ममता कुलकर्णी ते दीपिकापर्यंत; बॉलीवूड आहे एमडीचे शिकार; हे एमडी आहे तरी काय?

ganja
ganja

नागपूर : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनपर्यंत पोहोचला आहे. केंद्र सरकारच्या अधिकारात येत असलेल्या एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या तपासात सारा अली खान, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर या प्रसिद्ध सिनेतारकांसह तरुणांच्या ह्रदयाची धडकन बनलेली दीपिका पदुकोण हिचेही नाव समोर आले आहे. दीपिका आणि जया साहा यांच्यातील व्हॉट्स अ‍ॅपवरील संवाद उघड झाले असून यात दीपिका गांजाची मागणी करते आहे.

बॉलिवूडमधील गांजाचे सेवन करणारे बरेच जण समोर येऊ लागले आहेत, तर श्रद्धा कपूर हिने सीबीडी ऑईल मागितले होते. हा देखील अमली पदार्थ हल्ली मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ लागला आहे.

८०-९० च्या दशकात बॉलिवूडवर अंडरवर्ल्डचे राज्य होते. तेव्हाही बॉलिवूड आणि अंमली पदार्थ याचे कनेक्शन पुढे आले होते. बॉलिवूडमधील अनेक नावे अंमली पदार्थांच्या सेवनाच्या आरोपात पुढे आली होती. आता परत एकदा बॉलिवूड अंमली पदार्थांच्या विळख्यात चांगलेच अडकत चालले आहे. यानिमित्ताने या अंमली पदार्थांचा इतिहास वाचणे मनोरंजक ठरेल.

गांजाचा वापर भारतीय उपखंडात चार हजार वर्षांपासून होतो आहे. शिवाय गांजा या वनस्पतीला आयुर्वेदिक महत्त्व आहे. पौराणिक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो.‘भांग, गांजा या शब्दाचा उल्लेख अथर्ववेदात असून तेथे त्याचा ‘पवित्र’ गवत या अर्थी उल्लेख सापडतो. सोम, कुश जव व सह या हवनीय वनस्पतीत भांग या वनस्पतींचाही समावेश आहे. याचा औषधी वनस्पती म्हणून उल्लेख प्रथम सुश्रुतांत आहे. जो ८ व्या शतकांपूर्वीचा आहे. नंतरच्या चार शतकांत जंगली रोप म्हणून भांगेचा उल्लेख संस्कृत कोशांत आहे. १० व्या शतकांत भांगेचा मादक गुणधर्म सांगण्यात आला आहे.

नागा साधु गांजाचे सेवन करतात, असे अनेक उल्लेख आढळतात. भांगेचे सेवन तर पूर्वापार चालते. भगवान शंकराचा प्रसाद म्हणूनही भांग सेवन केली जाते. अनेक हिंदी सिनेमांमध्येही भांग सेवनाचे प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत. राजेश खन्ना आणि मुमताजवर चित्रित करण्यात आलेल्या जय जय शिव शंकर या गाण्यात भांग सेवनाचा उल्लेख आहे.
डॉन सिनेमातील अमिताभ बच्चनवर चित्रित केलेल्या या गाण्यातही भांग सेवनाचा संदर्भ आहे.

भांगेचे झाड सुमारे तीन हात उंच वाढते. भांगेच्या झाडापासून मुख्यतः तीन प्रकारचे उत्पन्न काढले जाते, झाडाच्या सालीतून दोर, दोरखंड व जाडे भरडे कापड तयार होते, बीयापासून तेल, तर झाडाला येणारे तुरे, त्यातून गांजा तयार होतो. तो सुकविल्यावर जो चुरा राहतो त्याला भांग म्हणतात. गांजा चिलमीतून ओढल्याने नशा येते. तसेच भांगेच्या झाडाची पाने, दांडे, तुरे व फळ हे सर्व एकत्र करून कुटल्यावर राळेसारखा पदार्थ निघतो ज्याला चरस म्हटले जाते, जो भांग व गांजा यांच्यापेक्षा जास्त नशा देतो. एक एकर गांजाची लागवड केल्यास त्यातून एक टन जरी उत्पादन झाले तरी सध्याच्या जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत दोन कोटी रुपये आहे.

१९८५ पूर्वी गांजाची लागवड भारतात अधिकृत सुरू होती. मात्र, त्यानंतर याच्या उत्पादनाला कायद्याच्या चौकटीत आणून त्यावर बंदी घालण्यात आली आहे. गांजा सेवन, तसेच गांजा उत्पादन, साठवण, वाहतूक, खरेदी, विक्री, आंतरराज्य आयात-निर्यात करणे या गोष्टी ‘मादक द्रव्ये आणि मनोवैज्ञानिक पदार्थ कायदा, १९८५’ अंतर्गत गुन्हा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास 6 महिने ते २० वर्षांची सक्त मजुरी किंवा १० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही अशी तरतूद आहे.

