
ऋषी यांचा हॉस्पिटलमधील एका कर्मचा-याकडून गाणं ऐकतानाचा व्हिडिओ समोर आला आहे..हा व्हिडिओ त्यांचा शेवटचा व्हिडिओ म्हणून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
मुंबई- अभिनेता ऋषी कपूर यांच निधन झाल्याने बॉलीवूडसोबतंच चाहत्यांमध्येही शोकाकुल वातावरण आहे. सोशल मिडियावर बी-टाऊनमधले कलाकार आणि चाहते ऋषी यांच्या आठवणीत दुःख व्यक्त करताना दिसत आहेत. याचदरम्यान ऋषी यांचा हॉस्पिटलमधील एका कर्मचा-याकडून गाणं ऐकतानाचा व्हिडिओ समोर आला आहे..हा व्हिडिओ त्यांचा शेवटचा व्हिडिओ म्हणून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
हे ही वाचा: ऋषी कपूर अनंतात विलीन, जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडले अंत्यसंस्कार
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ हॉस्पिटलमधील असून ऋषी बेड वर झोपून एका मुलाकडून गाणं ऐकत आहेत आणि या व्हिडिओच्या शेवटी ते त्या मुलाला आशिर्वाद देखील देत आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही जो मुलगा पाहत आहात तो आरोग्य कर्मचारी असल्याचं त्याच्या पेहरावावरुन वाटत आहे. तो ऋषी यांच्यासाठी गाणं गात आहे आणि त्याचा त्याने सेल्फी व्हिडिओ बनवला आहे. ऋषी हे गाणं बेडवर झोपून आनंदाने ऐकताना दिसत आहेत.हे गाणं ऐकल्यानंतर ऋषी त्याच्या गाण्याची स्तुती करत त्याला आशिर्वाद देतात.
ऋषी त्याला आशिर्वाद देताना म्हणत आहेत, ''खुप नाव कमंव, यश मिळव. मेहनत कर कारण प्रसिद्धी आणि पैसा मेहनतीनंतरंच मिळतो. मेहनतीसोबत जेव्हा थोडं नशीब साथ देईल तेव्हा सगळं काही व्यवस्थित होईल. बस्स केवळ एवढचं लक्षात बाकी काही नाही.'' मात्र हे बोलताना जर नीट पाहिलं तर लक्षात येईल हे बोलताना त्यांना थोडा दम देखील लागत आहे.
आज सकाळी ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं होतं की ऋषी शेवटच्या क्षणीही रुग्णालयातील कर्मचा-यांसोबत हसत खेळत राहून त्यांचं मनोरंजन करत होते. त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्या हॉस्पिटलमधील अखेरच्या क्षणाचा असून शेवटचा व्हिडिओ असल्याची चर्चा आहे.. मात्र हा व्हिडिओ आत्ताचा नसून यावर्षाच्याच फेब्रुवारी महिन्यातील आहे. व्हिडिओमध्ये जो मुलगा दिसतोय त्याच्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडिओ फेब्रुवारी २०२० मध्ये पोस्ट केल्याची माहिती आहे.
या व्हिडिओमध्ये जे गाणं तुम्ही ऐकत आहात ते ऋषी कपूर यांच्या 'दिवाना' यासिनेमातील आहे. 'दिवाना' हा सिनेमा १९९२ मध्ये रिलीज झाला होता. ऋषी कपूर यांच्या सोबत या सिनेमात दिव्या भारती आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत होते. हा केवळ सिनेमाच नाही तर या सिनेमातील गाणीही प्रेक्षकांनी उचलून धरली होती. या सिनेमात ऋषी यांच्या भूमिकेचं नाव रवी होतं.
आज सकाळी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केल्यावर ऋषी कपूर यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मग सोशल मिडियावर अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी दुःख व्यक्त करायला सुरुवात केली. बुधवारी २९ एप्रिल रोजी अभिनेता इरफान खानने जगाचा निरोप घेतला आणि त्यानंतर लगेचच आज गुरुवारी ३० एप्रिल रोजी ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली.
viral video rishi kapoor giving blessings to hospital staff