दयाबेन कुठेय?; 'तारक मेहता'चे निर्माते का करतायत सारवासारव....Tarak Mehta Ka Ooltah Chashmah | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tarak Mehta ka Ooltah Chashmah: producer asit modi on fans trolling him for playing with their emotions And Dayaben's Re-entry.

दयाबेन कुठेय?; 'तारक मेहता'चे निर्माते का करतायत सारवासारव...

प्रसिद्ध टी.व्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak mehta Ka Ooltah Chashma) मालिका सध्या चर्चेत आहे. शो मध्ये दयाबेन(Dayaben) परत येणार म्हणून चाहते देखील सुखावले आहेत. 'पण कुठेय ती'? आता या प्रश्नाचं उत्तर तिची प्रतिक्षा पाहून कंटाळलेल्या चाहत्यांना हवं आहे. प्रोमोजमधून दयाबेन येतेय अशी अशा चाहत्यांना दाखवली होती पण ती अजून आलीच नाहीय. यामुळे चाहते मात्र नाराज आहेत. आणि आता यामुळे निर्मात्यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे.(Tarak Mehta ka Ooltah Chashmah: producer asit modi on fans trolling him for playing with their emotions And Dayaben's Re-entry)

आता या ट्रोलिंगला उत्तर देताना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' चे निर्माते असित कुमार मोदींनी यावर उत्तर दिलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत असित मोदी म्हणाले आहेत की,''दयाबेन अशी एका रात्रीत शो मध्ये कशी येईल बरं ? दयाबेनची एन्ट्री एकदम जबरदस्त असणार आहे''. ते म्हणाले,''आता ही कथानकाची गरज आहे. आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करीत आहोत. पण यामध्ये थोडा वेळ लागेल''.

''मी या गोष्टीशी सहमत आहे की लोक आम्हाला शिव्या देत आहेत. कारण या शो शी त्यांचे भावनिक नाते आहे. आम्ही देखील त्यांच्या विचारांचा आदर करतो. दयाबेन नक्कीच येणार. अर्थात आम्हालाही वाटत आहे की दिशा वकानीनंच दयाबेन बनून परत यावं. सध्या दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन देखील सुरु आहेत. जर दिशा वकानी शो मध्ये आली तर खूपच छान होईल कारण ती आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे''. आता ही फसवी आशा पुन्हा निर्माते चाहत्यांना दाखवतायत,आणि मूळ प्रश्नाचं उत्तर द्यायला टाळाटाळ करीत आहेत.

''परंतु आता दिशा वकानीचं दयाबेन बनून येणं कठीण दिसत आहे,त्यामुळे तिच्या जागी आता दुसरी दयाबेन आम्ही शोधत आहोत. एक निर्माता म्हणून मला देखील वाटतंय की दयाबेन ही व्यक्तिरेखा मालिकेत परत यायला हवी. आमचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच दया भाभी सगळ्यांना मालिकेत दिसेल. पण अशी एका रात्रीत आम्ही कुणालाही दयाबेन म्हणून उभं नाही करु शकत. ही व्यक्तीरेखा खूप दिवसांपासून शो मधून गायब आहे त्यामुळे तिची एन्ट्री जबरदस्त असायला हवी असं आम्हाला वाटतं''.

तारक मेहताचा नवीन प्रोमो समोर आला,त्यानुसार पुढील २ महिन्यात दयाबेन मालिकेत परत येणार आहे. जेठालालनं अल्टीमेटम दिलं आहे. त्यांनी सुंदरला सांगितलं आहे की दोन महिन्यात दयाबेन परतली नाही तर मी उपोषणाला बसेन. निर्माते असित कुमार मोदी यांनी देखील दयाबेन परत येणार असं सांगितलं आहे. फक्त चाहत्यांनी थोडा आणखी धीर धरावा अन् दयाबेनची वाट पहावी.