Vijay Shinde Interview : चित्रपटसृष्टीत भक्कम पाय रोवणार! प्रसिद्ध निर्माते विजय शिंदेंचा निर्धार

आमच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट होता वरणभात लोंचा कोन नाय कोंचा. महेश मांजरेकर यांनी तो दिग्दर्शित केला होता.
Vijay Shinde Interview
Vijay Shinde Interviewesakal

Vijay Shinde Interview : निर्माते विजय शिंदे यांनी ‘नाईंटीनाईन प्राॅडक्शन्स’च्या अंतर्गत आतापर्यंत तीन चित्रपट मोठ्या पडद्यासाठी बनविले आहेत. आता त्यांचा चौथा चित्रपट बापल्योक येत आहे. वडील आणि मुलाच्या नात्याभोवती फिरणारी ही कथा आहे. शशांक शेंडे, नीता शेंडे, पायल जाधव, विठ्ठल काळे वगैरे कलाकार काम रीत आहेत. याबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत..

-

1. चित्रपटसृष्टीत तुम्ही आता चौकार मारला आहे. तुमच्या प्रॉडक्शन हाऊसतर्फे चौथा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याबाबत तुम्ही काय सांगाल...?

- आमच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट होता वरणभात लोंचा कोन नाय कोंचा. महेश मांजरेकर यांनी तो दिग्दर्शित केला होता. त्यानंतर सोयरिक चित्रपट आला. दिग्दर्शक व निर्माते महेश टिळेकर यांच्याबरोबर हवाहवाई चित्रपट केला आणि आता चौथा चित्रपट येत आहे बापल्योक. गेल्या तीनेक वर्षांत चार चित्रपट झाले याचा आनंद खूप आहे.

कारण आपल्याकडे काय होते की अनेक निर्माते एखादा चित्रपट काढून बाद होतात. परंतु मी अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे. कारण मला खूप खेळायचे आहे. अर्थात मला सकस आणि आशयघन चित्रपट बनवायचे आहेत. बापल्येक हा चित्रपट म्हणजे माझे लाडके बाळ आहे. या चित्रपटाला पुण्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळालेले आहेत.

आपल्याकडे काय होते की अनेक चित्रपटांना विविध पुरस्कार मिळतात. परंतु पुरस्कारांबरोबरच व्यावसायिक यश मिळविण्याची ताकद खूप कमी चित्रपटांमध्ये असते. आमचा हा चित्रपट पुरस्कारांरोबरच तद्दन मनोरंजन करणारा असाच आहे. त्यामुळे व्यावसायिकदृष्टय़ा हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईल याची मला खात्री आहे.

२. नागराज मंजुळे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. मग हा योग कसा काय जुळून आला...?

- नागराज आणि माझी ओळख मी झी टॉकिजला असतानाची आहे. मी झीमध्ये असताना तो प्रोमो प्रोड्युसर होता. तेव्हापासूनची आमची ओळख आहे. आता नागराज मंजुळे हा एक ब्रॅण्ड तयार झाला आहे आणि तो कुठल्याही चित्रपटासाठी आपले नाव लावील असे मला वाटत नाही.

त्याने आमचा चित्रपट पाहिला आणि त्याला तो खूप आवडला. तो सगळ्यांना सांगतो आहे की हा चित्रपट मी करीत आहे ते विजय माझा मित्र आहे म्हणून नाही तर चित्रपटाचा विषय खूप गोड आहे. वडील आणि मुलाच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा विषय युनिव्हर्सल आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

3. चित्रपटाचा विषय नेमका काय आहे....?

- सरळ आणि साधी कथा आहे. आम्ही ती सोप्या भाषेत मांडलेली आहे. प्रत्येक कुटुंबात घडणारी अशीच ही कथा आहे. पूर्वीच्या काळी वडील म्हणजे एक प्रकारचा धाक असायचा. त्यांचा घरात मोठा दरारा असायचा. त्यामुळे एखादा मुलगा वडिलांपेक्षा आईकडे अधिक आपल्या गोष्टी सांगायचा. आजची परिस्थिती काहीशी निराळी आहे.

आपण आपल्या वडिलांचे मित्र झालो तर आपल्याला चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून शिकता येतात. कारण आज ना उद्या सगळ्यांना या जगाचा निरोप घ्यायचा आहे. त्यामुळे मेल्यानंतर दुःख व्यक्त करण्यापेक्षा जिवंत असताना काही चांगल्या गोष्टी शिकता आल्या तर त्या आठवणी कायमच्या स्मरणात राहतात. वडील आणि मुलगा यांनी एकमेकाशी शेअर केलेल्या गोष्टी दोघांच्याही आयुष्यात कायमच्या राहतात. वडील आणि मुलाच्या भावनिक नात्याची ही कथा आहे.

Vijay Shinde Interview
Ghoomer Review: एक हात नसला म्हणून काय झालं, मनात आणलं तर काहीही अशक्य नाही सांगणारा 'घूमर'

4. दिग्दर्शक मकरंद मानेची निवड तुम्ही कशी काय केलीत..?

