नाटकवाल्यांचं ‘अडलंय का?’

नाट्यगृहावरच्या खर्चकपातीवर टोकदार भाष्य करणारे द्विपात्री नाटक
Two act play Adley Ka commenting on cost cutting of theatres
Two act play Adley Ka commenting on cost cutting of theatres

कला ही अभिव्यक्तीचे महत्त्वाचे माध्यम आहे. ती समाजमनाला प्रभावित करते. रसिकांना हसवते, मनोरंजन करते, आनंददायी जगण्याची प्रेरणा देते. कधी सत्ताधाऱ्यांवर प्रहार करते, चिमटे काढते. दुसरीकडे हीच कला राजाश्रयही मागते. समाजात जे घडते, त्याचे प्रतिबिंब वेगवेगळ्या कलेत उमटते. त्यामुळे कलावंतांचे अभिव्यक्त होणे समाजातील विकृतींची जाणीव करून देण्यासाठीही महत्त्वाचे आहे.

कलाकारांना त्यांची ही कला सादर करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा लागतात. चित्रकाराला कलादालन लागते. लेखक-कवींना रसिकापर्यंत पोचण्यासाठी ग्रंथप्रदर्शने आणि संमेलन भरवायची असतात. क्रीडापटूंना खेळण्यासाठी क्रीडांगणे लागतात. रंगकर्मीला रंगमंच, नाट्यगृह लागते. या सुविधा त्या-त्या भागातील शासन-प्रशासन देते; मात्र अलीकडच्या काळात ठिकठिकाणच्या नाट्यगृहांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्या देखभालीसाठी होणाऱ्या खर्चांवर मर्यादा आली आहे. त्यामुळे रंगकर्मींना त्यांच्या कला सादर करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्याविषयीचे वास्तवही रंगकर्मी वेगवेगळ्या माध्यमातून सांगत असतात. या नाट्यगृहावरच्या खर्चकपातीवर टोकदार भाष्य करणारे ‘अडलंय का..?’ हे द्विपात्री नाटक रंगमंचावर आले आहे.

जर्मन लेखक चार्ल्स लेविन्स्की यांनी लिहिलेल्या या नाटकाचे मराठी भाषांतर शौनक चांदोरकर यांनी केले आहे. अतुल पेठे, पर्ण पेठे आणि निपुण धर्माधिकारी यांनी रंगावृत्ती केलेल्या प्रयोगाचे दिग्दर्शक आहेत निपुण धर्माधिकारी.

नाटकाच्या गोष्टीचे घटनास्थळ जर्मनीतल्या एका शहरातील नाट्यगृहाचा रंगमंच आहे. तिथे अल्ब्रेश्ट (अतुल पेठे) नावाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी धडपडत पॉला (पर्ण पेठे) येते. पॉला एका कार्पोरेट कंपनीची कर्मचारी आहे. अल्ब्रेश्‍टला व्यावसायिक डील करायची आहे, त्यासाठी ही भेट ठरली आहे. पॉलाच्या प्रवेशानंतर रंगमंचावर येणारे नेपथ्य त्या थिएटरच्या वैभवाची श्रीमंती अधोरेखित करीत राहते. चकित करते आणि या नाटकाच्या अनुषंगाने संवादांसह नेपथ्यही बोलू लागते. नाट्यविषयाकडे नाटक सरकत असताना, या दोन्ही व्यक्तिरेखांची एकमेकांशी ओळख होते. पुढे काय होणार, याची उत्सुकता लागते. प्रयोग क्षणाक्षणाला कलाटणी घेतो, गुंतागुंत वाढते आणि धक्क्यावर धक्के देत हा नाट्यानुभव रसिकांना तल्लीन करतो.

पॉला ज्या कंपनीत काम करते, ती कंपनी नगरपालिकेला थिएटरच्या सवलतीत कपात करण्याविषयी सल्लागार म्हणून काम करते. कुठली डील करायची आहे, याविषयी पॉला विचारते. तिच्या प्रश्‍नावर अल्ब्रेश्‍ट हे थिएटर विकत घ्यायचे असल्याचे सांगतो. अल्ब्रेश्‍ट खोटे बोलत असला, तरी सवलती कमी करून, हळूहळू थिएटर बंद पाडण्याचाच तो एक मार्ग असतो. आपल्याकडे अनेक शहरांत अशाच नाट्यगृहाच्या ठिकाणी आता कॉम्प्लेक्स उभारले आहेत. तिथे काय धंदे चालतात, त्याबद्दल अल्ब्रेश्‍टने ताशेरे ओढले आहेत.