गांजाचे दुष्परिणाम
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गांजाचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. खासकरून मेंदू, चेतातंतू, पचनसंस्था, मूत्रसंस्था, जननसंस्था, रक्त, श्वसनसंस्था वगैरे. गांजाची मात्रा वाढल्यास प्रचंड झोप येणे, अगदी बेशुद्धीपर्यंत अवस्था येऊ शकते. निरनिराळे भास होणे, खूप आनंद वाटणे वगैरे परिणामांमुळे गांजा सेवनाकडे कल वाढतो. गांजाचे व्यसन खूप दिवस असल्यास भूक मंदावणे, अशक्तपणा, थरथरणे, गोंधळल्यासारखे वाटणे, लैंगिक इच्छा कमी होणे असे दुष्परिणाम होतात. वीर्य पातळ होणे त्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. गांजामुळे बाधा झालेल्या रुग्णास श्वसनाचे आजार होतात व अचानक श्वसन थांबून मृत्यू येण्याचा संभव असतो. गांजाच्या वापराने रक्तदाब वाढतो आणि रक्तदाब वाढल्याने हृदयविकार होऊ शकतो. गांजाचे व्यसन खूप दिवस असल्यास फुफुसाचा कर्करोग, रक्ताचा कर्क रोग, मेंदूचा कर्क रोग होऊ शकतो.
गांजाचे असे भयंकर परिणाम असले तरी अमेरिकेत मात्र त्याचा सर्रास वापर होतो.गांजा सेवनावर बंदी नाही.

काय आहे सीबीडी ऑईल?
सीबीडी ऑईल हे भांगेच्या झाडाच्या बियांमधून काढले जाते. हा पाण्यात न विरघळणारा अमली पदार्थ आहे. यातून मानसिक उत्तेजना मिळते. चिंताग्रस्त, नैराश्य, ह्रदयविकार, निद्रानाश आणि कॅन्सरच्या उपचारातून होणार्या असह्य वेदना असतात या सर्व व्याधींवर उपचार म्हणून काही प्रमाणात हे तेल वापरले जाते. या तेलाचे जास्त सेवन केले तर घसा सुकणे, डायरिया असे त्रास होतात. २०१४ मध्ये कायद्यात शेवटच्या सुधारणेनुसार सीबीडी तेलाचा वापर औषध निर्मितीसाठी करण्याकरता सूट दिली आहे. परंतु, यावर सरकारी नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे सरकारच्या नियमावलीप्रमाणे या तेलाची विक्री आणि वितरण करणे बंधनकारक आहे. याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता आहे. याचे सेवन केल्याने याची नशा लगेच चढत नाही हळूहळू चढते व दीर्घकाळासाठी झोप लागते.

एमडीचा प्रभाव का वाढतोय?
‘एमडी’ अर्थात मेफेड्रॉन हे फोर मिथाईलमेथ कॅथिनॉन या रसायनापासून बनलेल्या मिश्रणाची पावडर आहे. ते अ‍ॅम्फेटामाईन रसायनाशी मिळते जुळते आहे. एमडी ही टिटामाइनसारखीच असली तरी अजूनही अमली पदार्थांमध्ये तिचा समावेश झालेला नाही. तसा समावेश होण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने केंद्राकडे अलीकडेच प्रस्ताव पाठविलेला आहे. सुरुवातीला सहज म्हणून जरी ‘एमडी’ची चव घेतली तर कायमचे तिच्या आहारी जाण्याची भीती असते. ती सेवन करणाऱ्याला किमान अर्धा ते एक तास वेगळाच ‘उत्साह’ जाणवतो. झोप आणि भूकही लागत नाही. वजन कमी होते. हाडेही कमकुवत होतात. बर्‍याचदा शाळकरी किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ‘अरे घे रे जरा, उत्साह वाढेल,’ असा आग्रह करीत तलफ लावली जाण्याची शक्यता असते.‘एमडी’चा अंमल आणि डोस जादा होऊन आजारी पडून रुग्ण अवघ्या चार ते पाच महिन्यांतच दगावतो.

तरुण तरुणींना जे आदर्श वाटतात, ते सिनेतारकांवर सध्या  गांजा, चरस, सीबीडी ऑईल, एमडी अशा अमली पदार्थांचे सेवन करण्याचे आरोप आहेत.   एनसीबी तपासाअंती यातील तथ्यापर्यॆत पोहोचेलच.मात्र यातून सर्वसामान्य तरुण तरुणींनी धडा घ्यावा आणि अशा व्यसनांपासून दूर रहावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com