
सुंदरा मनामध्ये भरली: मालिकेतील दृश्यामुळे प्रेक्षक भडकले
कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamadhe Bharli) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही मालिका एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. याच प्रोमोवर प्रेक्षक भडकले असून अनेकांनी मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. या प्रोमोमध्ये अभ्याची आई आणि दौलत यांच्यामध्ये भांडण झाल्याचं दाखवलं आहे. मात्र हे भांडण अत्यंत हिंसक पद्धतीने दाखवल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत.
प्रोमोमध्ये काय दाखवलं?
अभ्याची आई दौलतला घरातून निघून जाण्यास सांगते. हे घर फक्त आपलं आहे आणि त्याच्यावर कोणीही हक्क गाजवू शकत नाही, असं ती दौलतला ठणकावून सांगते. मात्र दौलत त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही. अभ्याची आई घराच्या दारावर दौलतच्या नावाची पाटी पाहून संतापते आणि ती काढण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी दौलत तिला धक्का देऊन खाली पाडतो. इतकंच नव्हे तर तो तिचा अस्थमाचा पंप पायाने तुडवतो. या सर्व हिंसक दृश्यांवर संतापलेल्या प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा: 'मन उडू उडू झालं' मालिकेतील 'शलाका' आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-
'अती होत चाललंय आता. ही मालिका फक्त एकाच बाजूने दाखवली जाते. या बापलेकांना कधी शिक्षा मिळणार? कधी तरी बघणाऱ्यांचा पण विचार केला पाहिजे', असं एकाने लिहिलं. तर 'दर्जा किती घसरवावा हे चॅनेलला कळत नाही. काय तर म्हणे आनंदी-आनंद दाखवला की टीआरपी कमी होतो. म्हणून लॉजिकलेस काहीही दाखवायचं,' अशा शब्दात दुसऱ्याने राग व्यक्त केला. 'मला आजकाल असं वाटायला लागलंय की लेखका विकृत मनोवृत्तीचा झाला आहे का काय? कधीही काहीही सकारात्मक दाखवत नाहीत. कायम दुष्ट प्रवृत्तीचा विजय आणि नुसती नकारात्मकता,' असं तिसऱ्याने लिहिलं. याआधी मालिकेच्या शर्यतीच्या एपिसोडवरही नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
Web Title: Sundara Manamadhe Bharli Viewers Expressed Anger Over The Scenes In The Serial
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..