Reena Roy Birthday: तेव्हा मी कपडे बदलण्यासाठी जंगलात जायचे... रीना रॉय यांना आठवले जुने दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Reena Roy

Reena Roy Birthday: तेव्हा मी कपडे बदलण्यासाठी जंगलात जायचे... रीना रॉय यांना आठवले जुने दिवस

रीना रॉय यांनी बॉलिवूडवर 70 ते 80 च्या दशकात राज्य केले. कारकिर्दीच्या शिखरावर असताना रीना यांनी एका प्रसिद्ध क्रिकेटपटूशी लग्न करून देश सोडला. यानंतर, जेव्हा त्या परतल्या तेव्हा एक-दोन चित्रपट केल्यानंतर रीना सिंगल पॅरेन्ट म्हणून आपल्या मुलीचे संगोपन करण्यात व्यस्त झाल्या. आता रीना प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. रीना आज 65 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. या भेटीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक अस्पर्शित गोष्टी आपल्यासोबत शेअर केल्या आहेत.

रीना रॉय म्हणाल्या "वाढदिवस माझ्यासाठी खूप खास असते. या दिवसाची सुरुवात खाण्यापिण्याने व्हायची. आई सर्व प्रकारचे पदार्थ बनवायची. घरात लोकांची ये-जा असायची. ही परंपरा आजही अबाधित आहे. मी तरुण वयात अभिनेत्री बनले, त्यामुळे अनेक वेळा सेटवर देखील वाढदिवस केले.

मी लहानपणापासूनच काम करू लागले. त्यामुळे माझी आई पैशांचा सर्व हिशेब ठेवायची. जेव्हा माझा पहिला पगार आला तेव्हा आईने मला सेकंड हँड कार आणून दिली होती. माझ्या आईला वाटायचे की मुलगी आता अभिनेत्री झाली आहे, कितीही पैसा आला तरी त्यातून गाडी घ्यावी. म्हणूनच आईने मला सेकंड हँड कार घेतली होती."

हेही वाचा: Bipasha Basu: बंगालच्या या ब्लॅक ब्युटीने गोऱ्याचिट्ट्या अभिनेत्रींचं मार्केट केलं होतं डाउन..

रीना रॉय म्हणाल्या, "प्रत्येक चित्रपटाशी काही ना काही अनुभव निगडित होता. त्यावेळी आमच्याकडे व्हॅनिटी व्हॅन नव्हती. आम्हाला सेटपासून थोडं दूर जंगलात नेलं जातं होतं, हेयर ड्रेसर, मेकअप करणाऱ्या मुली आमच्या सोबत असायच्या. आम्ही आत जंगलात जायचो, त्या मुली ओढणी पकडायच्या आणि मी आत जायचे, माझा ड्रेस बदलायचे आणि बाहेर यायचे. ही आमची अवस्था होती. सध्या जेव्हा मी अभिनेत्रींना दिल्या जाणार्‍या सुविधा पाहते तेव्हा मला वाटते की ही लोकं किती नशीबवान आहेत."

रीना रॉय यांच्या लव्हलाईफ बद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्या आयुष्यात पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खान आले. मोहसिनसोबत लग्न केल्यानंतर रीना यांनी बॉलिवूड सोडले आणि पाकिस्तानमध्ये स्थायिक झाल्या, जरी रीना पती मोहसिनसोबत बॉलिवूडमध्ये परतल्या तेव्हा त्यांना पुन्हा प्रसिद्धी मिळाली नाही. त्यांनतर त्यांना सनम खान मुलगी झाली, आणि काही काळानंतरच रीना आणि मोहसीन यांचा घटस्फोट झाला.