
पती रोहित रेड्डीने फोटो पोस्ट करत चाहत्यांना सांगितली आनंदाची बातमी
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अनिताचा पती रोहित रेड्डीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. सोशल मीडियावर सध्या चाहत्यांकडून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
'पालकत्वाच्या नवीन विश्वात तुझं स्वागत', अशा शब्दांत अभिनेत्री समीरा रेड्डीने या दोघांना शुभेच्छा दिल्या. तर भारती सिंग, किश्वर मर्चंट, रिधी डोग्रा, राहुल शर्मा, सुक्रिती कांडपाल, नकुल मेहता यांसारख्या सेलिब्रिटींनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. निर्माती एकता कपूर ही अनिताची सर्वांत जवळची मैत्रीण आहे. एकता कपूरने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत, हा तिच्या आयुष्यातील सर्वांत चांगला दिवस असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा : बेबोचे प्रेग्नंसीच्या काळातले फोटो पाहिलेत?
अनिताने सुरुवातीला गरोदर असल्याची बातमी चाहत्यांपासून लपवली होती. इन्स्टाग्रामला फोटो शेअर करत कशा पद्धतीने चार वेळा बेबी बंप लपवला हे दाखवलं होतं. 'चार वेळा मी बेबी बंप लपवण्यात यशस्वी झाले. थोडक्यात तुम्हा सर्वांना मी फसवलं', असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
हेही वाचा : 'बाई तू नाचू नकोस'; प्रसिद्ध अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रोल
२०१३ मध्ये अनिताने रोहितशी लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. अनिताने काही चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. २००३ मध्ये तिने 'कुछ तो है' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण बॉलिवूडमध्ये तिला अपेक्षित यश मिळालं नाही. 'ये है मोहब्बतें', 'कभी सौतन कभी सहेली', 'काव्यांजली' या मालिकांमधील तिच्या भूमिका गाजल्या. अनिता आणि रोहितने 'नच बलिये' या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.