esakal | लैंगिक गैरवर्तणूक प्रकरण; अभिनेता विजय राज यांना कोर्टाकडून अंतरिम दिलासा

बोलून बातमी शोधा

vijay raaz
लैंगिक गैरवर्तणूक प्रकरण; विजय राज यांना कोर्टाकडून अंतरिम दिलासा
sakal_logo
By
स्वाती वेमूल

शूटिंगदरम्यान क्रू मेंबरसोबत लैंगिक गैरवर्तणूक केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने अभिनेता विजय राज यांना अंतरिम दिलासा दिला आहे. विजय राज यांच्यावर सुरू असलेल्या खटल्याच्या कारवाईवर स्थगिती देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवरील महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर निर्मात्यांनी विजय राज यांना चित्रपटातून काढून टाकलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाली होती. 'माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी संबंधित महिलेने तथ्यहीन आणि खोटे आरोप केले आहेत', असं स्पष्टीकरण विजय राज यांनी दिलं होतं.

नेमकं काय आहे प्रकरण?

'शेरनी' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चित्रपटाच्या स्टाफमधील एका महिलेने विजय राज यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. चित्रपटातील कलाकार मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात आणि गोंदियातील हॉटेल गेटवे इथं शूटिंगनिमित्त मुक्कामी राहत होते. हॉटेल गेटवे इथं विजय राज यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप संबंधित महिलेनं केला होता.

निर्मात्यांना बसला होता आर्थिक फटका

विजय राज यांना चित्रपटातून काढून टाकल्यानंतर निर्मात्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. विद्या बालनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील जास्तीत जास्त दृश्ये ही विजय यांच्यावर चित्रीत करण्यात आली होती. तब्बल २२ दिवसांचं शूटिंग चालणार होतं. त्यासाठी दिवसाला जवळपास २० लाख रुपयांचा खर्च येणार होता. त्यामुळे विजय राज यांना काढून टाकल्यानंतर पुन्हा नव्याने ती दृश्ये त्यांना नवीन अभिनेत्यासोबत चित्रीत करावी लागणार होती.