येताहेत साराभाई... 

sumeet raghavan
sumeet raghavan

नव्या जोमाने, नव्या दमाने! 
"साराभाई वर्सेस साराभाई' ही लोकप्रिय विनोदी मालिका "स्टार वन' वाहिनीवरून प्रसारित व्हायची. आता ही "हॉटस्टार'वर वेबसीरिजच्या रूपात पुढील महिन्यापासून येत आहे. त्याबद्दल मालिकेतील साहिल साराभाई म्हणजेच सुमित राघवनशी रंगलेल्या या धमाल गप्पा- 

आमचं एकत्र कुटुंब... 

- 2005 मध्ये आमची मालिका संपली. म्हणजे आम्ही तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करतोय. पण आमच्यात काहीच बदल झालेला नाही. सगळे आजही तेवढीच धम्माल करतो. आम्ही जेव्हा एकत्र भेटतो तेव्हा तर नुसती धम्मालच असते. आताही शूटिंग सुरू आहे तर धमाल मस्तीच सुरू आहे. आम्ही एवढ्या वर्षांनंतर एकत्र काम करतो आहोत, असं वाटतच नाहीय. तीच धमाल, तीच मस्ती आम्ही परत अनुभवत आहोत. आम्ही शूटिंग करताना इतकी मस्ती करतो की आमच्या दिग्दर्शकांना आम्हाला ओरडावं लागतं. ती शाळेतली मुलं असतात ना, ज्यांना ओरडून गप्पं करावं लागतं. अगदी आमचंही तस्संच आहे (हसत). एवढी मजा आम्ही कुठेच करत नाही. कधी मी आणि सतीशकाका इतरांची खेचत असतो. कधी सगळे मिळून त्यांची टेर खेचतात. जेवायला एकत्र सगळे डबे उघडून बसतो. मी आणि सतीशकाका गाणी म्हणतो. शूटिंग सुरू नसतानाही, स्क्रिप्ट वाचत असतानाही आमची मस्ती काही थांबत नाही. शूटनंतर जबडा दुखायला लागतो, एवढं आम्ही हसतो. 

परतण्याचा निर्णय प्रेक्षकांमुळेच... 
दोन वर्षांपूर्वी आम्ही "साराभाई'मधल्या सगळ्या कलाकारांनी माझ्या घरी एक पार्टी केली होती. तेव्हा आम्हाला जाणवलं की, आजही "साराभाई वर्सेस साराभाई' प्रेक्षकांमध्ये तितकीच लोकप्रिय आहे. लोकांनी अक्षरश: ती मालिका इंटरनेटवर जाऊन अनेक वेळा पाहिली आहे. म्हणजे 2005 मध्ये ही मालिका संपली, तेव्हा काही मुलं पाचवी सहावीत होती. आता ती मोठी झाली असली तरी आजही ती मुलं ही मालिका आवडीने पुनः पुन्हा पाहतात. त्यांना आणखी साराभाई बघण्याची खूप तीव्र इच्छा आहे. एवढी साराभाईची क्रेझ अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. जितक्‍या आतुरतेने प्रेक्षक साराभाईची वाट पाहत होते, तितक्‍याच आतुरतेने आम्हीही ती परत येण्याची वाट पाहत होतो. म्हणून मग जेव्हा भेटलो तेव्हा "साराभाई वर्सेस साराभाई' ही मालिका परत यायला पाहिजे हे ठरवूनच टाकलं. 

साराभाईचं वैशिष्ट्य... 
या मालिकेचा दर्जा जो आहे तो तसाच राहणार आहे. किंबहुना आणखी जास्त चांगला होईल. साराभाईच्या स्क्रिप्ट आणि डायलॉग्जमुळे, विनोदाच्या दर्जामुळे, साराभाईच्या पात्रांमुळे, टायटल सॉंगमुळे साराभाई सगळ्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे या सगळ्याच गोष्टी आम्ही तशाच ठेवल्या आहेत. पण या वेळी शूटिंगचा दृष्टिकोन बदललाय. आमचा दिग्दर्शक ज्या पद्धतीने शूट करतो आहे, ते थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. साराभाईची मजा तीच आहे की आम्ही पाच-सहा जण जेव्हा एकत्र येऊन मजा करतो, तीच तुम्हाला पडद्यावर पाहायला मिळते. ही टिपीकल अशी मालिका नाही. याव्यतिरिक्त तुम्हाला वेगळं काय आहे, हे पाहण्यासाठी थोडं थांबावं लागेल. कारण या वेळची सुरुवातच दणक्‍यात करणार आहोत आम्ही... पाहाच तुम्ही! 

"बेस्ट' होणार आणखी "बेटर'! 
- साराभाई ही हिंदीतली बेस्ट कॉमेडी मालिका मानली जाते. बहुतेक वेळा असं होतं की, एखाद्या मालिकेचा ओव्हरडोस झाला की त्याचा लोकांना कंटाळा यायला लागतो. पण साराभाईच्या बाबतीच उलटं झालं. ही मालिका पहिल्यांदा आठवड्यातून एकदा लागायची. आम्ही त्याचे अवघे सत्तर भाग केले होते. पण ही मालिका नंतर रोज दाखवायला लागलो. पण झालं असं की, या मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होण्याऐवजी वाढला. आम्हाला लोक जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा त्यांनी आम्हाला विचारलं, की परत कधी येताय. त्यांना मायाचे डायलॉग्ज्‌, रोसेशच्या कविता अगदी तोंडपाठ आहेत. त्यामुळे ही मालिका परत एकदा वेबवर आल्यावर प्रेक्षकांचं आमच्यावरचं प्रेम कमी वगैरे होईल, असं आम्हाला वाटत नाही किंबहुना आम्ही त्याचा विचारच करत नाही. हीच खरी साराभाईची ताकद आहे, असं मला वाटतं. 

विनोदी भूमिका आव्हानात्मक... 
- खरं तर विनोदी भूमिका करणं हे सगळ्यात जास्त आव्हानात्मक असतं. निर्माते-दिग्दर्शकांना जर वाटलं की, मी चांगली कॉमेडी करतो तर ती खूप मोठी कौतुकाची थाप समजेन. कारण मला असं वाटतं, प्रेक्षकांना रडवणं खूप सोपं आहे. पण हसवणं खूप कठीण आहे. मी अशा वेगळ्या आव्हानात्मक भूमिका असतील तर नक्कीच स्वीकारतो. जसं की माझं एक नाटक सध्या सुरू आहे. "एक शून्य तीन' नावाचं. त्यात मी शोध पत्रकाराची भूमिका करतोय; जो एक मर्डर मिस्ट्री सोडवतो. "एक शून्य तीन' ही एक हेल्पलाईन आहे, जी महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी पोलिसांनी सुरू केली आहे. त्याला धरून आम्ही हे नाटक करतो आहोत. नावाचा आणि थीमचा संबंध नसला तरीही कथेचा संबंध नक्कीच आहे. आजकाल स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्याला कसं तोंड देता येईल वगैरे बाबींवर ही कथा फिरते. स्त्रिया या पुरुषांइतक्‍याच समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांनाही तितकाच मान-सन्मान मिळाला पाहिजे. अशा प्रकारची एक भूमिका घेऊन आम्ही हे नाटक करत आहोत. 

आगामी प्रोजेक्‍टस... 
सध्या तरी मी साराभाईवरच माझं लक्ष केंद्रित केलंय. पण त्यानंतर एक मराठी चित्रपट करणार आहे. लवकरच सांगेन त्याविषयी... 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com