक्रमे १०४.१४ रुपये आणि ९२.८२ रुपये इतका आहे. तर मुंबईत पेट्रोल ११०.१२ तर डिझेल १००.६६ रुपये प्रतिलिटर झालं आहे. पेट्रोलबरोबरच डिझेलने महाराष्ट्रात शंभरी पार केली आहे. त्यामुळे देशात महागाईची सर्वाधिक झळं ही महाराष्ट्रालाच बसली आहे.

loading image
go to top