सुशांतने एका महिन्यात बदलले ५० सिमकार्ड? शेखर सुमन यांचा सवाल 'कोणाला घाबरत होता सुशांत?'

टीम ई सकाळ
बुधवार, 1 जुलै 2020

शेखर सुमन या प्रकरणात सतत सीबीआय तपासणीची मागणी करत आहेत. सुशांतच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी चर्चा करताना अनेक प्रश्न विचारले. 

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अभिनेता शेखर सुमन सुशांतच्या पटना येथील घरी पोहोचले होते. तिथे त्यांनी सुशांतच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि सुशांतला श्रद्धांजली वाहिली. शेखर सुमन या प्रकरणात सतत सीबीआय तपासणीची मागणी करत आहेत. सुशांतच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी चर्चा करताना अनेक प्रश्न विचारले. 

हे ही वाचा: सुशांतच्या मृत्युच्या आधीच विकिपीडीयावर त्याची वेळ अपडेट? 

शेखर सुमन यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शेखर माध्यमांशी बोलताना दिसत आहेत. ते म्हणाले, 'तिथे कोणतीच सुसाईड नोट नव्हती. जर सुसाईड नोट असती तर ही केस सरळ सरळ ओपन होती आणि ती केव्हाच बंद देखील झाली असती. मात्र आता सुसाईड नोट नसल्याने अनेक प्रकारचे प्रश्न उभे राहत आहेत.'

शेखर पुढे सांगतात की, 'एक मुलगा जो रात्रभर पार्टी करत होता, सकाळी उठुन ज्युस प्यायला, सगळ्यांमध्ये येऊन बसला त्याच्या मनात असं अचानक काय आलं की तो म्हणाला असेल चला उठा आता आत्महत्या करु. ही गोष्ट पटत नाहीये. सीसीटीव्ही कॅमेरासोबत काहीतरी छेडछाड केली गेली आहे. त्याने गेल्या महिन्यात जवळपास ५० सिमकार्ड बदलले होते. त्याने हे इतके सिमकार्ड का बदलले असावेत? जेव्हा आपण कोणाला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो, कोणापासून वाचण्याचा प्रयत्न करतो, कोणी आपल्याला धमकी देत असतं, जेव्हा काहीतरी चुकीचं होत असते तेव्हा सिमकार्ड बदललं जातं.'

शेखर पुढे असंही सांगतात की, 'नंतर जी उंची सांगितली जात आहे ती खरंतर कमी आहे कारण मुंबईमध्ये एवढ्या उंचीवर छप्पर नसतं. त्यात तो स्वतः ६ फुट उंचीचा होता तर मग बेडवर चढून पंख्याला गळफास घेण्यासाठी जागाच उरत नाही. त्यानंतरही मग पहिले कोणत्या तरी कपड्याने, मग बाथरोबने मग कोणत्यातरी कुर्त्याने लटकून फाशी घेतल्याचं वेगवेगळं कारण समोर येत आहे.'

शेखर यांनी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली की 'त्याच्या गळ्यावर जे लाल निशाण आहे ते एखाद्या दोरीचे निशाण वाटत आहेत. जेव्हा फाशी घेतो तेव्हा व्ही सारखं निशाण असलं पाहिजे कारण दोरी वरच्या बाजूला आहे. जर कुर्त्याने घेतली असेल तर ते निशाण आणखी मोठं असायला हवं होतं. मी कोणी सीबीआय किंवा फॉरेन्सिक एक्सपर्ट नाही पण तेच बोलतोय जे प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात आहेत.'     

sushant singh rajput death shekhar suman told actor changed 50 sim cards  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput death shekhar suman told actor changed 50 sim cards