- मकरंदचा रिंगण हा चित्रपट मी पाहिला आणि त्याचा फॅन झालो. तो अत्यंत प्रामाणिक आणि पॅशनने काम करतो. काम करीत असताना अन्य कोणत्याही गोष्टीचा तो विचार करीत नाही. मी झीमध्ये असताना तो मला काही तरी ऐकवायला यायचा. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करावे असे मला तेव्हापासूनच वाटत होते.

झी मधून बाहेर पडल्यानंतर त्याने मला ही गोष्ट ऐकविली आणि त्याच वेळी या कथेवर चित्रपट करायचा असे मी ठरविले. सोयरिक चित्रपटाच्या अगोदरच मी ही कथा निवडली होती. त्याच्याबरोबर सोयरिकनंतर ही माझी दुसरी फिल्म आहे. मकरंद आणि माझे बाँडिंग छान जुळलेले आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना मजा येते.

Vijay Shinde Interview
Gadar 2 Review : तुम्ही दरवेळी पाकिस्तानात जायचं, तोडफोड करुन भारतात यायचं, प्रेक्षकांनी ते पाहायचं! म्हणजे आम्ही वेडे?

5. सध्या तुमच्या चित्रपटातील उमगाया बाप रे....हे अजय गोगावलेने गायलेले गाणे खूप गाजते आहे. काय सांगाल त्याबाबत...?

- आमच्या या गाण्याला वीस लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत. लोकांच्या पसंतीस ते गाणे उतरले आहे. गुरू ठाकूर यांचे शब्द आणि विजय गवंडे यांनी संगीत दिले आहे. या हृदयस्पर्शी गाण्यात चित्रपटाचा संपूर्ण मतितार्थ लपलेला आहे.

6. पूर्वीच्या काळी समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट अशी विभागणी केली जायची. सध्याचे चित्र नेमके कसे काय आहे असे तुम्हाला वाटते...?

- आज मनोरंजन क्षेत्राचा मोठा विस्तार झाला आहे. दिवसागणिक नवनवीन आशय आणि विषयांवरील चित्रपट येत आहेत. जागतिक सिनेमा आता आपल्या अगदी जवळचा झाला आहे. सध्याचे दिग्दर्शक देशातीलच विविध भाषांतील नाही तर जागतिक चित्रपटांचा चांगला अभ्यास करीत आहेत. मराठीमध्ये काय वेगळे देता येईल याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत. विशेष बाब म्हणजे सध्याचे दिग्दर्शक व्यावसायिक विचार करणारे आहेत.

7. ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्याचा कितपत फटका मराठी चित्रपटांना बसला आहे असे तुम्हाला वाटते...?

- थोड्या फार प्रमाणात तो बसलेला आहे. कारण आज मोबाईल सगळ्यांच्या हातात आहे. त्यामुळे ते एक मनोरंजनाचे मोठे साधन झाले आहे. त्यातच चित्रपट थिएटरमध्ये लागला की काही दिवसांनी तो ओटीटीवर येईल अशी काहीशी धारणा लोकांची झाली आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेच प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत.

ते हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याची वाट पाहात असतात. त्याचा परिणाम चित्रपटांवर होत आहे. त्यामुळे चित्रपटगृह, वितरक आणि निर्माते अशा सगळ्यांना त्याचा फटका बसत आहे. परंतु सध्याचे चित्र निराळे आहे. बाईपण भारी देवा या मराठी चित्रपटाबरोबरच गदर २ हा हिंदी चित्रपट चांगला व्यवसाय करीत आहे. प्रेक्षक चित्रपटगृहात येतआहेत याचा सगळ्यांना आनंद झाला आहे. सगळ्यांचा उत्साह आता वाढलेला आहे.

8. एक निर्माता म्हणून मराठीमध्ये कोणती आव्हाने आहेत?

-मराठीमध्ये एखाद-दुसरा चित्रपट करून अनेक निर्माते बाद झालेले आहेत. कारण त्यांनी याकडे व्यवसाय म्हणून कधी पाहिलेच नाही. हाताच्या बोटावर मोजता येतील असे काही निर्माते आहेत की त्यांनी हा व्यवसाय म्हणून स्वीकारला आणि म्हणूनच आज ते टिकून आहेत. मी या इंडस्ट्रीत आलो आहे ते चांगले प्रोजेक्ट देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आणि येथे एक निर्माता म्हणून आपले पाय भक्कम रोवण्यासाठी.

9. गेल्या तीन वर्षात तुम्ही चार चित्रपट बनविले आहेत. आता पुढे काय....?

- चार चित्रपट थिएटरसाठी आणि एक चित्रपट टीव्हीसाठी बनविला आहे. विठ्ठल माझा सोबती हा चित्रपट छोट्या पडद्यासाठी बनविला आणि आता बापल्येक या चित्रपटाला प्रेक्षक कशी काय साथ देतात याची प्रतीक्षा आहे. भविष्यात प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असेच चित्रपट बनवायचे आहेत. खूप अभ्यास आणि निरीक्षण करायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com