esakal | 'तारक मेहता का उल्टा चष्मा' आता मराठीत

बोलून बातमी शोधा

gokuldhamchi duniyadari
'तारक मेहता का उल्टा चष्मा' आता मराठीत
sakal_logo
By
टीम ई सकाळ

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' आता मराठीमध्येही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका त्यांच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर मराठीमध्ये ‘गोकुळधामची दुनियादारी’ आणि तेलुगूमध्ये ‘तारक मामा अय्यो रामा’ या नावाने उपलब्ध आहे. गुढीपाडवा आणि उगादीच्या मुहुर्तावर शुभारंभ झालेल्या या एपिसोडला काही तासांतच युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या युट्यूब सबस्क्रायबरची संख्या 70 लाखांपेक्षा जास्त झाली आहे आणि वाढत्या प्रेक्षक संख्येमुळे चॅनेल लवकरच कार्यक्रमातील गेल्या 12 वर्षातील काही उत्तम क्षण या चॅनेलवर अपलोड करणार आहेत. तारक मेहता का उल्टा चष्माचे लेखक आणि निर्माते असित कुमार मोदी हे आहेत.

या कार्यक्रमाची ॲनिमेटेड सीरीज तारक मेहता का छोटा चष्मा (TMKCC) चे प्रक्षेपण 19 एप्रिलपासून Sony Yay चॅनेलवर सुरू झाले. यामुळे तारक मेहता का उल्टा चष्मा हा एकमेव भारतीय शो असेल जो एकाचवेळी लाइव्ह ॲक्शन, ॲनिमेशन आणि दोन प्रादेशिक भाषांमध्ये एकाचवेळी सुरू आहे. येत्या काही महिन्यात नीला फिल्म प्रोडक्शन्स आणखी एका प्रादेशिक भाषेत हा कार्यक्रम सादर करणार आहे.

हेही वाचा : 'देशावर संकट आलं की हे पळ काढतात'; शाहरुखचं कुटुंब नेटकऱ्यांकडून ट्रोल

तारक मेहता का उल्टा चष्मा हा जगातील सर्वाधिक काळ दररोज प्रक्षेपित होणारा कॉमेडी शो ठरला असून यातील बहुतांश कलाकारांची नावे भारतात आणि इतर अनेक देशात घरोघरी पोहोचली आहेत. 2008 मध्ये पहिल्यांदा प्रक्षेपित झालेला TMKOC 13 व्या वर्षातही सुरू आहे आणि या कालावधीत त्याचे 3,100 हून अधिक एपिसोड प्रक्षेपित झाले आहेत.