esakal | ऑन स्क्रीन : डोकावून बघा पण... : इम्पिचमेंट | Impeachment
sakal

बोलून बातमी शोधा

Impeachment
ऑन स्क्रीन : डोकावून बघा पण... : इम्पिचमेंट

ऑन स्क्रीन : डोकावून बघा पण... : इम्पिचमेंट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- सुदर्शन चव्हाण

तुम्हाला रायन मर्फी माहिती आहे का? अमेरिकन टेलिव्हिजनच्या सुवर्णकाळात ‘फर्स्ट मॅन ऑफ टेलिव्हिजन’ बिरुद मिरवणारा हा मनुष्य एका वर्षात ४-५ मोठ्या सिरीज निर्माण करतो. तो एफएक्स वगैरे वाहिन्यांसोबत काम करतोच, मात्र एकट्या नेटफ्लिक्ससोबतच्या कामाचे त्याला वर्षाला साडेचारशे कोटी रुपये मिळतात. अमेरिकन क्राइम स्टोरी, अमेरिकन हॉरर स्टोरी अशा मालिकांचा तो लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. रायन मर्फी ते अशा पद्धतीने हाताळतो की प्रेक्षक गुंतून जाईल. त्याच्याकडं प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचं उत्तम कसब आहे. अमेरिकन हॉरर स्टोरीचे सलग दहा पर्व यशस्वी करून दाखवत त्याने त्याची हॉरर जॉनरमधील हातोटी सिद्ध करून दाखवलीच होती. पण क्राइम स्टोरी या मालिकेत मात्र त्याने त्याहून अनेक योजनेत पुढे जात यश मिळवलं आहे.

अमेरिकन क्राइम स्टोरी ही एक अँथॉलॉजी सिरीज (मालिका) आहे. ज्यात प्रत्येक पर्वात एक नवीन केस घेतली जाते आणि त्याचा आधीच्या सीजनशी काहीही संबंध नसतो. या सर्व केसेस अमेरिकेतील गाजलेल्या क्राइम स्टोरीज आहेत. पहिल्या पर्वात त्यांनी ‘ओ जे सिंप्सनच्या’ खुनाची केस घेतली होती. दुसरं पर्व ‘जियानी वर्साची’ या जगप्रसिद्ध डिझाइनरच्या खूनावर आधारित होतं. तर टेलिव्हिजनवर आता सुरू असलेलं तिसरं पर्व ‘बिल क्लिन्टन’ आणि ‘मोनिका लुवेंस्की’च्या प्रकरणावर लक्ष केंद्रित करतं. लुवेंस्की प्रकरण ही काही क्राइम स्टोरी नव्हे. इथे दोन प्रौढ लोक एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवत होते. इतकाच तो काय मुद्दा होता. पण त्या दोघांतील एकजण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बिल क्लिन्टन होता आणि दुसरी मुलगी केवळ २१ वर्षांची होती. ही गोष्ट मोठी झाली जेव्हा त्यावर खटला उभा राहिला आणि नंतर क्लिन्टन यांना ‘इम्पिचमेंट’ला सामोरं जावं लागलं. हे सगळं घडलं कारण मोनिका तिच्या प्रकरणाबद्दल एका मैत्रिणीला सगळं काही सांगत होती. आणि ती मैत्रीण (लिंडा ट्रीप) हे सगळं रेकॉर्ड करायची. या सगळ्या कॅसेट्स देशापुढं आल्या आणि त्यावर सगळं राजकारण उभं राहिलं. ही क्राइमपेक्षा राजकीय स्टोरी अधिक आहे. पण मालिका त्यातील ‘प्रत्यक्ष राजकारणाला’ बगल देते आणि संपूर्ण कथा मोनिका, लिंडा आणि पॉला जोन्स या तीन स्त्रियांच्या दृष्टिकोनातून दाखवते.

या घटनांच्या वीस वर्षानंतर ‘मी टू’ची चळवळ उभी राहिली. पण तेव्हा घटनाक्रम असा झाला, की क्लिंटन त्यातून सुखरूप बचावले आणि मोनिका लुवेंस्की मात्र संपूर्ण देशासाठी एक हास्यास्पद गोष्ट बनून राहिली. मालिका तिचं राजकारण या जुन्या विचारांमध्ये शोधते. जिथे रूममध्ये बोलवणारा बिल क्लिन्टन दोषी नाही, तर सहन करणारी पॉला जास्त दोषी आहे. आज २५ वर्षानी हे सगळं पाहताना आपण कुठल्या दृष्टिकोनातून ती पाहतो हे महत्त्वाचं. आजवर मालिकेच्या या पर्वाचे दहा पैकी पाच भाग प्रदर्शित झाले आहेत. ती शेवटापर्यंत कशी जाईल हे माहिती नाही. पण आतापर्यंत तरी कथेतील ताण, राजकारण आणि दृष्टिकोनांचा खेळ चांगला जमला आहे. रायन मर्फीच्या हाती पुढील कथाही चांगलीच असेल असा विश्वास आहेच.

ही मालिका केवळ राष्ट्राध्यक्षाचं प्रेम प्रकरण एवढ्यावरच मर्यादित राहिली असती. परंतु रायन मर्फीच्या दिग्दर्शनाखाली तिचा सर्व बाजूंनी विचार होतो. प्रत्येक सीन इंटरेस्टिंग होतो, पुढे काय होणार ही उत्सुकता टिकून राहते. आणि केवळ कोणाच्या घरात डोकावून बघणे त्याच्या पलीकडे ही कथा जाते. म्हणून ‘डोकावून बघायचं’ असेल तर कसं, याचा वस्तुपाठ म्हणून ही मालिका बघावी.

loading image
go to top