कलापूरच्या प्रेरणेतूनच ‘फिल्मफेअर’ला गवसणी!

कलापूरच्या प्रेरणेतूनच ‘फिल्मफेअर’ला गवसणी!

माझा जन्म उत्तरेश्‍वरातल्या उमरावकर गल्लीतला. त्यामुळे पेठेच्या वातावरणातच लहानाचा मोठा झालो. शाळा-कॉलेजला असल्यापासूनच अभिनय आणि एकूणच कलाविषयक जाणिवा अधिक समृद्ध होऊ लागल्या. स्नेहसंमेलन आणि पुढे राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून हा परीघ विस्तारत गेला.

कलापूर कोल्हापुरातल्या या कलात्मक वातावरणातूनच आपल्याला याच क्षेत्रात करिअर करायचे असल्याची जाणीव झाली. गेल्या वर्षी ‘अनाहुत’ या लघुपटासाठी फिल्मफेअर ॲवॉर्ड कलापुरात पहिल्यांदाच आणण्याचा मान आमच्या टीमने पटकावला. अजूनही बरेच काही करायचे आहे. लवकरच एक सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे आणि त्यासाठी कलापूरचंच पाठबळ मोलाचं ठरणार आहे...युवा लेखक व दिग्दर्शक उमेश बगाडे संवाद साधत असतो.

केवळ देदीप्यमान इतिहास सांगत राहण्यापेक्षा वर्तमानात विविध कृतिशील पावलं टाकत भविष्यात कोल्हापूरची कलानगरी ही ओळख आणखी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी काही तरुण मंडळी एकत्र येऊन संघटितपणे सध्या काम करत आहेत. याच तरुणाईचा हा एक प्रतिनिधी. 

उमेशचे शिक्षण मेन राजाराम हायस्कूल, कॉमर्स व विवेकानंद महाविद्यालयात झाले. वाणिज्य शाखेचा पदवीधर असलेल्या उमेशने सुरवातीच्या काळात लेखक आणि दिग्दर्शक म्हणून अनेक जाहिराती केल्या. त्याचदरम्यान माहितीपट आणि लघुपटांचं लेखन व दिग्दर्शनातही तो आला. 

‘सफर रत्नागिरीची’, ‘सुहाना सफर कोल्हापूर नगर’ या माहितीपटांसह विविध संस्थांचे माहितीपटही त्याने केले. ‘वन्स अपॉन अ नाईट’, ‘दि ट्रू बॉन्डिंग’, ‘विसर्जन’ अशा एकापेक्षा एक सरस लघुपटांचं लेखन व दिग्दर्शन करताना एक महत्त्वाचं वळण आले, ते ‘चौकट’ या लघुपटाच्या निमित्ताने. या लघुपटाने तब्बल सत्तावीसहून अधिक पुरस्कार मिळवले.

गोव्यातील ‘इफ्फी’सह इटलीतील महोत्सवातही या लघुपटानं रसिकांना भुरळ घातली. ‘अनाहुत’ या लघुपटानं तर थेट फिल्मफेअर ॲवॉर्डलाच गवसणी घातली. त्याशिवाय विविध महोत्सवांत त्या लघुपटानं चोवीसहून अधिक पुरस्कार मिळवले. श्रेयस तळपदेच्या ‘पोश्‍टर बॉईज’, ‘प्रतिज्ञा’ या चित्रपटांसाठी त्यानं सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील ‘चिडियाघर’, ‘संत ज्ञानेश्‍वर’,‘स्पिरीट ऑफ इंडिया’, ‘चिमणी पंख’ या मालिकांसाठी मुख्य सहाय्यक दिग्दर्शनाची तर डी.डी. सह्याद्री वाहिनीसाठी प्रॉडक्‍शन असिस्टंट म्हणूनही जबाबदारी चोखपणे सांभाळली. 

वैयक्तिक करियर तर आहेच. पण, त्याशिवाय कोल्हापुरातील समविचारी मंडळी एकत्र येवून विविध चित्रपटविषयक उपक्रम राबवतो आहेत. त्या जोरावर सारे मिळून कलापूरचा झेंडा सातासमुद्रापार नेवू.     
- उमेश बगाडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com