दिल, दोस्ती : नारळ आणि आंबा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swapnil Bandodkar and Avdhoot Gupte
दिल, दोस्ती : नारळ आणि आंबा!

दिल, दोस्ती : नारळ आणि आंबा!

- स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते

आपल्या एक से बढकर एक गाण्यांनी रसिकांना मोहिनी घालणारे लोकप्रिय गायक व संगीतकार जोडी म्हणजे अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर. या जोडीने आतापर्यंत आपल्या आवाजानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. चित्रपटांबरोबरच अनेक कार्यक्रमांत या जोडीला एकत्र गाताना रसिकांनी पाहिलं आहे. तसेच, यांच्या मैत्रीच्या चर्चासुद्धा नेहमीच रंगतात. स्वप्नील आणि अवधूत लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहेत. यांच्या कुटुंबामध्ये अतिशय घनिष्ठ संबंध असल्यामुळं लहानपणापासूनच यांच्या भेटीगाठी होत होत्या.

अवधूत म्हणाला, की आम्ही दोघंही मोठे होत गेलो, तशी आमच्यातील मैत्री फुलत गेली, अतिशय घट्ट होत गेली. स्वप्नीलच्या स्वभावाबद्दल अवधूतनं सांगितलं, ‘‘स्वप्नीलच्या स्वभावाबद्दल बोलायला लागल्यावर मला नारळाची उपमा आठवते. नारळ हा सगळ्यांसाठीच सारखा असतो. बाहेरून कठीण आणि आतून अतिशय गोड. मात्र स्वप्नीलचा स्वभाव व्यक्तिसापेक्ष बदलतो. जगातल्या सर्व मुलांसाठी स्वप्नील नारळासारखा आहे. मात्र, जगातील सर्व मुलींसाठी तो आतून-बाहेरून पेढ्यासारखा आहे. त्याच्यातील नारळासारखा टणकपणा, कठीणपणा मुलींना कधीही जाणवत नाही. आधीच गोड आणि त्यातून रसात बुडालेला असा त्याचा एकूण स्वभाव आहे.’’

हेही वाचा: माझा पुर्नजन्मावर विश्वास आहे,सिद्धार्थ परत आलाय;का म्हणाली असं शहनाझ?

अवधूतच्या स्वभावाबद्दल स्वप्नील म्हणाला, ‘‘अवधूतमध्ये एक लहान बाळ दडलेलं आहे. आमच्या दोघांचे स्वभाव अतिशय वेगवेगळे आहेत. अवधूतला लोकांसोबत कनेक्ट राहायला आवडतं. त्याच्या जे मनात असतं तेच त्याच्या ओठांवर असतं. पोटात एक ओठांवर वेगळं असा प्रकार कधीही अवधूतच्या बाबतीत होत नाही. तो अतिशय गोड आणि मैत्रीला जपणारा माणूस आहे. एका गोड आंब्यासारखा अवधूतचा स्वभाव आहे. अशी कोणतीही गोष्ट नसेल जी आम्हा दोघांनाही एकमेकांबद्दल माहिती नसेल.’’

स्वप्नीलकडून अशी कोणती गोष्ट आहे जी तुला शिकायला आवडेल, असं अवधूतला विचारल्यावर त्यानं सांगितलं, ‘‘आतापर्यंत मी जेवढे गायक बघितले आहेत, त्यापैकी सर्वांत जास्त सुरेल स्वप्नील आहे. त्यामुळं त्याच्यामधील हा सुरेलपणा मी माझ्या गाण्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो.’’ तर दुसरीकडं अवधूतकडून अशी कोणती गोष्ट आहे जी तुला शिकायला आवडेल यावर स्वप्नीलनं सांगितलं, ‘‘आम्हांला दोघांनाही वेगवेगळ्या ट्रिप्सवर जायला आवडतं. आमच्या संपूर्ण ट्रिपचं नियोजन नेहमीच अवधूत करतो. अवधूत फक्त ट्रिपच्या बाबतीतच नाही, तर त्याच्या कामाच्या बाबतीतदेखील अतिशय चोख आहे. प्रत्येक गोष्टीचं तो योग्य ते नियोजन करतो. म्हणजे आम्ही कोणतीही ट्रिप प्लॅन केली की कुठं जाणार, कुठं थांबणार, किती वेळामध्ये पोहोचणार या सगळ्या गोष्टी अवधूत अतिशय उत्तम पद्धतीनं मॅनेज करतो. अतिशय छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तो प्लँनिंग करतो. पण त्याच्या या नियोजनाचे नियम कोणीही मोडलेले त्याला आवडत नाहीत. त्याच्यामधील हा गुण मी नक्कीच आत्मसात करण्याचा प्रयत्न करेन.’’ दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती करत त्या ठिकाणी असलेले वेगवेगळे खास जेवण खाण्यासाठी अतिशय आवडते. वेगवेगळ्या ठिकाणचे खाद्यपदार्थ खाणे हा त्यांचा छंद आहे. ही जन्मोजन्मीची मैत्री आम्ही अशीच कायम ठेवू, असं या दोघांनीही सांगितलं.

(शब्दांकन - जान्हवी वंजारे)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainment
loading image
go to top