डिसेंबरमध्ये सिनेरसिकांसाठी ओटीटीवर वेबसिरीज आणि सिनेमांची तोबा गर्दी

web series
web series

मुंबई- लॉकडाऊनमुळे आठ महिने बंद असलेले थिएटर नवीन नियमावलीनुसार सुरु झाले तर आहेत मात्र प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे अजुनही ओटीटीचा पर्याय या दिवसात सगळ्यात बेस्ट ठरतोय. कोरोनाच्या या काळात ओटीटीवर अनेक बडे सिनेमे रिलीज करण्यात आले. आता तर वर्षाअखेरही अनेक निर्माते त्यांचे सिनेमे याच माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याच्या निर्णयात आहेत. डिसेंबर महिन्यात तर आता नवीन सिनेमांचा समावेश होणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ओटीटी माध्यमांवर अडकून असलेला प्रेक्षकांचा मनोरंजनाचा काटा पुन्हा सिनेमांकडे वळतो आहे की काय असं चित्र दिसतंय. पण प्रेक्षकांच्या या बदलत्या समीकरणांकडे लक्ष न देता दिवाळीपासूनच ओटीटीवर नवनव्या वेबमालिकांचा सिलसिला पुन्हा सुरू झाला आहे. डिसेंबरमध्येही ओटीटीवर नवीन वेबसिरीज आणि सिनेमांची गर्दी झालीये.

कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक लोक घरीच असल्याने ओटीटीवर वेबसिरीज आणि सिनेमा पाहण्याचं प्रमाण अचानक वाढलं आहे. प्रेक्षकांचा हा बदलता कल लक्षात घेत सरत्या वर्षांतही मनोरंजनाचा हा धमाका असाच कायम राहावा यासाठी ओटीटी माध्यमांनी कंबर कसली आहे. ओटीटी माध्यमांवर या महिन्याभरात रिलीज झालेल्या ‘ल्यूडो’, ‘छलांग’, ‘मिसमॅच’, ‘लक्ष्मी', 'आश्रम २’ यांसारख्या वेबसिरीज आणि सिनेमांना प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता नोव्हेंबरच्या अखेरीस भूमी पेडणेकरचा ‘दुर्गावती’ हा सिनेमा, ‘नक्सलबारी’, ‘डार्क ७ व्हाईट’, ‘ब्लॅक विडोज’, ‘पौरुषपूर’ या नवीन वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

२४ नोव्हेंबरला आज अल्ट बालाजीवर ‘डार्क ७ व्हाईट’ ही वेबसिरीज रिलीज झालीये. क्राईम-थ्रिलर ही वेबसिरीज सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय. सुमीत व्यास, निधी सिंग आणि जतीन शर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. दुसरीकडे नेटफ्लिक्सवर ‘व्हर्जिन रिव्हर’ या वेबसिरीजचा दुसरा भाग २७ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. आपल्या भूतकाळाला कंटाळून एक नर्स व्हर्जिन रिव्हर या छोटय़ाशा दुर्गम गावात येते. तेथे चांगल्या-वाईट घटनांचा सामना करत ती अनेक लोकांचे प्राण वाचवते यापुढील कथा प्रेक्षकांना दुसऱ्या भागात पाहायला मिळेल.

मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि गडचिरोली येथील नक्षलवाद हा नेहमीच बॉलीवूडचा आवडता विषय.  यावरच आधारित ‘नक्सलबारी’ ही वेबमालिका भेटीला येतेय. राजीव खंडेलवाल, सत्यदीप मिश्रा, शक्ती आनंद अशा कलाकारांकडून काही तरी वेगळं पाहण्याची संधी यातून मिळेल. यासोबतंच ‘दुर्गावती’ या हॉरर सिनेमातून भूमी पेडणेकर वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरवरून तर हा ‘कॉन्जुरिंग’ अथवा ‘अ‍ॅनाबेला’ या हॉरर सिनेमांच्या पठडीतील वाटतो. नेहमीच हटके भूमिका करणारी भूमी आता ‘दुर्गावती’मधून काय कमाल करते हे लवकरच समजेल. तर कपटी, हरामखोर, नवऱ्यांविरुद्ध कटकारस्थान करत त्यांची हत्या करून मजेत आयुष्य जगणाऱ्या तीन विधवांची कहाणी ‘ब्लॅक विडोज’ या वेबसिरीजमध्ये मांडण्यात आली आहे. स्वस्तिका मुखर्जी, शमिता शेट्टी आणि मोना सिंग या यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. खूप काळानंतर अशा प्रकारचा आशय ओटीटी माध्यमावर पाहायला मिळणार आहे.  मात्र यासाठी प्रेक्षकांना पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावी लागेल.

एका राजमहालातून अचानक गायब होणाऱ्या स्त्रियांची गोष्ट ‘पौरुषपूर’ या सिरीजमध्ये दाखवण्यात येईल. या व्यतिरिक्त ‘द मिडनाईट स्काय’, ‘नेल पॉलिश’, वरुण धवन आणि सारा अली खानचा ‘कुली नं. १’ हा सिनेमा आणि अरविंद अडिगा यांच्या बेस्टसेलर पुस्तकावर आधारित ‘द व्हाईट टायगर’ ही वेब सिरीजही या डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

upcoming movies and webseries releasing in december 2020  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com