लय भारी माणसांचं कोल्हापूर...!

लय भारी माणसांचं कोल्हापूर...!

तसे म्हटले तर कुठल्याही प्रकारचे कलाशिक्षण कधीच घेतले नाही. जे काही शिकत गेलो ते गुरूंच्या मार्गदर्शनामुळे. पोर्ट्रेट पेंटिंगची अनेक कामे केली. अनेक मान्यवरांच्या घरी ती विराजमान झाली. पण, ‘कुंपण’ या चित्रपटामुळे कला दिग्दर्शनाकडे वळलो. अर्थात त्यातलेही कुठलेच शिक्षण कधी घेतलेले नव्हते. केवळ अनुभवाच्या जोरावर हा चित्रपट पूर्ण केला. आता फिल्म इंडस्ट्रीतच अर्थात मुंबईतच बराच काळ रमलो आहे. विविध मालिका, चित्रपटांच्या स्टोरी बोर्ड डिझाईन्सची कामे सुरू आहेत. कोल्हापूरने चांगले गुरू दिले. लय भारी माणसांचा गोतावळा दिला. त्यांच्याच पाठबळावर हा प्रवास सुरू आहे... युवा चित्रकार स्वप्नील पाटील सांगत असतो आणि त्याचा प्रवास उलगडत जातो. 

स्वप्नील मूळचा करवीर तालुक्‍यातील आरळे गावचा. त्याला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड. चित्रकार संजय शेलार यांच्यासह प्रत्येक टप्प्यावर त्याला अनेक गुरू लाभले. त्याची पोर्ट्रेट पेंटिंग इतकी भारी की ती कुणालाही भुरळ घालतील. आजवर त्याच्या चित्रांची अनेक प्रदर्शने झाली आणि ती रसिकांना भावलीही; पण आपल्याच परिसरातील चार मित्र एकत्र येऊन चित्रपटनिर्मितीची धडपड करतात आणि त्यांच्याकडून कला दिग्दर्शनाची जबाबदारी मिळते, ही संधी घेण्याचे त्याने ठरवले. चित्रपट प्रदर्शित झाला. स्वप्नीलच्या कलादिग्दर्शनाचेही कौतुक झाले आणि त्यानंतर मात्र तो या क्षेत्रातच अधिक रमू लागला. 

‘चंद्रकला’ या मालिकेसह विविध मालिकांसाठी तो सहायक कला दिग्दर्शन करू लागला. काही हिंदी मालिकाही केल्या. ‘बलुतं’ या लघुपटाच्या निमित्ताने त्याला मिळालेला आत्मविश्‍वास खूप महत्त्वाचा ठरला. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसाठीही त्याने कलादिग्दर्शक म्हणून काम पाहिले. नुकत्याच सुरू झालेल्या ‘साजणा’ या मालिकेसाठी असो किंवा ‘तु. का. पाटील’ चित्रपटासाठी त्याने केलेले स्टोरी बोर्ड डिझाईन इतके भारी ठरले, की त्याला अनेक संधी चालून येऊ लागल्या आहेत आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचे तो सोनं करतो आहे. स्वप्नील सांगतो, ‘‘शिक्षणाबरोबरच अनुभव हा प्रत्येकाच्या करिअरसाठी खूप मोठा फॅक्‍टर असतो. त्या शिदोरीवरच पुढची वाटचाल अधिक चांगली होत असते.’’

माझे शिक्षण फक्त दहावी. कलाशिक्षण म्हटले तर ‘फाउंडेशन’ला कसे तरी सहा महिने काढले; पण कलापूरने अनेक चांगले गुरू दिले आणि या क्षेत्रात वेगळे काही तरी करायच्या उद्देशाने झपाटून काम करतो आहे.
- स्वप्नील पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com