
"..तेव्हा फक्त ३५ रुपये पगार मिळायचा"; रोहित शेट्टीचा संघर्ष
'गोलमाल', 'सिंघम'सारख्या चित्रपटांतून प्रसिद्धी मिळवणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या बॉलिवूडच्या यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. रोहितने बॉलिवूडला अनेक सुपरहिट अॅक्शन चित्रपट दिले आहेत. नुकताच रिलीज झालेल्या सूर्य़वंशी या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहितनेच केलं आहे. सूर्यवंशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये, त्याच्या बॉलिवूडच्या प्रवासाबद्दल सांगितलं, ज्यात त्याने त्याच्या करिअरमधील स्ट्रगलिंग काळाबद्दल सांगितलं.
सन्डे ब्रंच या कार्यक्रमामध्ये रोहित शेट्टीने त्याच्या स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा दिला. रोहितने त्याच्या करिअरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यावेळी त्याला फक्त ३५ रुपये पगार होता. रोहितने सांगितलं की त्यावेळी त्याची आर्थिक स्थितीदेखील फारशी चांगली नव्हती. त्याचे वडील बॉलिवूडमध्ये अॅक्शन दिग्दर्शक म्हणून काम करत होते. तरीही त्याचा बॉलिवूडमधील प्रवास हा सोप्पा नव्हता. त्याने पुढे सांगितलं की, एक वेळ अशी होती जेव्हा त्याच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते.
रोहितने २००३ मध्ये 'जमीन' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. त्या चित्रपटासाठी रोहितचं खूप कौतुक करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याने गोलमाल सीरीज, ऑल द बेस्ट, सिंघम सीरीज, सिंबा, चेन्नई एक्सप्रेस यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले. आता त्याचा आगामी चित्रपट 'सर्कस'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत झळकणार आहे.