esakal | ऑन-ड्युटी पोलिसांना वापरता येणार रणवीर, आलियाचे व्हॅनिटी व्हॅन्स

बोलून बातमी शोधा

Ranveer Singh and Alia Bhatt
ऑन-ड्युटी पोलिसांना वापरता येणार रणवीर, आलियाचे व्हॅनिटी व्हॅन्स
sakal_logo
By
स्वाती वेमूल

मुंबईतील बॉलिवूड चित्रपटांचं शूटिंग रद्द केले असताना आता त्या चित्रपटांचे व्हॅनिटी व्हॅन्स हे मुंबई पोलिसांसाठी वापरण्यात येणार आहेत. देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असताना पोलीस कर्मचारी स्वत:चे प्राण धोक्यात घालून सर्वसामान्यांच्या सेवेत हजर आहेत. अशात त्यांची थोडीफार मदत व्हावी यासाठी चित्रपटांच्या सेटवरील व्हॅनिटी व्हॅन्स पोलिसांसाठी वापरण्यात येणार आहेत. ऑनड्युटी पोलिसांना हे व्हॅनिटी व्हॅन वापरता येतील, अशी माहिती व्हॅनिटी व्हॅनचे मालक केतन रावल यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना दिली.

"रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटाचे, संजय लीला भन्साळींच्या गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाचे आणि आनंद एल राय यांच्या रक्षाबंधन या चित्रपटाचे व्हॅनिटी व्हॅन्स पोलिसांसाठी देण्यात येणार आहेत", अशी माहिती केतन रावल यांनी 'ई टाइम्स'शी बोलताना दिली. मुंबईसोबतच ठाणे पोलिसांसाठीही दहा व्हॅनिटी व्हॅन पुरवण्यात येणार आहेत. "गेल्या वर्षी महिला कोरोना योद्धांसाठी हे व्हॅन्स वापरण्यात आले होता. आता पोलिसांसाठी आम्ही देऊ इच्छितो", असं रावल म्हणाले.

हेही वाचा : सेलिब्रिटींच्या 'मालदिव व्हेकेशन'वर शोभा डे संतापल्या

कंगना राणावत, तापसी पन्नू, शिल्पा शेट्टी, जॉन अब्राहम यांसारख्या कलाकारांना रावल हे भाडेतत्वावर व्हॅनिटी व्हॅन द्यायचे. सध्या सर्वच चित्रपटांचे शूटिंग बंद असल्याने त्यांचा वापर पोलिसांना करता येणार आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मंगळवारी ६२ हजार ९७ नव्या रुग्णांची भर पडली. दिवसभरात ५४ हजार २२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत तब्बल ५१९ रुग्णांचा मृत्यू झाला.