कोल्हापूर म्हणजे झपाटून काम करण्याचा संस्कार

संभाजी गंडमाळे
बुधवार, 10 एप्रिल 2019

मुंबईत लाखो तरुण फिल्म इंडस्ट्रीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र, मी निराश कधीच झालो नाही. कारण जे काही करायचं ते सर्वोत्कृष्टच आणि त्यासाठी झपाटून काम करणं, हा कोल्हापुरी संस्कारच नेहमी प्रेरणा देत राहतो..

बॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नाही. आत्मविश्‍वास आणि कष्टाच्या जोरावर वाटचाल सुरू आहे. मुंबईत लाखो तरुण फिल्म इंडस्ट्रीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र, मी निराश कधीच झालो नाही. कारण जे काही करायचं ते सर्वोत्कृष्टच आणि त्यासाठी झपाटून काम करणं, हा कोल्हापुरी संस्कारच नेहमी प्रेरणा देत राहतो... प्रसिद्ध मॉडेल व अभिनेता वासीम फरास संवाद साधत असतो आणि त्याच्या वाटचालीतील विविध पदर उलगडत जातात. 

वासीम मंगळवार पेठेतील बाराईमाम परिसरातला. गेल्या काही वर्षात सर्व म्युझिक चॅनेल्सवर ‘दि ग्रेट सिंगर ऑफ पंजाब’ हंसराज हंस यांच्या ‘यारा ओ यारा’ अल्बम आणि त्यातील ‘तेरे शहर को सजदा कर चले’ हे गीत अनेकांना भुरळ घालते आहे. या म्युझिक अल्बममधून ‘ब्रेक’ मिळालेला वासीम आता मॉडेलिंगबरोबरच विविध दूरचित्रवाणी मालिका आणि जाहिरातींतून झळकतो आहे. अभिनेता हृत्विक रोशनबरोबर त्याने नुकतीच एक जाहिरात केली तर दक्षिणेतील जाहिरातीतही त्याला मागणी वाढली आहे. झी टीव्हीवरील ‘कसम से’ मालिका आणि त्यानंतर कलर्स चॅनलवरील ‘बेइंतेहा’ मालिकेचा तो नायक होता. बॉलीवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘चिछोरे’ या आगामी चित्रपटातही तो झळकणार आहे. 

वासिम हारुण फरास यांचा नातू, तर माजी महापौर बाबू फरास यांचा मुलगा. ‘वासीमला हिरो करायचे’ ही आजोबांची इच्छा. पुढे कॉमर्स कॉलेजमध्ये शिकत असताना विविध फॅशन शोमध्ये तो सहभागी होऊ लागला. कोल्हापुरात झालेल्या ‘मिस साऊथ महाराष्ट्र’ कार्यक्रमातून वासीमची मुंबईतील मॉडेलिंग क्षेत्रातील काही लोकांशी ओळख झाली आणि याच क्षेत्रात ‘करिअर’ करण्यासाठी त्याने मुंबई गाठली. 

मुंबईत राहायचे आणि ज्या क्षेत्रात आलो आहे, त्या क्षेत्रासाठी आवश्‍यक शुद्ध हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलण्याची सवय प्रथम करून घ्यावी लागली. अंगभूत अभिनयकौशल्याला रोशन तनेजा ॲक्‍टिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नवी झळाळी मिळाली. सुरवातीच्या काळात विक्‍स, रिलायन्स, रेमंड, पार्क ॲव्हेन्यू आदी कंपन्यांच्या जाहिरातीतून तो प्रथम छोट्या पडद्यावर आला; तर त्यानंतर स्टार प्लस वाहिनीवरील ‘संतान’ मालिकेतील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले आणि हळूहळू वासीमची ‘टॅलेंट अँड गुडलुकिंग’ अशी या क्षेत्रात ओळख निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wasim Faras interview