'रामसेतू'च्या सेटवरील ४५ जणांना कोरोना; जाणून घ्या काय आहे सत्य?

स्वाती वेमूल
Thursday, 8 April 2021

चित्रपटाचे सहनिर्माते विक्रम मल्होत्रा यांनी दिली सविस्तर माहिती 

गेल्या आठवड्यात अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'रामसेतू' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. मात्र शूटिंग झाल्यानंतर लगेचच अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली. अक्षय कुमारनंतर 'रामसेतू'च्या टीममधील ४५ जणांनाही कोरोना झाल्याचं म्हटलं जात होत. मात्र आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही बाब फेटाळली आहे. "ही अत्यंत चुकीची आणि तथ्यहीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे", असं सहनिर्माते विक्रम मल्होत्रा म्हणाले. त्याचसोबत सेटवर नेमकं काय झालं, याचीही सविस्तर माहिती त्यांनी दिली. 

"५ एप्रिल रोजी मड आयलँड याठिकाणी शूटिंगला सुरुवात होणार होती. सरकारने आखून दिलेल्या नियमांनुसार ३ एप्रिल रोजी शूटिंगमध्ये सहभागी होणाऱ्या १९० क्रू मेंबर्सची कोरोना चाचणी मुंबईतील वर्सोवा याठिकाणी करण्यात आली. त्या १९० जणांपैकी २५ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्या २५ जणांना वगळण्यात आलं आणि इतर क्रू मेंबर्स शूटिंगसाठी निवडण्यात आले", असं मल्होत्रा यांनी सांगितलं. इतर ठिकाणी क्रू मेंबर्सची कोरोना चाचणी करण्याचा पूर्ण खर्च हा निर्मात्यांनी उचलल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा : 'मिसेस श्रीलंका' स्पर्धेच्या मंचावर हंगामा; हिसकावलं विजेतीचं मुकूट

अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या क्रू-मेंबर्सचीही कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं. या चित्रपटात अक्षयसोबत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नुशरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिस यांनीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी केली आणि स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: truth behind 45 people from Akshay Kumar Ram Setu crew testing Covid positive