Raghuveer Movie: समर्थ रामदासांची गाथा आता मोठ्या पडद्यावर.. हा अभिनेता प्रमुख भूमिकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raghuveer movie

Raghuveer Movie: समर्थ रामदासांची गाथा आता मोठ्या पडद्यावर.. हा अभिनेता प्रमुख भूमिकेत

Raghuveer Movie: छत्रपती शिवरायांच्या कीर्ती आणि महती सर्वांना ठाऊक आहे. शिवरायांचं कर्तृत्व पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारी आहे. शिवरायांच्या आयुष्यात रामदास स्वामी यांचंही मोलाचं योगदान आहे. निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥ अशा शब्दात रामदास स्वामींनी शिवरायांचं वर्णन केलंय.

छत्रपती शिवरायांना आयुष्यात महत्वाचं योगदान असणाऱ्या रामदास स्वामींच्या आयुष्यावर सिनेमा येतोय. रघुवीर असं या सिनेमाचं नाव आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर आऊट झालं असून अभिनेता विक्रम गायकवाड समर्थ रामदास स्वामींची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे

भक्ती अन् शक्तीच्या उपासनेचा, विचार अन् आचार स्त्री सन्मानाचा, देण तुझी ही समर्था, तुज चरणी अर्पण, ही 'रघुवीर' गाथा. अशा पद्धतीने रघूवीर सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलंय. उंच माझा झोका मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता विक्रम गायकवाड या सिनेमातून समर्थ रामदास स्वामींची महत्वाची भूमिका साकारणार आहे. विक्रमचा समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेतला लूक सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

रघुवीर सिनेमाचे दिग्दर्शक निलेश अरुण कुंजीर आहेत. याशिवाय अभिराम भडकमकर यांनी या सिनेमाच्या कथा, पटकथा आणि संवादाची स्वीकारली आहे. अभिराम यांनी याआधी बालगंधर्व, पछाडलेला, खबरदार अशा सिनेमांसाठी पटकथा लेखनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

अजित परब या सिनेमाच्या संगीताची धुरा सांभाळणार आहे. याशिवाय गीतकार मंदार चोळकरने सिनेमाची गीतं लिहिले आहेत. या सिनेमाची रिलीज डेट अजून समोर आली नाहीये तरीही लवकरच हा सिनेमा सिनेमागृहात रिलीज होणार आहे.