विरोधाचं 'तांडव' शांत होणार; दिग्दर्शकाचा माफीनामा; वाचा काय म्हटलंय?

टीम ई सकाळ
Monday, 18 January 2021

तांडव वेबसिरीजवरून सुरु झालेल्या वादावर आता दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी माफी मागितली आहे.

नवी दिल्ली - तांडव वेबसिरीजवरून सुरु झालेल्या वादावर आता दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी माफी मागितली आहे. गेल्या आठवड्यात अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर ही सिरीज प्रसारीत झाली. यामध्ये हिंदू देवदेवतांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवल्यानं विरोध केला जात होता. या प्रकरणी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते.  तांडव वेबसिरीज विरोधात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि लेखक गौरव सोळंकी यांच्याविरोधात लखनऊमधील हजरतगंज पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालिकेत हिंदू विरोधी टिप्पणी केली असल्यानं त्यामुळे हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  आहे. याप्रकरणी आता लखनौत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लखनौच्या हजरतगंज कोतवाली येथे अ‍ॅमेझॉन प्राइम इंडियाचे ओरिजिनल कंटेंट हेड अरुणा पुरोहित, मालिकेचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशु कृष्ण मिश्रा आणि लेखक गौरव सोलंकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिग्दर्शकाने केली पोस्ट
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आम्ही पाहत आहोत आणि माहिती, प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला याबाबत माहिती दिली आहे. मोठ्या प्रमाणावर वेबसिरीजबद्दल आक्षेप नोंदवण्यात आला असून याचिकाही दाखल झाल्या आहेत. 

हे वाचा - बंडल 'तांडव', कथेवर नव्हे अभिनयावर तरलेला सत्तेचा 'नाटकी' पट

तांडव ही एक काल्पनिक मालिका असून याचा कोणाशी काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग असेल. यातून कोणत्याही प्रकारे विशिष्ट समाज, लोक किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही बिनशर्त माफी मागतो. 

भाजपच्या काही नेत्यांनी तांडववर सडकून टीका केली आहे. समाजातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या मालिकेच्या निमित्तानं करण्यात आला आहे असा आरोप त्यांनी केला आहे. दुसरीकडे दरवेळी हिंदू धर्मालाच का लक्ष्य केले जाते असा प्रश्न यानिमित्तानं समोर आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TANDAV director ali abbas zafar apologies share post