आदिती झालीयं डॉ.अंजली

चिन्मयी खरे  
बुधवार, 24 मे 2017

'का रे दुरावा' मालिकेतून आदितीची सोज्वळ, गोड आणि प्रेमळ भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरूची आडारकर आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यानिमित्ताने तिच्याकडून जाणून घेतलेय तिच्या नव्या अंजली या मालिकेविषयी... 

'का रे दुरावा' मालिकेतून आदितीची सोज्वळ, गोड आणि प्रेमळ भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरूची आडारकर आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यानिमित्ताने तिच्याकडून जाणून घेतलेय तिच्या नव्या अंजली या मालिकेविषयी... 

"का रे दुरावा' या मालिकेतून आदिती अशी ओळख निर्माण झालेली सुरूची आडारकर झी युवावरील "अंजली' या डॉक्‍टरी पेशावर आधारित मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. ही मालिका एका हॉस्पिटलच्या पार्श्‍वभूमीवर घडणार आहे. ही कथा आहे डॉक्‍टर अंजलीची. ती तिच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्‍टर बनते. सुरूचीशी गप्पा मारताना तिच्या या भूमिकेविषयी जाणून घेतलं. ती म्हणते, "ती एका गावातून आलेली साधी मुलगी आहे. ती एक इंटर्न आहे. डॉक्‍टर झाल्यावर जनार्दन खानापूरकर सरांच्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करायची हे तिचं स्वप्न आहे. ती जनार्दन सरांना आपले आदर्श मानते. ती खूप भावूक आहे. ती जनार्दन सरांच्या प्रत्येक तत्त्वावर विश्‍वास ठेवते. त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यातील या नात्यापलीकडे एक माणुसकीचं नातंही असतं. ते आपण जपायला हवं. या गोष्टीवर तिचा विश्‍वास आहे. तिला इतरांची मदत करायला खूप आवडतं. म्हणूनच कदाचित ती डॉक्‍टरकीचा पेशा खूप उत्तम सांगड घालून निभावू शकते.' अंजली ही मालिका हा मराठीतील पहिलाच प्रयोग आहे. ज्यामध्ये पूर्णपणे डॉक्‍टर आणि हॉस्पिटलच्या एकूण पार्श्‍वभूमीवर सगळं कथानक फिरतं. 

या मालिकेत सुरूची एका डॉक्‍टरच्या भूमिकेत दिसली आहे; पण ती खऱ्या आयुष्यात इंग्रजी या विषयात पदवीधर आहे. ती नृत्यदेखील करते. तिला लहानपणापासून अनेक गोष्टी कराव्याशा वाटायच्या. डॉक्‍टर या पेशाचा आणि तिचा दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता; पण या मालिकेच्या निमित्ताने तिला डॉक्‍टरांच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी बारकाईने शिकाव्या लागल्या. ती म्हणते, "मला डॉक्‍टरांबद्दल पहिल्यापासूनच मनात आदर होता आणि आहे. या मालिकेच्या निमित्ताने डॉक्‍टरची भूमिका साकारायला मिळाली. या भूमिकेशी जवळीक व्हावी किंवा प्रशिक्षण मिळावे यासाठी डॉक्‍टरांचं एक वर्कशॉप सेटवरच ठेवलं होतं. या मालिकेत आम्ही फक्त अभिनयच नाही तर डॉक्‍टरांचं प्रतिनिधित्व करत आहोत. त्यामुळे कोणतीही चुकीची गोष्ट आमच्याकडून होऊ नये म्हणून ही काळजी आम्ही घेतलीय. 

झी मराठीवरील वरील "का रे दुरावा' या मालिकेमुळे तिची आदिती ही ओळख निर्माण झाली होती. आता या मालिकेत ती अंजलीच्या भूमिकेत दिसतेय. तिने साकारलेल्या या दोन भिन्न व्यक्तिरेखांमधे काय फरक जाणवला हे विचारल्यावर ती म्हणाली, "आदिती ही एक गर्ल नेक्‍स्ट डोअर अशी होती. प्रत्येकाला आपल्या घरात अशी मुलगी किंवा अशी सून असावी असं वाटेल अशी ती होती. अंजलीला पण मदत करायला फार आवडतंच आणि तिला समाजसेवा करायलाही आवडतं. ती फक्त पैशासाठी कोणतंही काम करत नाहीयं.' या मालिकेत सुरूची आडारकर, राजन भिसे, हर्षद अटकरी यांच्या मुख्य भूमिका आहेत; पण याशिवाय रेशम श्रीवर्धनकर, अभिषेक गावकर, भक्ती देसाई, उमा सरदेशमुख, योगेश सोमण, मीना सोनावणे, उमेश ठाकूर, संकेत देव, अर्चना दाणी हे कलाकार या मालिकेत काम करत आहेत. अंजली आणि सुरूची या दोघी कशा वेगळ्या आहेत किंवा दोघांमध्ये काय साम्य आहे हे विचारल्यावर ती हसून म्हणाली की, "सगळ्यात मोठा फरक आहे तो म्हणजे सुरूची डॉक्‍टर नाहीय, तर साम्य म्हणजे मला अंजलीप्रमाणेच लोकांना मदत करायला आवडतं; पण अंजली डॉक्‍टर आहे. त्यामुळे ती औषधं देऊन लोकांशी चांगलं बोलून त्यांच्यावर उपचार करून त्यांना मदत करते; पण मला ते शक्‍य नाही. त्यामुळे मी मला जमेल तशी लोकांना मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करते.' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suruchi adarkar interview