ऑन स्क्रीन : स्पेशल ऑप्स १.५ : केके मेननची ‘हिम्मत’वाली स्टोरी | Entertainment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

special ops 1.5 movie
ऑन स्क्रीन : स्पेशल ऑप्स १.५ : केके मेननची ‘हिम्मत’वाली स्टोरी

ऑन स्क्रीन : स्पेशल ऑप्स १.५ : केके मेननची ‘हिम्मत’वाली स्टोरी

sakal_logo
By
विशाखा टिकले-पंडित

भारतीय गुप्तचर यंत्रणा अर्थात रॉचा एक अतिशय हुशार आणि कर्तबगार एजंट हिम्मत सिंग याच्या बहाद्दुरीचे किस्से ‘स्पेशल ऑप्स’ या वेबसीरिजमधून मांडले होते. याआधी २०२०मध्ये प्रदर्शित झालेल्या या सीरिजला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. आता पुन्हा हिम्मतसिंगच्या आणखी एका यशस्वी मोहिमेला घेऊन ‘स्पेशल ऑप्स १.५’ डिस्ने हॉटस्टारवर दाखल झाली आहे. आधीच्या सीझनप्रमाणे येथेही रंजकता आणण्याचा पुरेपूर प्रयत्न लेखक दिग्दर्शकाने केला आहे, मात्र आधीच्या सीझनशी तुलना केल्यास हा प्रयत्न काही ठिकाणी तोकडा पडलेला दिसतो.

सीरिजची सुरुवात हिम्मतसिंगच्या निवृत्तीनंतर त्याला मिळणाऱ्या पॅकेजसंदर्भातील बोलणी करताना बॅनर्जी आणि चढ्ढा हे अधिकारी दिसतात. हिम्मतसारख्या कर्तबगार व्यक्तीला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी त्याने केलेल्या कामांविषयी जाणून घेण्यासाठी त्याच्या अतिशय जवळची व्यक्ती असलेल्या दिल्ली पोलिस दलातील अब्बास शेख याला बोलावण्यात येते. अब्बासच्या बोलण्यातून एका अतिशय महत्त्वाच्या मोहिमेची आणि ती मोहीम किती बहादुरीने हिम्मतसिंगने सफल करून दाखवली त्याची माहिती मिळते. देशाच्या सुरक्षेशी संबंधित काही अधिकाऱ्यांचे अचानक मृत्यू होतात आणि रॉचा एक एजंट मनिंदर गायब होतो. देशाची महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती पडू न देण्याची जबाबदारी हिम्मतसिंग आणि विजयकुमार या दोघांवर सोपवण्यात येते ही जबाबदारी त्यांना पार पाडता येते का, याचे उत्तर चार भागांच्या या सीरिजमध्ये देण्यात आले आहे.

निवृत्तीकडे झुकलेल्या हिम्मतसिंगच्या तरुणपणातील कामगिरीविषयी सांगताना कथा अनेकवेळा फ्लॅशबॅकमध्ये जाते. पहिल्या सीझनप्रमाणे रॉची काम करण्याची पद्धत, पोलिस आणि रॉचे अधिकारी यांच्यातील संबंध, हनी ट्रॅपने भारतीय अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केले जाणे, परदेशी भूमीवर चालणाऱ्या भारतविरोधी कारवाया यांमधून रॉच्या मोहिमेंमधील थरारक क्षण एका कथेत गुंफण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हनी ट्रॅप करण्यात आलेले वरिष्ठ अधिकारी इतके हास्यास्पद दाखवण्यामागचा लेखक दिग्दर्शकाचा हेतू लक्षात येत नाही. यामुळे एकूणच कथेच्या मांडणीतील गांभीर्य कमी होते. हिम्मतसिंग आणि मनिंदर यांच्यात रंगलेला खेळ सुरवातीपासून चांगल्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. मात्र, या खेळाचा आणि पर्यायाने या सीरिजचा क्लायमॅक्स मात्र झटपट संपवल्यासारखा वाटतो. कथेत पुढे काय घडणार याचा सहज अंदाज बांधता आल्याने उत्कंठा कमी होत जाते.

या सीरिजची जमेची बाजू आहे केके मेनन. हिम्मतसिंगच्या भूमिकेतून केके मेनन याने सीरिज जवळपास आपल्या खांद्यावर तोलली आहे. विजयकुमारच्या भूमिकेत आफताब शिवदासानीला फार वाव नसला, तरी त्याने वाट्याला आलेली भूमिका चांगली निभावली आहे. अभिनय, छायाचित्रण, ॲक्शन सीन्स आणि पार्श्वसंगीतात सीरिजने चांगली कामगिरी केली आहे. एकंदरीत, गुप्तचर यंत्रणा आणि त्यांच्या यशस्वी मोहिमांबद्दल असलेल्या आकर्षणासाठी आणि केके मेननच्या अभिनयासाठी एकदा पाहायला हरकत नाही.

loading image
go to top