थ्री ऑफ अस...

एकशे दहा वर्षांची परंपरा असलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीचा डोलारा प्रामुख्याने ‘तिघांच्या’ गोष्टीवर उभा आहे.
three of us movie grab audience
three of us movie grab audienceSakal

गेली तीन दशके दोघा-दोघांभोवती फिरणारे महाराष्ट्राचे राजकारण गेल्या चार वर्षांपासून तिघांभोवती फिरू लागले आहे. त्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणातही वेगळ्या कथानकावर ‘थ्री ऑफ अस’चा खेळ सुरू आहे. तो कुठवर आणि कशी वळणे घेत जाणार आहे, याचे उत्तर काळच देईल.

- विजय चोरमारे

एकशे दहा वर्षांची परंपरा असलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीचा डोलारा प्रामुख्याने ‘तिघांच्या’ गोष्टीवर उभा आहे. दोघांच्या गोष्टीत तिसरा आल्याशिवाय ती गोष्ट समोरच्याला गुंतवून ठेवू शकत नाही. जी गोष्ट प्रेक्षकाला गुंतवून ठेवू शकत नाही तिला व्यावसायिक यश मिळू शकत नाही;

आणि व्यावसायिक यशाशिवाय त्या गोष्टीच्या कलात्मकतेला अर्थ प्राप्त होत नाही. त्या अर्थाने विचार केला तर ‘तिघांच्या’ गोष्टीने भारतीय चित्रपटांना मोठाच आधार दिला आहे. लेखक, दिग्दर्शकागणिक गोष्टीची हाताळणी वेगवेगळी असू शकते.

‘थ्री ऑफ अस’ हा अलीकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट त्याच पठडीतील असला तरी समुद्राची गाज, कोकणातले निसर्गसौंदर्य आणि पावसाचे मंद संगीत त्याला एका वेगळ्या उंचीवर नेते.

सोलापूर जिल्ह्यातील अविनाश अरुण ढावरे या तरुण छायालेखक आणि दिग्दर्शकाचा हा चित्रपट सरत्या वर्षाच्या आणि नव्या वर्षाच्या सांध्यावरचा एक संस्मरणीय कलात्मक अाविष्कार म्हणता येईल.

अशा सांध्यावरच्या कलाकृतीचा फायदा असा असतो की, सरत्या वर्षातील चांगल्या गोष्टींमध्येही तिची नोंद होते आणि नव्या वर्षात तिचे उत्सवी सोहळे सुरूच राहतात. ‘थ्री ऑफ अस’ या चित्रपटाच्या केंद्रस्थानी स्मृतिभ्रंश ही समस्याही आहे.

स्मृतिभ्रंश ही केवळ न्यूरोलॉजिकल समस्या नाही, तर वर्तमानातील एक गंभीर संकट बनल्याचे अवतीभवती दिसून येते. चित्रपटाची नायिका शैलजा हिला स्मृतिभ्रंशाचा विकार आहे. तिच्यासह तिचे कुटुंब, म्हणजे नवरा आणि आयआयटीमध्ये शिकणारा मुलगा,

दोघेही नेहमी काळजीत असतात. ही गोष्ट केवळ त्यांचीच नाही, तर वर्तमान आणि भूतकाळाच्या झोपाळ्यावर झुलणाऱ्या सगळ्यांचीच आहे. प्रश्न फक्त एवढाच उरतो, की स्मृतिभ्रंशाचा विकाराचे प्रत्यक्षातले बळी कोण आहेत आणि त्या विकाराला निमंत्रण देऊन त्याच्याशी जोडून घेणारे कोणकोण आहेत.

तिघांच्या कहाणीचे वेड

‘थ्री ऑफ अस’ हे महाराष्ट्राच्या राजकारणाचेही वास्तव आहे. तीन दशके दोघा-दोघांभोवती फिरणारे महाराष्ट्राचे राजकारण चार वर्षांपासून तिघांभोवती फिरू लागले आहे. त्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणातही वेगळ्या कथानकावर ‘थ्री ऑफ अस’ चित्रपट सुरू आहे. अविनाश अरुण ढावरेच्या ‘थ्री ऑफ अस’मध्ये मुंबई आणि कोकण आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील या चित्रपटाला समुद्राच्या लाटांची, नारळी पोफळीच्या बागांची पार्श्वभूमी नसली तरी ‘काय डोंगर, काय झाडी, काय हाटेल’ अशी नयनरम्य पार्श्वभूमी आहे. अविनाश अरुणने जी जादू कॅमेऱ्याच्या सहाय्याने पडद्यावर साकारली आहे, त्याहून कितीतरी पटींनी अधिक प्रभावीपणे शहाजीबापू पाटील यांच्या संवादांनी गुवाहाटीचा निसर्ग महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर उभा केला.

चित्रपटाच्या पडद्यावरील निसर्ग पाहून कोकणातील पर्यटनात वाढ झाली नसेल; परंतु शहाजीबापूंच्या डायलॉगमुळे महाराष्ट्रातून आसामला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मात्र वाढ झाली. शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी असा दोघा-दोघांचा खेळ २०१९ मध्ये तिघांचा बनला आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना असे तिघे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन ‘थ्री ऑफ अस’चा खेळ सुरू झाला.

तिघांच्या कहाणीचे वेड महाराष्ट्राला स्वस्थ बसू देत नव्हते, त्याचमुळे असेल कदाचित या तिघांना शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षानेही आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून ‘थ्री ऑफ अस’चा आणखी एक पट मांडला. दोन्हीकडील दोघे दोघे अर्धेच असले तरी त्यांनाच परिपूर्ण मानून ‘थ्री ऑफ अस’ हे शीर्षक सार्थ ठरवण्यात आले.

केंद्रस्थानी स्मृतिभ्रंश

पडद्यावरील चित्रपटात आणि महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावरील या खेळात फरक एवढाच आहे की, पडद्यावरचा चित्रपट तरल, काव्यात्मक आहे आणि प्रत्यक्षातला हा चित्रपट रासवट आणि शिवराळ आहे.

तो तसा बनण्याचे कारण पडद्यावरील तरल चित्रपटात सापडते, ते म्हणजे स्मृतिभ्रंश. पडद्यावरील चित्रपटात स्मृतिभ्रंश केंद्रस्थानी आहे, त्याहून त्याची तीव्रता या राजकीय खेळात आहे. किंबहुना स्मृतिभ्रंशामुळेच राजकीय ‘चित्रपटा’त रंगत आली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये फूट पडून ते दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. या फुटीच्या आघातामुळे दोन्हीकडील मंडळींना स्मृतिभ्रंशाचा विकार जडल्यासारखे वाटू लागले आहे. आपण आधी कुठे होतो, तिथे कुणासोबत होतो, काय बोलत होतो, कुणाचे पोवाडे गात होतो आणि आता कुठे आहे, काय बोलतो आहोत,

कुणाबद्दल बोलतो आहोत, याचे भान फार मोजक्या लोकांना आहे. बाकीच्यांचा स्मृतिभ्रंश विकोपाला गेला आहे. एवढा की, काही महिन्यांपूर्वी आपण बोललो त्याच्या नेमके उलटे बोलण्याची जणू साथच आली आहे. ज्यांच्या ओव्या म्हटल्या त्यांना शिव्या आणि ज्यांना शिव्या दिल्या त्यांच्या ओव्या म्हणण्याची स्पर्धा लागली आहे. ‘थ्री ऑफ अस’चा हा खेळ कुठवर आणि कशी वळणे घेत जाणार आहे, याचे उत्तर काळच देईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com