मी 'बाजीगर' नाकारला नसता तर आज शाहरुख सुपरस्टार नसता- सलमान खान | Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah Rukh Khan and Salman Khan

मी 'बाजीगर' नाकारला नसता तर आज शाहरुख सुपरस्टार नसता- सलमान खान

बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) आज (२७ डिसेंबर) त्याचा ५६वा वाढदिवस साजरा करतोय. सलमानने आजवर एकापेक्षा एक दमदार चित्रपट बॉलिवूडला दिले. मात्र असेही काही सुपरहिट चित्रपट आहेत, ज्यांची ऑफर त्याने सुरुवातीला नाकारली आणि त्या चित्रपटांमुळे दुसऱ्या अभिनेत्यांचं नशिब फळफळलं. सलमानने १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला 'बाजीगर' आणि २००७ मध्ये प्रदर्शित झालेला 'चक दे इंडिया', हे दोन्ही चित्रपट नाकारले होते. एका मुलाखतीत सलमान याविषयी व्यक्त झाला होता. "जर मी बाजीगर नाकारला नसता तर आज शाहरुख खान (Shah Rukh Khan) सुपरस्टार नसता", असं तो मस्करीत म्हणाला होता. तरी अशा चांगल्या चित्रपटांना नाकारल्याचा कोणताच पश्चात्ताप नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं होतं. सलमानचे वडील सलीम खान यांनी बाजीगरच्या स्क्रिप्टमध्ये कीह बदल सुचवले होते, जे निर्मात्यांनी सुरुवातीला पसंत नव्हते. मात्र नंतर त्यांनी कथानकात त्याप्रमाणे बदल केले.

२००७ मध्ये 'द इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत सलमानला 'चक दे इंडिया' नाकारल्याचा पश्चात्ताप वाटतो का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, "अजिबात नाही. मी तो चित्रपट नाकारला आणि त्यानंतर शाहरुखने तो स्वीकारला. त्यामुळे त्यात काही गैर नाही. मी बाजीगरसुद्धा नाकारला होता. जेव्हा अब्बास मस्तान माझ्याकडे स्क्रीप्ट घेऊन आले, तेव्हा मी माझ्या वडिलांना त्यांचं मत विचारलं होतं. ती कथा नकारात्मक पात्राभोवती फिरत असल्याने वडिलांनी त्यात त्याच्या आईचं पात्र समाविष्ट करण्याचं सुचवलं होतं. मात्र आधी त्यांनी नकार दिला. मी चित्रपटाची ऑफर नाकारल्यानंतर ते शाहरुखकडे गेले आणि तेव्हा त्यांनी आईचंही पात्र समाविष्ट केलं होतं. पण मला त्या गोष्टीचा अजिबात पश्चात्ताप नाही. तुम्ही फक्त विचार करा, जर मी बाजीगरमध्ये काम केलं असतं, तर आता 'मन्नत' हा बंगला बँडस्टँडला नसता. मी शाहरुख आणि त्याच्या यशावर खूप खूश आहे." शाहरुखने 'बाजीगर'मध्ये नकारात्मक छटा असलेली भूमिका साकारली होती आणि त्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला होता.

हेही वाचा: 3 वेळा सर्पदंश, 6 तास रुग्णालयात; सलमानच्या फार्महाऊसवर काय घडलं

'चक दे इंडिया' या चित्रपटाविषयी सलमान पुढे म्हणाला, "मला हा चित्रपटसुद्धा नाकारल्याचा पश्चात्ताप नाही, पण त्याबाबतचं माझं मत चुकलं होतं हे मी मान्य करतो. मला चित्रपटाच्या क्लायमॅक्सबाबत शंका होती. मला शीर्षकसुद्धा खटकलं होतं. शीर्षकात इंडिया हा शब्द दिल्याने पाकिस्तान आणि बांगलादेशमधील आपले चाहते वाईट मानू शकतात, असं मला त्यावेळी वाटलं होतं." 'चक दे इंडिया'सुद्धा शाहरुखच्या करिअरमधील सर्वांत महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. यामध्ये त्याने हॉकी प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.