esakal | मंदाकिनीसारखा अंघोळीचा सीन करणार का? ट्विंकलचं दिग्दर्शकाला सडेतोड उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

twinkle khanna

मंदाकिनीसारखा अंघोळीचा सीन करणार का? ट्विंकलने दिलं सडेतोड उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने Twinkle Khanna तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा एक किस्सा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला. एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने ट्विंकलला 'राम तेरी गंगा मैली' चित्रपटातील मंदाकिनीसारखा Mandakini अंघोळीचा सीन करणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर ट्विंकलने काय उत्तर दिलं, याबद्दल तिने सांगितलं. ट्विक इंडिया युट्यूब चॅनलवर ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांच्याशी ती बोलत होती.

काय म्हणाली ट्विंकल?

"पावसातील एका गाण्याच्या शूटिंगसाठी मी तयार झाले होते. मी पांढरा कुर्ता परिधान केला होता आणि त्याचवेळी दिग्दर्शक माझ्याकडे आले. तू मंदाकिनीसारखा अंघोळीचा सीन करू शकते का, असा प्रश्न त्यांनी मला विचारला. त्यावर मी त्यांना दोन गोष्टी सांगते म्हणाले. पहिलं म्हणजे मी साफ नकार दिला आणि दुसरं मी त्यांना म्हणाले की तुम्ही राज कपूर नाहीत. त्या घटनेनंतर दिग्दर्शक कधीच माझ्याशी बोलला नाही आणि त्याच्या चित्रपटांसाठी मला कधीच विचारलं नाही. असं असलं तरी अभिनेत्रींनी त्यांच्या मतावर ठाम राहिलं पाहिजे", असं ती म्हणाली. धर्मेश दर्शन दिग्दर्शित 'मेला' या चित्रपटात ट्विंकलने पावसातील गाणं शूट केलं होतं.

हेही वाचा: माझी तुझी रेशीमगाठ: शेफालीचा पती आहे 'मुंबई इंडियन्स'चा प्रमुख व्यक्ती

"मी माझ्या करिअरमध्ये हिट चित्रपट दिला नाही. ज्या काही चित्रपटांमध्ये मी काम केलं, ते काही खास पाहण्यासारखे नाहीत. अनेकदा मलाच माझं फिल्मी करिअर आठवत नाही आणि त्याचा मला आनंदच आहे", असं ती २०१८ साली तिच्या एका पुस्तकाच्या अनावरण कार्यक्रमात उपरोधिकपणे माध्यमांसमोर म्हणाली होती. ट्विंकलचा मेला हा चित्रपटसुद्धा फ्लॉप ठरला होता. यामध्ये आमिर खान आणि त्याचा भाऊ फैजल खान यांच्या भूमिका होत्या.

'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातील मंदाकिनीचं गाणं त्याकाळी खूप गाजलं होतं. या गाण्यामध्ये मंदाकिनीने बोल्ड सीन दिले असून धबधब्याखाली अंघोळ करतानाचा तिचा सीन विशेष चर्चेत होता.

loading image
go to top