
Taarak Mehta: 'कलाकारांचे पैसे माझ्या खिशात..', मानधन बुडवण्यावर काय म्हणाले पहा 'तारक मेहता..' चे निर्माते
Taarak Mehta Ka Ulta Chashmah: गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर राज्य करणारी प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त चर्चेत आहे. अनेक जुन्या कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला आहे.
काही दिवासंपूर्वी तर बातमी होती की मालिकेतून बाहेर पडलेल्या कलाकारांचे मानधनही थकवण्यात आले आहे. यामध्ये मालिकेतील तारक मेहताची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या शैलेश लोढा यांचे नाव देखील सामिल आहे. या पूर्ण वादावर आता मालिकेचे निर्माते असित मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या सेटवर झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान असित मोदींनी मालिके संदर्भातील अनेक प्रश्नांची थेट उत्तरं दिली.
कलाकारांचे मानधन थकवल्या संदर्भात बोलताना मोदी म्हणाले,''जे देखील मानधन थकवल्या संदर्भात बोललं जात आहे त्यात काहीच तथ्य नाही''.
''कोणाच्या मेहनतीचे पैसे माझ्या खिशात ठेवून मी काय करू? देवानं मला खूप दिलंय,सगळ्यात जास्त तर मला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. लोकांचे पैसे मी बुडवले असं काहीच नाहीय, मला आनंद आहे की मी माझ्या मालिकेच्या माध्यमातून लोकांना हसवण्याचं काम करतो''.
कलाकारांनी मालिका सोडण्यावर असित मोदी म्हणाले,''१५ वर्षाचा मालिकेचा प्रवास आहे. नवीन कलाकार मालिकेत दिसत आहेत. २००८ मध्ये मालिका सुरू झाली होती. बऱ्यापैकी सगळे कलाकर तेच आहेत,फक्त काही कलाकार बदललेयत. त्याची काय कारणं यावर मी बोलू इच्छित नाही. मी फक्त एवढंच सांगेन मला लोकांना एकत्र जोडून ठेवायला आवडतं''.
''आमच्या मालिकेत देखील आम्ही कधी भांडणं..वाद दाखवत नाही. ना मालिकेच्या सेटवर असं घडतं. मी नेहमी देवाकडे प्रार्थना करतो की आमची जी २००८ पासून या मालिकेशी जोडली गेलेली टीम आहे मग तो स्पॉटबॉय असो की मेकअपमन की हेअर ड्रेसर..आम्ही सगळे एका कुटुंबासारखे आहोत. आम्हाला एकत्र मिळून काम करायचे आहे''.
निर्माते असित मोदी पुढे म्हणाले,''आता जर कुणाला मालिकेत काम करायची इच्छा राहिली नाही किंवा कुणाला त्याच्या वैयक्तिक अडचणीमुळे काम करता येत नाहीय,कुणाचा त्याच्या आरोग्या संबंधित मुद्दा आहे तर कुणाला त्याच्या आयुष्यात वैयक्तिक पातळीवर काही वेगळं करायचं आहे..तर हे सगळं निर्माता म्हणून मला समजून घ्यायला हवं. माझ्यामुळे कुणी मालिका सोडून जात आहे असं मुळीच नाही''.
मालिकेत दयाबेन परत येणार का याविषयी बोलताना असित मोदी म्हणाले,''दिशा वकानी परतेल तर खरंच खूप चांगलं होईल. पण तिचं आता स्वतःचं कौटुंबिक आयुष्य आहे ज्याला तिला प्रथम प्राधान्य देणं गरजेचं वाटत आहे''.
''त्यामुळे तिचं परतणं थोडं कठीण आहे. पण आता टप्पू मालिकेत परतलाय तर दयाबेन देखील येईल. दया भाभीचा गरबा,दांडिया लवकरच सगळं गोकुळधाम सोसायटीत सुरू होईल. त्यासाठी थोडी वाट पहावी लागेल..पण नक्कीच दयाबेन परतेल''.