गुरुपौर्णिमा : अभिनेता भरत जाधव कोणाला मानतो गुरुस्थानी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

माझं बालपण लालबाग-परळमध्ये गेलं. त्यामुळे गिरणगावातल्या आम्ही मुलांनीच मिळून या कार्यक्रमासाठीचा ग्रुप बनवला होता. शाहिरजींच्या सानिध्यात शिकल्याचा खूप अभिमान आहे.

माझ्या करिअरची सुरवातच 1985 मध्ये 'महाराष्ट्राची लोकधारा' या शाहीर साबळे यांच्या कार्यक्रमातून झाली. शाहीर साबळेंकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, बऱ्याच गोष्टींचं आकलन झालं. लोकनृत्याबरोबरच लोककलेचे जे काही प्रकार आहेत; म्हणजे गणगवळण, बतावणी, भारूड या गोष्टी मी शाहीर साबळेंकडून शिकलो. त्यामुळे ते मला गुरुस्थानी आहेत.

माझं बालपण लालबाग-परळमध्ये गेलं. त्यामुळे गिरणगावातल्या आम्ही मुलांनीच मिळून या कार्यक्रमासाठीचा ग्रुप बनवला होता. शाहिरजींच्या सानिध्यात शिकल्याचा खूप अभिमान आहे. त्यांचे जे शो व्हायचे ते बऱ्याचदा ओपन शो असायचे. तीन पडदे लावून 'महाराष्ट्राची लोकधारा'चा कार्यक्रम होत असे. शाहिरजी स्वत: ते पडदे लावण्यासाठी सुरवात करत. एवढी मोठी व्यक्ती ज्यांच्या नावावर 'पद्मश्री' पुरस्कार आहे, अशा शाहीर साबळेंची कामातील जिद्द आणि साधेपणा पाहून मी अवाक्‌ होत असे. कोणत्याही गोष्टीचा कधीही गर्व न करता कायम जमिनीवर राहण्याची शिकवण शाहीरजींनी दिली. ज्याचा आयुष्यात मला खूप उपयोग झाला.

नेपथ्यकला शिकण्याचं साहस मला 'महाराष्ट्राची लोकधारा'मुळे मिळालं. आम्ही विंगेतून लोकधाराचे प्रयोग पाहायचो. एकेदिवशी मोठ्या धीरानं मी आणि शाहीर साबळेंचा नातू म्हणजेच केदार शिंदेनं भारूड सादर करण्याची इच्छा व्यक्त केली. साबळेंनी आम्हाला परवानगी दिली. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद पाहून मंचावर येऊन शाहीर साबळेंनी आमची पाठ थोपटली आणि त्यानंतर आम्हीच भारूड सादर करू लागलो. माझ्या आयुष्यातला तो 'टर्निंग पॉइंट' म्हणावा लागेल. 'महाराष्ट्राची लोकधारा'मधून सुरू झालेला प्रवास नंतर एकांकिका, नाटक, टीव्ही आणि चित्रपटाच्या माध्यमातून अखंड सुरू राहिला. 

शाहीर साबळेंसोबतच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मला जी माणसं भेटली, ज्यांचे विचार मला पटले; ते प्रत्येक जण मला गुरुस्थानी आहेत. गुरुपौर्णिमेची विशेष आठवण सांगायची तर, मी स्वामी समर्थांना मनापासून मानतो. त्यामुळे दरवर्षी अक्कलकोटला माझ्या एका तरी नाटकाचा प्रयोग सादर करतो. मी या प्रयोगांच्या मानधनाची किंमत ठरवत नाही. कलेच्या माध्यमातून सेवा करण्याची ही उत्तम संधी आहे, असं मला वाटतं. यंदा प्रयोगाच्या निमित्तानं दत्तगुरूंच्या नगरीत म्हणजेच गाणगापूरलाही जाऊन आलो. या प्रयोगानंतर एक वेगळी स्फूर्ती मिळते, असं मला वाटतं. 

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'एक टप्पा आउट' या कार्यक्रमात मी जजच्या भूमिकेत आहे. यातील स्पर्धकांना एकच सांगेन, की क्षणिक दिसण्याला भुलून जाऊ नका. अभिनयातच करिअर करायचं असेल, तर त्यात सातत्य हवं. त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू ठेवायला हवेत. सातत्य आणि ध्येयाच्या दृष्टीनं वाटचाल, यापेक्षा मोठी गुरुपौर्णिमेची भेट दुसरी असूच शकत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is the Guru in the life of Famous Marathi actor Bharat Jadhav