esakal | वेबसिरीज - डेंजरस : प्रभावहीन रहस्यकथा
sakal

बोलून बातमी शोधा

Web-series dangerous

अभिनेत्री बिपाशा बसूने ‘डेंजरस’ या रहस्यकथेतून आपलं वेब प्लॅटफॉर्मवरील पदार्पण केलं आहे; मात्र एमएक्‍स प्लेअरवरील ही वेबसिरीज ना धड कथानकाला, ना बिपाशाच्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकलीय.

वेबसिरीज - डेंजरस : प्रभावहीन रहस्यकथा

sakal_logo
By
विशाखा टिकले पंडित

गुन्हेगारी विश्व आणि रहस्यकथांवर बेतलेल्या वेबसिरीजना सध्या मोठी मागणी आहे. अभिनेत्री बिपाशा बसूने ‘डेंजरस’ या रहस्यकथेतून आपलं वेब प्लॅटफॉर्मवरील पदार्पण केलं आहे; मात्र एमएक्‍स प्लेअरवरील ही वेबसिरीज ना धड कथानकाला, ना बिपाशाच्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकलीय.

‘डेंजरस’ची कथा एका अपहरणनाट्याभोवती फिरते. आदित्य धनराज या श्रीमंत उद्योगपतीची पत्नी दिया गायब होते. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी नेहाकडे सोपवला जातो. आदित्य नेहाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर असतो. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असावेत, या संशयातून आदित्यनं आपला मित्र विशाल याला दियाचा ड्रायव्हर बनून तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं असतं. काही काळातच विशाल हाच दियाचा अपहरणकर्ता असल्याचं पोलिसांच्या लक्षात येतं. त्याचप्रमाणं दियाचे विशालसोबतच संबंध असल्याचं नेहा आणि आदित्यला समजतं. विशाल दियाला सोडण्याच्या बदल्यात पैशाची मागणी करतो. त्यानंतर कथेत अनेक वळणं येत जातात. हे अपहरणनाट्य अनेकांचे जीवदेखील घेतं आणि शेवटी एका धक्कादायक वळणावर येऊन संपतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अपहरणनाट्यावर आधारित कथानकांमध्ये महत्त्वाची असतात ती या नाट्यातील रहस्यांनी घेतलेली पकड. सुरुवातीपासूनच ही रहस्यं प्रेक्षकांना गुंतवून ठेवू शकली, तरच त्यांचा पाठलाग शेवटपर्यंत खिळवून ठेवू शकतो. या सिरीजच्या बाबतीत नेमकं हेच घडत नाही. पोलिस अधिकाऱ्याच्या हुशारीपेक्षा तिच्या छान दिसण्याला आणि बोल्ड दृश्‍यांवरच जास्त फोकस पाहायला मिळतो. पोलिस अधिकारी नेहापेक्षा ग्लॅमरस बिपाशाच जास्त समोर येते. अनावश्‍यक बोल्ड दृश्‍यांचा आणि गाण्यांचा भरणा केल्यानं कथानकातील रहस्य बराच वेळ बाजूला पडतं. कथेच्या मांडणीतील अनेक त्रुटींमुळं समोर घडत असलेल्या गोष्टींवर विश्वास बसत नाही व मालिका गुंतवून ठेवण्यात अपयशी ठरते. शेवटही घाईघाईत उरकल्यासारखा वाटतो. ज्या गोष्टीवरून या सगळ्या अपहरणनाट्याचा उलगडा होतो, तो प्रसंगही फारसा परिणामकारक ठरत नाही. या कथेसाठी संवाद प्रभावी असणं गरजेचं होतं. लंडनचं सुंदर चित्रण वगळता फारशा काही गोष्टी या मालिकेत हाती लागत नाहीत. थोडक्‍यात, आजवर केलेल्या पठडीतल्या सिनेमांपेक्षा वेबविश्वात काही तरी वेगळं करण्याची संधी या सिरीजमध्ये बिपाशानं गमावली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image
go to top