नाटकाची गोष्ट वळणे घेत थिएटरच्या सवलतींत होणारी कपात रोखण्यावर पोहचते. हा अल्ब्रेश्‍ट कुठलीही व्यावसायिक डील करणारा उद्योगपती नसून, तो एक नट असल्याचे सांगतो. नाटकाची समाजस्वास्थ्यासाठी किती गरज आहे, हे पॉलाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. या प्रयोगशील कवायतीत, नाट्यगृहाला सवलती मिळाल्याच पाहिजे, यावर रसिकांच्या मनाचाही ठाव घेतो; पण एवढ्यावरच हे नाटक थांबत नाही.

नाटकवाल्यांभोवती फिरणाऱ्या कथेत कार्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कशी टांगती तलवार असते, याविषयीचा ताण पॉलाच्या भूमिकेतून पर्णने अभिनित केला आहे. नाट्यगृहाच्या सवलतीत कपात करण्याच्या नाटकात कार्पोरेट कंपन्यांमधील कर्मचारी कपातीचा मुद्दाही फार ताकदीने अधोरेखित झाला आहे. पर्णचा रंगमंचावरचा वावर, तिची समज, अभिनयातली सहजता आणि टोकदार संघर्षासाठी लागणारी तिच्यातील अभिनयाची ऊर्जा अधोरेखित झाली आहे.

एखाद्या योजनेतील सवलतीत कपात करण्याविषयी कार्पोरेट कंपन्यांनी सल्ला कुठला द्यायचा आहे, हे ठरलेलेच असते का, कागदोपत्री रिपोर्ट करण्याची ती फक्त औपचारिकता असते का, यावरही हे नाटक बोलते. नाटकाची मूळ गोष्ट परदेशी रंगभूमीवरची असली, तरी ते जगातील प्रत्येक कलावंतांसह मराठी रंगभूमीवरही चफखल भाष्य करणारी वाटते. दोन तासांचा, दोन व्यक्तिरेखांचा हा दीर्घांक बापलेकीच्या अभिनय सामर्थ्याने घट्टपणे विणला आहे. नाट्यप्रयोगातील अतुल पेठे आणि पर्ण पेठे यांची अभिनयाची जुगलबंदी टोकदार करून, या नाटकाचे प्रयोगमूल्य निपुण धर्माधिकारी यांच्या दिग्दर्शनाने श्रीमंत झाले आहे.

नेपथ्य (प्रदीप मुळ्ये), संगीत (सौरभ भालेराव, नुपूरा निफाडकर), वेशभूषा (कल्याणी कुलकर्णी-गुगळे), प्रकाशयोजना (सचिन लेले, विक्रांत ठकार), सहाय्य (यश पोतनीस), रंगभूषा (आशीष देशपांडे) या साऱ्या बाबी रंगमंचावरील कलावंतांसोबतच कशा महत्त्वाच्या ठरतात, याची जाणीव करून देणारा हा प्रयोग सर्वांगसुंदर झाला आहे. नाट्यविचाराचा आशय, विषय गंभीर असला, तरी तो रंजन करणारा आहे. टोकदार वादसंवादाच्या संघर्षात नाट्यगोष्टीतील भावनिक किनार तेवढ्याच संयमाने गुंफली आहे.

नाट्यगृहातील अनेक अडचणींवर मराठी रंगकर्मींचीही चर्चा होत असते. राज्यकर्ते, शासन, प्रशासनावर दोषारोपही केले जातात; पण या यंत्रणेवर नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचाही ताण असतोच. कला, क्रीडा, संस्कृती, अध्यात्म याकडेही मतमूल्यासाठी दुर्लक्ष करून चालत नसते. हेच वास्तव आहे की, आणखी काही, याचा शोध नाटक कंपनीने ‘अडलंय का?’द्वारे घेतला आहे.

mahendra.suke@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com