'Tanhaji :The Unsung Warrior' सिनेमा मराठी भाषेतही प्रदर्शित होणार!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

'Tanhaji The Unsung Warrior' : दृश्यात्मक रोमांचाने परिपूर्ण असलेला तान्हाजी: द अनसंग वॉरीयर हा सिनेमा मराठी वर्जन मध्ये प्रदर्शित होत असून संपूर्ण महाराष्ट्रात 10 जानेवारी 2020 रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे.

मुंबई : शूरवीर मराठा योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या दिमाखदार जीवनाची छाप भारतीय इतिहासावर आजही कायम असून आता मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे! दृश्यात्मक रोमांचाने परिपूर्ण असलेला तान्हाजी: द अनसंग वॉरीयर हा सिनेमा मराठी वर्जन मध्ये प्रदर्शित होत असून संपूर्ण महाराष्ट्रात 10 जानेवारी 2020 रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे.  एक महान कथा मोठ्या पटावर उलगडण्यात आल्याने त्यातून मिळणारा अनुभव हा अद्भुत असेल. शिवाय महाराष्ट्रात हा सिनेमा मराठी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना अजय देवगन म्हणाला की, “एका शूर मराठा योद्ध्याची कथा हिंदी   भाषेसह त्याच्या मातृभाषेत प्रेक्षकांसोबत शेअर करता येणार आहे, हे मी माझे भाग्यच समजतो. ज्या पद्धतीने संपूर्ण देशासमोर इतिहासाची पाने उलगडणार आहेत, त्याच दिमाखदार प्रवासाची अनुभूती समस्त महाराष्ट्राने घ्यावी असे मला वाटते.” 

 

मराठी आवृत्तीविषयी बोलताना काजोल म्हणाली की, “मला ही महाराष्ट्रीय व्यक्तिरेखा निभावणे प्रचंड भावले. मी आजीच्या, पणजीच्या मायेखाली लहानाची मोठी झाले. मी त्यांना पाहायचे. मी माझा स्वत:चा भूतकाळ जगले असे वाटते. मी माझ्या आईच्या साड्या नेसून बालपणीचा खेळ खेळतेय असेच वाटले. जणू मी सिनेमात माझ्या आईचीच भूमिका वठवतेय अशी धारणा झाली. मी प्रचंड प्रेमात पडले. मला संधी मिळाली तर मी रेड कार्पेटवर देखील नऊवारी साडी नेसून जाईन! हा पेहराव परिधान न करणे म्हणजे सेक्सीपणाचा कहर म्हणावा लागेल. साडीत स्वत:ची अशी एक देहबोली (बॉडी लॅग्वेज) तयार होते. साडीत बाईपण खुलून येते. सावित्री ही व्यक्तिरेखा कणखर आणि अफलातून आहे. माझ्यात तिच्यातले करारीपण चपखल उतरले. मी अत्यंत प्रतिकूल स्थितीतल्या तिच्या रुबाबाच्या प्रेमात आहे."

10 डिसेंबर रोजी मराठी ट्रेलर प्रदर्शित होईल!

अजय देवगन अभिनित तान्हाजी - द अनसंग वॉरीयरची निर्मिती अजय देवगन याच्या एडीएफ आणि भूषण कुमारच्या टी-सिरीजने केली आहे. तर दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतने सांभाळली आहे. 10 जानेवारी 2020 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tanhaji The Unsung Warrior movie is going to release in Marathi language