‘थिंक पॉईंट’ नाटकात घेतलाय 'या' प्रश्नांचा वेध

Think Point in State Drama Competition
Think Point in State Drama Competition

कोल्हापूर : महिला आणि त्यांच्या मनाचा होणारा कोंडमारा हा आजवरच्या अनेक नाटकांचा विषय. पण, यशोधरा पंचशील थिएटर ॲकॅडमीच्या माध्यमातून लेखक आणि दिग्दर्शक लक्ष्मण द्रविड यांनी याच विषयावर जाणीवपूर्वक नाटक लिहिलं आणि ते स्पर्धेत सादर केलं. त्यातही त्यांनी आणखी एक शिवधनुष्य पेलायचं ठरवलं ते म्हणजे महिलांनी महिलांच्या प्रश्‍नांचा वेध घेणारं असं नाटक त्यांना रंगमंचावर आणायचं होतं आणि ते त्यांनी समर्थपणे पेललं. आठ महिला कलाकारांनी ‘थिंक पॉईंट’च्या माध्यमातून रंगमंचावर एक देखणा प्रयोग सादर केला.

एका महिला आधार केंद्रात दाखल झालेल्या महिला आणि केंद्राच्या प्रमुख आपल्या व्यथा रंगमंचीय आविष्कारातून मांडण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवतात. हा आविष्कार सुरू होतो आणि मग त्यातून त्यांच्या विविध प्रश्‍नांचा सर्वांगीण वेध घेतला जातो. प्रत्येकीची दुःखं आणि त्यामागच्या कथा एकापाठोपाठ एक उलगडत जातात. 

चार जणींची प्रथमच एंट्री

नाटकातल्या आठ व्यक्तिरेखांपेकी चार जणींनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्पर्धेत रंगमंचावर एंट्री केलेली. मात्र, या अष्टदुर्गांच्या ‘टीम स्पिरिट’नं ते तसूभरही ते जाणवू दिलं नाही. पंच्याहत्तर वर्षीय लक्ष्मण द्रविड आणि येथील राज्य नाट्य स्पर्धा हे गेल्या पन्नास वर्षातलं एक अतूट समीकरण. त्यांनी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येकाला अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या प्रयोगाने नेटकी सलामी दिली.  

आत्मविश्‍वास मिळाला.
मी पहिल्यांदाच राज्य नाट्य स्पर्धेच्या रंगमंचावर एंट्री केली. डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेत असून यानिमित्ताने रंगमंचावरही आपण चांगली भूमिका करू शकतो, याचा आत्मविश्‍वास मिळाला.
-  ऋतुजा कुरबेट्टी

या नाटकातून रंगमंचावर एंट्री
कॉलेज संपून पंधरा वर्षे उलटली. त्यानंतर थेट या नाटकातून रंगमंचावर एंट्री केली. एक वेगळाच अनुभव यानिमित्ताने मिळाला. माझे ‘बीएड’ झाले असून एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
प्रतिभा बनसोडे

भूमिकेच्या निमित्ताने आजोबांच्या स्मृती ताज्या
पहिल्यांदाच रंगमंचावर आलो व पोलिसाची भूमिका साकारायला मिळाली. आजोबा विलास माळगे पोलिस होते. त्यांचे काही महिन्यापूर्वीच निधन झाले. त्यांच्या स्मृती या भूमिकेच्या निमित्ताने पुन्हा जाग्या झाल्या.  
- आम्रपाली माळगे

टीम स्पिरिट अनुभवले

शाळेत लघुनाटिका लिहिणं त्या साकारणं हे सुरूच असायचं. पण, राज्य नाट्य स्पर्धेत पहिल्यांदाच पदार्पण केले. न्यू कॉलेजमध्ये ‘बीएस्सी’च्या दुसऱ्या वर्षात शिकत असून ‘टीम स्पिरिट’ काय असते, याचा अनुभव मिळाला. 
ऋतुजा कांबळे

पात्र परिचय

 दीक्षा सुर्वे-चव्हाण (अरुणा लिमये व विभावरी)  प्रणोती कुमठेकर (जोशी व पत्रकार)  साधना माळी (आसावरी व बाईसाहेब)  ऋतुजा कांबळे (शोभा)  अमृता माने (अर्चना)  प्रतिभा बनसोडे (पोलिस एक)  ऋतुजा कुरबेट्टी (नम्रता)  आम्रपाली माळगे (पोलिस दोन)

 लेखक व दिग्दर्शक      लक्ष्मण द्रविड
 प्रकाश योजना      निकोलस जाधव
 नेपथ्य      राहुल तोडकर
 रंगभूषा      काजल तोडकर
 संगीत      आकाश पोवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com