
marathi movie : करोना काळात चित्रपटांवर आलेलं संकट दूर झालं असल्याने आता एकास एक झकास आशय असलेले मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहेत. कित्येक चित्रपटांना तर प्रदर्शनापूर्वीच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात प्रेक्षकांचे मनोरंजन डबल टिबल होणार आहे. यामध्ये जिओ स्टुडिओजने त्यांच्या आगामी चित्रपटांची घोषणा केली आहे. (these upcoming marathi movie released by jio studios godavari kalsutra bai pan dega deva eka kaleche mani ghe daouble)
येणाऱ्या काळात जिओ स्टुडिओज मराठी दिग्गज कलाकारांच्या समवेत चित्रपट आणि वेब सिरीजची निर्मिती करणार आहे. यात महेश मांजरेकर, प्रशांत दामले, सुकन्या कुलकर्णी, सयाजी शिंदे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, भाऊ कदम, केदार शिंदे, अंकुश चौधरी, राहुल देशपांडे, हृता दुर्गुळे, अश्या मराठीतील अनेक प्रतिभावान कलाकारांचा समावेश असणार आहे.
महत्वाचं म्हणजे यात वैविध्यपूर्ण प्रकारच्या शैलीतील प्रोजेक्ट्स असणार आहेत, अगदी कॉमेडीपासून ते थ्रिलर्सपर्यंत, सत्य घटनांवर आधारित गोष्टींपासून ते प्रेमकथांपर्यंत, ज्या सर्व मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. यातील आगामी प्रोजेक्ट म्हणजे अभिनेता भाऊ कदम आणि भूषण पाटील अभिनीत 'घे डबल' हा धमाकेदार कॉमेडी चित्रपट येत्या ३० सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले असून जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित या चित्रपटात भाऊ कदम पहिल्यांदाच दुहेरी भूमिका असणार आहे.
त्यानंतर सध्या चर्चेत असलेला आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट 'गोदावरी' हा ११ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, या चित्रपटाची निर्मिती ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स यांनी केली आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर यात विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव असे प्रतिभाशाली कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.
२०२३ या नववर्षाची सुरुवात दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या खुमासदार शैलीने नटलेला "बाईपण भारी देवा" या चित्रपटाने होणार आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले निर्मित हा चित्रपट नववर्षात ६ जानेवारी २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, दीपा परब, शिल्पा नवलकर आणि सुचित्रा बांदेकर अशा उत्तमोत्तम कलाकारांची धमाल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘एक दोन तीन चार’ हा चित्रपट नवीन वर्षातील फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केलं आहे, ज्यांचा बहुचर्चित ‘मुरांबा’ या चित्रपटानंतरचा हा पुढील चित्रपट असणार आहे. ही एका तरुण जोडप्याची सरप्राईज लव्हस्टोरी आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, बहावा एंटरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ प्राॅडक्शन अंतर्गत, रणजीत गुगले, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी, निरज बिनीवाले निर्मित हा चित्रपट प्रेक्षकांचं फुल टू मनोरंजन करेल यात शंका नाही.
या नंतर जिओ स्टुडिओज प्रस्तुत बहुचर्चित 'उनाड' हा चित्रपट २०२३च्या उन्हाळ्यात सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आदित्य सरपोतदारने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर, ज्योती देशपांडे, अजित अरोरा, चंद्रेश भानुशाली आणि प्रितेश ठक्कर निर्मित ‘उनाड’ हा चित्रपट तरूणांवर चित्रीत असून यात आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, अभिषेक भराटे, चिन्मय जाधव, देविका दफ्तरदार आणि संदेश जाधव हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. झेक रिपब्लिक येथे पार पडलेल्या झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात युवा विभागातील फिचर फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरीता अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘उनाड’ची नुकतीच निवड झाली आहे.
यासह जिओ स्टुडिओजने एका थ्रिलर चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘4 Blind Men'(४ ब्लाइंड मेन) असे आहे. हा चित्रपट चार अंध व्यक्ती आणि हत्ती यांवर आधारित बोधकथेवर चित्रित केला आहे. नितीन वैद्य निर्मित आणि अभिषेक मेरुकर दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत झळकत असून सोबतच शुभंकर तावडे, संकर्षण कऱ्हाडे, शेखर दाते व मृण्मयी देशपांडे या दिग्गज कलाकारांची फौज झळकत आहे.
चित्रपटासह जिओ स्टुडिओज मराठी डिजिटल विश्वातही आपला ठसा उमटवण्यास सज्ज झालं आहे. ‘एका काळेचे मणी' ही एक धमाल वेबसिरीज जिओ स्टुडिओज घेऊन येत असून, एका चित्र-विचित्र पात्रांची आणि परिवाराची आगळीवेगळी कथा असणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली असून या वेबसिरीजचे दिग्दर्शन अतुल केतकर यांनी केले आहे. या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठी नाट्यक्षेत्रातील सुपरस्टार अभिनेते प्रशांत दामले मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्यांच्याबरोबर हृता दुर्गुळे, वंदना गुप्ते, पौर्णिमा मनोहर, ऋषी मनोहर, रुतुराज शिंदे, कॉमेडीस्टार समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार देखील यात असणार आहेत.
"एका काळेचे मणी" नंतर सलील देसाई यांच्या ‘मर्डर माईलस्टोन’ कादंबरीवर आधारीत ‘कालसूत्र’ हा रोमांचकारी थरारक वेब-शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या थरारक ॲक्शन पॅक वेब सिरीजचं दिग्दर्शन भीमराव मुडे यांनी केले असून, जिओ स्टुडिओजसह मंजिरी सुबोध भावे यांच्या नेतृत्वाखालील कान्हा निर्मिती संस्थेने या वेब-शोची निर्मिती केली आहे. यात सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे, सयाजी शिंदे, अनंत जोग, उर्मिला कानेटकर-कोठारे, भाऊ कदम, पुष्कराज चिरपुटकर, शुभंकर तावडे, उमेश जगताप आणि अश्विनी कासार अशी कलाकारांची जबरदस्त स्टारकास्ट झळकणार आहे.
आणि याच सिरीज मधील महत्वाचं वेबसीरिज म्हणजे 'जक्कल!’ १९७० च्या दशकात पुण्यात घडलेल्या खळबळजनक हत्याकांडावर आधारित हा वेब शो असून सामान्य मध्यमवर्गातील मुलं कळत नकळतपणे जेव्हा गुन्हेगारीच्या मार्गावर वळतात आणि ते कोणत्या टोकाला जाऊ शकतात याचा शोध घेणारी ही मालिका असणार आहे. दिग्दर्शक विवेक वाघ यांची ही संकल्पना असून ते गेल्या चार वर्षांपासून या विषयावर काम करत आहेत. या मालिकेची निर्मिती ए कल्चर कॅनव्हास एंटरटेनमेंट प्रोडक्शनचे शिवम यादव आणि कार्तिकी यादव यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.