esakal | अभिनेता विवेक यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

tamil actor vivek

अभिनेता विवेक यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

sakal_logo
By
स्वाती वेमूल

प्रसिद्ध तामिळ अभिनेते विवेक यांचा शनिवारी पहाटे चेन्नईतील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते ५९ वर्षांचे होते. शुक्रवारी सकाळी हृदयविकाराचा झटका येताच विवेक यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विवेक यांनी गुरुवारीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. त्यामुळे त्यांच्या आजारी पडण्याचा संबंध लशीची जोडण्यात येत होता. या अफवांवर स्पष्टीकरण देण्यासाठी तामिळनाडू आरोग्य विभागाला तातडीची पत्रकार परिषद घ्यावी लागली. हृदयविकाराचा झटका आणि लस यांमध्ये कोणताच संबंध नसून त्याच दिवशी इतर ८३० जणांनाही लस देण्यात आल्याचं राज्य आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन म्हणाले. त्याचसोबत ते सर्वजण ठीक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडाप्पडी के. पलानीस्वामी यांनी विवेक यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. 'हे तामिळ चित्रपटसृष्टीचं कधीही भरून न निघणारं नुकसान आहे', असं त्यांनी म्हटलं. तामिळ चित्रपटसृष्टीतील इतरही कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे विवेक यांना श्रद्धांजली वाहिली.

दिग्दर्शक के. बालचंदर यांनी १९८० मध्ये विवेक यांना चित्रपटसृष्टीत आणलं. १९९० मध्ये विवेक हे तामिळ चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय कॉमेडी अभिनेते ठरले. विवेक यांनी आतापर्यंत जवळपास १५०हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा 'धरला प्रभू' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्यांनी डॉक्टरची भूमिका साकारली होती.

loading image
go to top